
बदलापूर : बदलापूर पश्चिमेकडील वालिवली परिसरात बारवी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नियंत्रण सुटलेल्या ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याचा थरार बदलापूरकरांनी सकाळच्या प्रहरी अनुभवला. यात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेचा मृत्यू झाला असून सात जण जखमी असल्याची माहिती मिळते आहे. हा ट्रक इतका वेगात होता की त्याच्या मार्गात येणाऱ्या रिक्षा, दुचाकी, वाऱ्याच्या दिशेने तुडवत हा ट्रक गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भयानक अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असला तरी, मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.