सुगंधित उटणे लावून स्नान करण्याने मन, शरीर उल्हसित होते, त्वचा शुद्ध व नितळ राहते, त्वचाविकारांना प्रतिबंध होतो. त्वचाविकार असले तर ते बरे होण्यास मदत मिळते, सुरकुत्यांना प्रतिबंध होतो, त्वचा मऊ व अभंग राहते.
स्त्री असो वा पुरुष, आपण आकर्षक दिसावे ही भावना प्रत्येकाची असते. ही आकर्षकता वरवरची किंवा तात्पुरती नसावी, तर आतून आणि आरोग्याच्या पाठोपाठ आलेली असावी. यासाठी आयुर्वेदातील साध्या, घरच्या घरी कोणावरही करता येणाऱ्या उपाययोजना प्रत्येकाला माहिती हव्यात. शुद्धता व सौंदर्य यांचे अतूट नाते असते. त्वचा असो, केस असोत, शरीरबांधा असो किंवा नखे-दात असोत, या सर्वांसाठी शरीरधातूंची शुद्धता व संपन्नता कारणीभूत असते.
त्वचेचा रंग आपल्या हातात नसला तरी रक्तधातू शुद्ध असला तर त्याचे प्रतिबिंब उजळ त्वचेच्या रूपाने पडतेच. सावळी त्वचासुद्धा सतेज व प्रसन्न असली तर सुंदरच दिसते. त्वचा हा सौंदर्यातील महत्त्वाचा पैलू. आयुर्वेदाच्या दृष्टीतून विचार करायचा झाल्यास त्वचा सूक्ष्म अशा असंख्य छिद्रांनी युक्त असल्याने तिच्या ठायी वात राहतो आणि त्वचेची कांती, सुकुमारता पित्तामुळे टिकते. म्हणूनच त्वचा कोरडी होऊन चालत नाही. त्वचेसाठी सर्वोत्तम सौंदर्यप्रसाधन म्हणजे ‘उटणे’. साबण, मग त्याची आयुर्वेदिक म्हणून जाहिरात केली जात असली तरी १०० टक्के नैसर्गिक असेलच असे नाही. शिवाय आजकाल साबणात स्निग्धता नसल्याने नित्यनेमाने साबण वापरल्याने त्वचेत वात असंतुलन होऊ शकते. त्यामुळे अगोदर छानशा अभ्यंग तेलाने अभ्यंग करून नंतर उटणे लावून कोमट पाण्याने अंघोळ केल्यास सौंदर्याचा एक मोठा भाग आपल्या हातात येईल. आपण उटणे घरच्या घरी पण बनवू शकतो.
आवळा, अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा, गुलाबाच्या पाकळ्या यातील मिळतील त्या वनस्पतींचे बारीक चूर्ण समप्रमाणात घ्यावे. जेवढे मिश्रण तयार होईल तेवढेच मसूर डाळीचे किंवा हरभरा डाळीचे पीठ मिसळावे व नीट एकत्र करून उटणे तयार करून ठेवावे. संतुलनचे सॅन मसाज पावडर हे उटणे सुद्धा या आणि इतर अनेक सुगंधी व वर्ण्य द्रव्यांपासून बनविलेले असते. सकाळी सकाळी असे सुगंधित उटणे लावून स्नान करण्याने मन, शरीर उल्हसित होते, त्वचा शुद्ध व नितळ राहते, त्वचाविकारांना प्रतिबंध होतो. त्वचाविकार असले तर ते बरे होण्यास मदत मिळते, सुरकुत्यांना प्रतिबंध होतो, त्वचा मऊ व अभंग राहते. इतकेच नाही तर हेच उटणे नियमितपणे चोळून लागल्यास अतिरिक्त मेदाचे पचन होऊन शरीरबांधा नीट राहण्यासही मदत मिळते. तेलकट त्वचा असणाऱ्यांना हे उटणे ताकात किंवा दह्यात मिसळून, कोरडी त्वचा असणाऱ्यांना दुधात वा सायीत मिसळून तर सामान्य त्वचा असणाऱ्यांना पाण्यात वा गुलाबपाण्यात मिसळून लावता येते.
तारुण्यपीटिका, वांग, डोळ्यांखाली काळी वर्तुळे वगैरे त्रास असले तर याप्रकारे उटणे लावणे उत्तम असतेच. बरोबरीने रात्री झोपताना चेहऱ्याला रोझ ब्युटी तेलासारखे तेल लावण्याचा फायदा होतो. बरोबरीने पंचतिक्त घृत, महामंजिष्टादि काढा, संतुलन अनंत कल्प घेण्याचा अजून चांगला फायदा होतो. गरोदरपण, बाळंतपणातून गेल्यावर बहुतेक सगळ्याच बायकांना पोटाची त्वचा सैल होणे, सुरकुतणे, पांढऱ्या रेषा येणे वगैरे सौंदर्याला बाधक अडचणीला सामोरे जावे लागते. गरोदरपणात सुरुवातीपासून रोझ ब्युटी तेलाचा पोटावर हलक्या हाताने अभ्यंग केला तर अप्रतिम उपयोग होताना दिसतो. चेहऱ्याला नियमितपणे तेल गिरवण्याने सुरकुत्यांना प्रतिबंध होताना दिसतो. डोळ्यांसाठी सौंदर्यप्रसाधन म्हणून काजळकांडी फिरवली जाते पण त्याला सहस्रपटींनी चांगला पर्याय म्हणजे आयुर्वेदिक काजळ. हे काळ्याशार रंगाचे किंवा किंचित काळसर रंग असलेले असू शकते. आवडीप्रमाणे यातील रंग निवडता येतो व सौंदर्याबरोबरच निरोगी डोळ्यांचाही बोनस मिळतो. संगणकावर काम केल्याने डोळ्यांवरचा ताण, कोरडेपणा उष्णता कमी होण्यासाठी सुद्धा याप्रकारे बनविलेले सॅन अंजन उत्तम गुणकारी ठरताना दिसते. सौंदर्याचा विचार करताना केस विसरून चालणार नाहीत. शिकेकाई, रिठा, नागरमोथा, कापूरकाचरी, संत्र्याची साल, आवळा वगैरे केश्य द्रव्यांपासून तयार केलेले चूर्ण केस धुण्यासाठी वापरावे. याने केस स्वच्छ धुतले तर जातातच व केसात कोंडा होण्यास प्रतिबंध होतो.
केस लांबसडक, दाट व निरोगी राहण्यास मोलाची मदत मिळते. केसांच्या सौंदर्यासाठी व आरोग्यासाठी औषधांनी सिद्ध तेल वरदानच होय. संतुलनचे व्हिलेज हेअर तेल आठवड्यातून ३-४ वेळा लावण्याचा उपयोग होतो. याची विशेषता म्हणजे हे अग्निसंस्कारातून तयार होत असल्याने केसांना लावले की आतमध्ये छान जिरते. केस फार तेलकट होत नाहीत. हाताची त्वचा इतर त्वचेपेक्षा अधिक लवकर खराब होत असल्याने, म्हातारी होत असल्याने हाताची निगा विशेष राखावी लागते. भांडी घासताना किंवा डिटर्जंट वगैरे हाताळताना शक्यतोवर रबराचे हातमोजे वापरावेत. आठवड्यातून २-३ वेळा हाताला अर्धा चमचा साय चोळून लावावी व काही वेळ हात तसेच ठेवून मघाशी सांगितलेल्या उटण्याने धुवून टाकता येतात.
आठवड्यातून एकदा कोमट पाण्यात थोडे लिंबू पिळून त्यात हाताचे पंजे पाच मिनिटांसाठी बुडवून ठेवता येतात. यामुळे नखे स्वच्छ व सुंदर राहतात. पूर्वीच्या काळी नखांना मेंदी लावली जायची ती याचसाठी. कधी कधी नखाच्या बाजूची सालपटे निघताना दिसतात. यासाठी त्या ठिकाणी घरचे लोणी जिरविण्याचा उपयोग होतो. पायाच्या तळव्यांना भेगा पडणे हे सुद्धा सौदर्यात बाधा आणणारे एक लक्षण. नियमित पादाभ्यंग केला, आहारात योग्य प्रमाणात साजून तुपाचे सेवन केले तर बघता बघता अशा भेगा भरून येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.