Child
Child Sakal
एज्युकेशन जॉब्स

बालक-पालक : लवकर निजे, लवकर उठे

अभिजित पेंढारकर

‘हे काय? मुलं अजून उठली नाहीत शाळेला?’ बाबा कडाडले.

‘ऑनलाइन शाळा आहे. घरून आवरून शाळेत पोहोचायची गडबड नाहीये. मुलं पंधरा-वीस मिनिटं आधी उठतात. तेवढ्या वेळात आवरून होतं त्यांचं,’’ आईनं सहजपणे सांगितलं.

‘नाही, हे योग्य नाही. ऑनलाइन असली म्हणून काय झालं? वेळेत उठायलाच हवं. एवढा वेळ झोपून राहायचं म्हणजे काय?’’ बाबा ऐकायला तयारच नव्हते.

‘पावसाचे दिवस आहेत. पाऊस असला की थंडीही असते सकाळी. त्यांच्या खोलीत जाऊन उठवायचंही जिवावर येतं कधी कधी. वाटतं, झोपू देत. आत्ता तर झोपायचं वय आहे त्यांचं!’’

‘ही अशीच बेशिस्त वाढत जाते मुलांमध्ये. ते काही नाही. थंडी असो, पाऊस असो. मुलांनी शाळेसाठी लवकर उठलंच पाहिजे. लवकर निजे, लवकर उठे, त्यास ओरडा न भेटे!’’ बाबांनी कधीकाळी त्यांच्या शाळेत ऐकलेलं वाक्य थोडं सुधारून वापरलं. मुलांना हळुवार हाक मारून, प्रेमानं उठवलं, तर ती उठतात, हे ‘नवं ज्ञान’ही आईला दिलं.

‘ठीकेय. तुम्ही जबाबदारी घेत असाल, तर माझी काहीच हरकत नाही!’ आईनंही एका वाक्यात विषय संपवला.

पुढचे दोन दिवस बाबा नेमके दौऱ्यावर होते. दौऱ्याहून आले, तर मुलांच्या शाळेला सुट्टीच होती. सोमवारी मात्र कुठल्याही परिस्थितीत मुलांना शाळेसाठी वेळेत उठवणारच, असा निश्चय त्यांनी करून टाकला होता. त्यासाठी रविवारीच मुलांशी संवादही साधायला सुरुवात केली होती.

‘हे बघा बाळांनो, सकाळी लवकर उठणं आरोग्यासाठी चांगलं असतं,’ बाबा म्हणाले.

‘बाबा, आम्ही लवकरच उठतो की मग!!’ धाकट्यानं खणखणीत आवाजात सांगितलं.

‘तसं नाही, लवकर म्हणजे शाळा सुरू व्हायच्या पुरेसं आधी,’ बाबांनी नेमका मुद्दा मांडला.

‘आम्ही शाळा सुरू व्हायच्या पुरेसं आधीच उठतो, बाबा!’ आता मोठीनंही तिच्या बाजूनं किल्ला लढवायला सुरुवात केली.

वीस मिनिटं आधी उठून सगळं नीट आवरतं, तर त्याआधी का उठायचं, हा मुलांना पडलेला प्रश्न होता. आधी उठून काय करायचं, हे बाबांना नीट सांगताही येत नव्हतं. त्यांनी लहानपणी शाळेसाठी केलेली पायपीट, लवकर उठण्याचे संस्कार, वगैरे सगळं सांगून पाहिलं, पण सामना अनिर्णित राहिला.

‘उद्या तुम्ही मुलांना उठवणार आहात ना?’ आईनं रात्री झोपताना बाबांना आठवण करून दिली. बाबांनी मोठ्या विश्वासानं होकार दिला. आई निश्चिंत होऊन झोपून गेली.

बाबा दुसऱ्या दिवशी सकाळी गजर लावून नेहमीच्या वेळेपेक्षा जरा लवकरच उठले. साडेसातच्या शाळेला मुलांना साडेसहा वाजताच उठवण्याचा निर्धार त्यांनी केला होता. आज त्यांच्या मार्गात कुणीही आडवं येणार नव्हतं.

बाबांनी पटापट स्वतःचं आवरलं आणि ते मुलांच्या खोलीत गेले. खोलीत अंधार होता. पावसाळी हवा होतीच. बाहेर भुरभूर पाऊस सुरू होता. छान थंडी पडली होती. बाबांनी पडदे उघडले, पण उजेड जरा जास्तच येतोय, म्हणून ते झाकून टाकले. लाइट लावला, पण तोही डोळ्यावर येईल म्हणून बंद केला. मुलांकडं नजर टाकली. दोघंही आपापल्या अंथरुणात आजीची गोधडी अंगावर घेऊन छान गुरगटून झोपी गेली होती.

बराच वेळ मुलांचाही आवाज येईना आणि बाबांचाही, तेव्हा आईच नेमकं काय झालंय ते बघायला बेडरूममध्ये डोकावली.

....मुलं त्यांच्या अंथरुणात तशीच गाढ झोपली होती आणि त्यांच्या कुशीत, त्यांच्याच अंगावर हात टाकून बाबाही!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT