Rajya Sabha Election 2022
Rajya Sabha Election 2022 sakal
देश

राज्यसभेसाठी भाजप सक्रिय; ५७ जागांसाठी होणार निवडणूक

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरवात झाली.

नवी दिल्ली - राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा व वरिष्ठ पक्षनेत्यांशी दीर्घ चर्चा करून पक्षाच्या संभाव्य नावांबद्दल खलबते केली. राज्यसभेतील २४५ जागांपैकी यंदाच्या वर्षभरात ९५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी आता येत्या १० जूनला सर्वाधिक ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा थेट परिणाम आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर होणार आहे. त्यामुळे भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने राज्यसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे निर्देश दिले आहेत. (Rajya Sabha Election 2022)

महाराष्ट्रातील ६ पैकी २ जागा भाजप हमखास जिंकणार आहे. मात्र तिसऱ्या जागेसाठीही पक्षाने सक्रिय प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील ताणाताणीत भाजप ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी ‘धक्कातंत्र'' वापरू शकते, अशी दिल्लीत चर्चा आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे अपक्ष म्हणून उभे राहिलेच तर वेळप्रसंगी त्यांना पाठिंबा द्यावा काय, याबाबतही पक्षात खल सुरू असून विरोधी नेते देवेंद्र फडणवीस याबाबतचा ‘अंतिम'' निर्णय घेतील, असे पक्षसूत्रांनी स्पष्ट केले. राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची ३१ मे ही अंतिम मुदत आहे. १० जून रोजी राज्यसभेसाठी मतदान होईल व त्याच दिवशी मतमोजणीही होईल. राज्यसभेच्या २४५ पैकी भाजपकडे सध्या ९५ खासदार आहेत तरी पक्षाचे येथे स्पष्ट बहुमत अजूनही नाही. वरिष्ठ सभागृहात उत्तर प्रदेशचे सर्वाधिक ३४ खासदार असून त्यातील ११ जणांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र-तमिळनाडूतील प्रत्येकी ६ सदस्य निवृत्त होत आहेत. तमिळनाडूतून भाजपला काही आशा नाही. एकूण चित्र पाहता या निवडणुकीनंतर भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या कमी होण्याची चिन्हे आहेत.

विरोधी मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेठी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठीच्या ‘इलेक्ट्रोरल कॉलेज'' चे वर्तमान स्वरूप पाहिले तर भाजप आघाडीकडे ४८.९ टक्के हक्काची मते आहेत. कॉंग्रेस व विरोधी पक्षांकडे साधारणतः ५१.१ टक्के मते आहेत. तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर राव यांनी विरोधकांच्या एकीसाठी कंबर कसली असून विविध विरोधीपक्षीय मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशीही ते लवकरच चर्चा करणार आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नितीशकुमार यांच्याशी चर्चा करण्यास पाटण्यात पाठविले होते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामार्फत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या संपर्कात भाजप नेतृत्व आहे. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भाजप नेत्याला सांगण्यात आले आहे.

कर्नाटकात येडियुरप्पांना दे धक्का !

कर्नाटक विधान परिषदेच्या ५ जागांसाठी भाजपने जे उमेदवार जाहीर केले. मात्र माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी वाय विजयेंद्र यांचाच पत्ता भाजपने कट केला आहे. कर्नाटकात ३ जून रोजी विधान परिषद निवडणूक होत आहे. भाजपच्या यादीत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्ण सवदी, राज्य सरचिटणीस हेमलता नायक, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष चलवादी नारायणस्वामी, बलवराज होलाट्टी आणि एस.केशवप्रसाद यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT