balanced mind
balanced mind sakal
फॅमिली डॉक्टर

संतुलन मनाचे...

सकाळ वृत्तसेवा

शरीराला काही दुखले खुपले तर ते आपल्याला लगेच लक्षात येते, शारीरिक रोगाचे निदान होणे हे सुद्धा त्यामानाने सोपे असते. मनाच्या असंतुलनाकडे मात्र तितकेसे लक्ष दिले जात नाही हे सुद्धा तितकेच खरे. मन हे एकटे नसतेच तर त्याला बुद्धी, विवेक, अहंकार, स्मृती, मेधा, वगैरे इतरही तत्त्वांची जोड असते. पंचज्ञानेंद्रियेदेखील मनाच्या जोरावरच आपापली कामे करत असतात.

मन तणावग्रस्त असले की त्याचा या सर्वांच्या कामावर परिणाम होतो. योग्य निर्णय घेतले जात नाही, अनुशासन राखता येत नाही अर्थातच यातून असंख्य रोगांना असंख्य रोगांना आमंत्रण मिळू शकते. मनाचे विकार कसे होतात, हे चरकाचार्यांनी पुढीलप्रमाणे सांगितले आहे,

कामक्रोधलोभहर्षभयमोहायासशोकचिन्ता उद्वेगादिभिः ।

भूयोऽभिघाताभ्याहतानां वा मनसि उपहते बुद्धौ च ।।

...चरक निदानस्थान.

काम, क्रोध, लोभ, मोह, हर्ष, भय, मोह, शोक, चिंता, उद्वेग वगैरे मानसिक भावांचा मनावर आघात झाला की त्यातून बुद्धी बिघडते आणि अनेक रोगांची सुरुवात होते.

मनाचे संतुलन म्हणजे काय? मनात आरोग्याचे, उत्कर्षाचे, समृद्धीचे विचार येणे, सर्व जण आनंदी होवोत, सर्व जण सुखी होवोत अशा तऱ्हेचे विचार मनात येणे हे ढोबळ मानाने मनाचे संतुलन म्हणता येईल. त्या उलट मनात दुसऱ्याचे अकल्याण, शत्रुत्व, ईर्ष्या, असूया याबद्दलचे विचार, किंवा आपण काहीही करू नये असे वाटणे, एकदा बसले की बसून राहावे असे वाटणे अशा गोष्टी घडत असतील, आत्महत्येचा विचार मनात घोळत असेल, अंगावरचे कपडे फाडण्यासारख्या गोष्टी हातून घडत असतील तर ते मानसिक असंतुलनातच मोडते.

मन प्रसन्न राहिले, आरोग्यवान राहिले तर सर्व शरीरही तेजस्वी व कार्यरत राहू शकते, इतरांना आनंद देणारे राहू शकते. याच्याही पुढची पायरी म्हणजे आतला आत्मा-जीव-व्यक्ती संतोष, आनंद, समाधान यांचा अनुभव करणे म्हणजे आत्मिक संतुलन. सर्व तऱ्हेचे संतुलन हे आरोग्याचे लक्षण धरले तर कोठल्याही प्रकारचे असंतुलन हे रोगाचे लक्षण समजले जाणे ओघानेच येते.

स्वतःकडे संपत्ती, आरोग्य वगैरे सर्व असताना स्वतःविषयी कमीपणा वाटणे, स्वतःविषयी अहंगंड वा न्यूनगंड असणे, जिवाला स्वस्थता न लाभणे, झोपायच्या वेळी स्वस्थ झोप न येणे, विश्रांतीच्या वेळी विश्रांती न घेता येणे हे सर्व आत्मिक असंतुलनाचे रोग समजता येतील.

मनुष्य सुखासाठी धडपड करत असतो, पण त्यात अतिरेक झाल्याने असंतुलन निर्माण होते. तसे पाहता शारीरिक असंतुलनामागे सुद्धा विचित्र प्रकारचे विचार किंवा समज, चिंतनाची चुकीची पद्धत वा बुद्धीचे चुकीचे मार्गदर्शन जबाबदार असते.

मनुष्या-मनुष्यातील देवाणघेवाण व प्रेमभावना कमी होणे; संपूर्ण समाजाशी, वातावरणाशी व बाह्यविश्र्वाशी असलेला व्यवहार नीट करता न येणे; पैसा व सामाजिक प्रतिष्ठा असताना सुद्धा समाजाविषयी घृणा वाटणे, किंवा समाजाने त्या व्यक्तीला बाजूला टाकणे अशा प्रकारे रोगाची उत्पत्ती झालेली दिसते.

सर्व काही असताना झोप न येणे, शांतता न वाटणे, बाह्य वस्तू मला सुखी करू शकतील अशा विचाराने त्यांच्या मागे पळणे हे आत्मिक असंतुलन रोगांना कारणीभूत होते. बाह्य वस्तू स्थिर नसतात, त्या आकार बदलतात, शक्ती बदलतात, स्वरूप बदलतात, गुण बदलतात, त्यामुळे बाह्य वस्तूच्यामागे धावत असताना ती वस्तू अदृश्‍य झाली असून आपण कुठल्यातरी चुकीच्या वस्तूमागे धावत आहोत हे मनुष्याच्या लक्षातही येत नाही, शेवटी तोंडघशी पडायला होते, सुख तर मिळत नाहीच. म्हणून प्रत्येक रोगाचे कारण जवळ जवळ मानसिक आहे असे म्हणायला हरकत नाही. मानसिक ताण हे मानसिक असंतुलनाचे मुख्य कारण आहे.

एखाद्या उद्योग व्यवसायात एक विशिष्ट प्रकारची वस्तू तयार करण्यासाठी कोणती साधने व कच्चा माल लागेल याची यादी करावी लागते. ही यादी तयार करण्याचे ज्ञान नसले तर ताणाला सुरुवात होते. यादी व्यवस्थित झाली तरी जो कोणी वस्तू बाजारातून मिळवणार असतो त्याने सर्व वस्तू नीट मिळवल्या नाहीत, त्या वस्तू मिळत नाहीत असे सांगितले किंवा वस्तू वेळेवर मिळवल्या नाहीत तर मानसिक ताण तयार होतो. कच्चा माल मिळाल्यावर उत्पादित झालेली वस्तू गिऱ्हाईकाच्या पसंतीला उतरली नाही तरी मानसिक ताण तयार होतो.

साधारणतः प्रत्येकाने कष्ट करणे अपेक्षित असते. कष्ट केले की सृजनाचे कार्य आपसूक घडते. म्हणजेच अपेक्षा असो वा नसो, मेहनत करणाऱ्याला चार पैसे मिळतातच. मिळालेल्या चार पैशांनी आपल्याला काय काय सुख घेता येईल याचा विचार न करता चाराच्या जागी आठ, आठाच्या जागी सोळा, सोळाच्या जागी एकशे साठ, एकशे साठच्या जागी हजार कसे मिळतील असा विचार करत गेले तर पैसे मिळाले तरी त्यातून सुख मिळावे हा उद्देश विसरला जातो व मनुष्य पैशांच्या, प्रसिद्धीच्या मागे धावत राहतो.

जसजसा मनुष्य या वस्तूंच्या अधिकाधिक मागे लागतो तसतशा वस्तू अधिक वेगाने दूर पळतात. हातात आलेली वस्तू समाधान देत नाही व हवी असलेली वस्तू हातात येत नाही अशा चक्रात सापडल्याने मानसिक ताण तयार होतो. शिवाय, एखादी वस्तू पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळाबद्दल पूर्ण कल्पना नसल्यास, वस्तू हवी तेव्हा का तयार झाली नाही असे वाटून मानसिक ताण तयार होतो.

अमुक गोष्ट किती वेळात तयार होऊ शकते याचा अंदाज असताना दुसऱ्याला खूष करण्यासाठी किंवा इतर काही अपेक्षेने ती गोष्ट दोन दिवसात करून देतो फुशारक्या मारण्याने मानसिक ताण तयार होतो.

मानसिक ताण तयार झाला की मनाला इंद्रियांवर ताबा ठेवता येत नाही, इंद्रिये आपापल्या विषयांकडे धावायला लागली की मनाची अधिकच ओढाताण होते व मानसिक ताण दुप्पट होतो. मानसिक ताण वाढल्याचा परिणाम म्हणून अन्नपचन कमी झाल्याने किंवा झोप कमी लागल्याने शारीरिक आजार उत्पन्न झाला तर शरीरातील वीर्यशक्ती व ओजशक्ती कमी झाल्याने पुन्हा मन अस्वस्थ होऊन अधिकच मानसिक ताण उत्पन्न होतो.

आजारी शरीराची मानसिक ताण सहन करण्याची शक्ती कमी झाल्याने नेहमीचा ताण सहन होईनासा होतो व त्यामुळे रोगोत्पत्ती होते. तेव्हा रोगांपासून चार हात दूर राहण्यासाठी मनःशांती व मानसिक समाधान हे सर्वांत आवश्‍यक आहे.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT