दात तर काही दुखत नाही मग डॉक्टर कडे जाण्याची आवश्यकता नाही हा गैरसमज पालकांनी दूर करणे गरजेचे आहे. बर्याच वेळा दात दुखायला लागला की आपण डॉक्टरांकडे जातो व लक्षात येते की दुर्लक्ष केल्यामुळे कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने होणारे काम आपण वाढवून बसलो आहोत.
आपल्या सर्वांनाच कोरोना काळात तब्येतीचे महत्त्व कळले आहे. आज आपण जरा मौखिक आरोग्य म्हणजेच 'ओरल हेल्थ' बद्दल माहिती घेऊया. मौखिक आरोग्यामध्ये येणारा सर्वात प्रमुख घटक म्हणजे आपले दात. दातांची काळजी या विषया संदर्भात बोलत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे ही वयानुपरत्वे बदलणारी गोष्ट आहे. लहान मुलांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने घ्यावयाची काळजी वेगळी असते.
लहान मुलामुलींच्या ( वय वर्ष १० पर्यंत ) संदर्भात बोलायचे झाल्यास त्यांच्या दातांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांवर असते. पण पालकांनाच बर्याच वेळा कळत नाही की ही जबाबदारी पार कशी पाडावी. सर्वप्रथम आपल्या मुलामुलींना नियमित दिवसातून २ वेळा ब्रश करण्यास सांगून तो करून घेणे गरजेचे आहे. ब्रश कसा करावा या संदर्भात मुलामुलींना युट्यूब वरील काही चांगले व्हिडिओ दाखवणे गरजेचे आहे. ज्यामुळे ते समोर बघून त्याचे अनुकरण करण्याचा ते प्रयत्न करतील. सकाळी उठल्यावर तसेच रात्री झोपण्यापूर्वी नियमित ब्रश केल्याने दात चांगले राहतात. याच बरोबर मुलांच्या जेवणाच्या वेळा निश्चित करणे विशेषतः गोड पदार्थ अथवा चॉकलेट देण्याची दिवसातील कुठलीही एकच वेळ निश्चित करणे आवश्यक आहे. यामुळे असे पदार्थ दिल्यानंतर दात स्वच्छ करण्याची सवय लावणे सोपे जाते. तसेच अशा सवयींमुळे लागणारी शिस्त भविष्यात कामी येते. वेळ निश्चित केल्यामुळे वेळोवेळी मुलामुलींकडून केला जाणारा हट्ट देखील कमी होतो.
या सर्व सवयींसोबतच मुलामुलींच्या दातांचे वेळोवेळी डॉक्टरांकडून चेकअप करून घेणे हा देखील पालकांच्या जबाबदारीचाच एक भाग आहे. दात तर काही दुखत नाही मग डॉक्टर कडे जाण्याची आवश्यकता नाही हा गैरसमज पालकांनी दूर करणे गरजेचे आहे. बर्याच वेळा दात दुखायला लागला की आपण डॉक्टरांकडे जातो व लक्षात येते की दुर्लक्ष केल्यामुळे कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने होणारे काम आपण वाढवून बसलो आहोत. त्यानंतर डॉक्टरांकडून कळते की उशीर झाल्याने दात वाचवता येणार नाही. असे प्रकार टाळण्यासाठी किमान वर्षातून एकदा तरी काहीही दातांची समस्या नसताना देखील डॉक्टरांना भेटून मुलामुलींचे चेकअप करून घेणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा पालकांना न समजणार्या अनेक गोष्टी डॉक्टरांच्या निदर्शनास येतात व वेळीच त्याचा उपचार शक्य होतो.
१४ वर्षांपासून पुढील वयोगटास देखील वरील सांगितलेली गोष्ट लागू पडते. दिवसातून २ वेळा ब्रश सोबतच माऊथ वॉश हा नेहमी पाण्यासोबत सम प्रमाणात एकत्रित करून मगच त्याचा चूळ भरण्यासाठी उपयोग करावा. या वयोगटातील लोकांनी धुम्रपानासारख्या सवयींपासून दूर राहणे आवश्यक आहे. कोणाला बर्याच वर्षांपासुन ही सवय असल्यास जवळील व्यसन मुक्ती केंद्रास संपर्क करून या सवयी वेळीच सोडून देणे आवश्यक आहे. तंबाखू, गुटखा यांसारख्या गोष्टींचा मौखिक आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. काही लोकांमध्ये तर या वाईट सवयी वेळीच न सुटल्यामुळे त्यांना कॅन्सर (कर्करोग) सारख्या आजाराला बळी पडावे लागते. ६० वर्षांपासून पुढील वयोगट लक्षात घेतला असता या वयोगटातील लोकांनी पडलेले दात बसवून घेणे आवश्यक आहे. आपले जेवण नीट चावले न गेल्यास त्याचा पचन संस्थेवर वाईट परिणाम होतो. दातांची खूप झीज झाल्याने ते निकामी झाले असतील तर अशा परिस्थितीमध्ये योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक असल्यास सर्व दात काढून कवळी बसवणे गरजेचे आहे.
पूर्वीच्या काळी बसवल्या जाणार्या कवळीमध्ये व आता बसवल्या जाणार्या दातांमध्ये खूप फरक आहे. दंत प्रत्यारोपणाच्या (डेंटल इम्प्लांट ) च्या सहाय्याने कधीही काढावी न लागणारी कवळी (दात) बसवणे आता सहज शक्य झाले आहे. अशा प्रकारच्या उपचारानंतर अपचनाचे विकार मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. दाताचे कुठलेही दुखणे दुर्लक्षित न करता योग्य वेळी उपचार घेऊन मौखिक आरोग्य स्वस्थ ठेवल्यास केवळ पचन संस्थाच नव्हे तर एकूणच आरोग्य स्वस्थ व निरोगी राहते.
दंत-प्रत्यारोपण ही एक नसलेले दात अथवा काही कारणास्तव काढलेले दात परत बसवण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया दात नसलेल्या अथवा पडलेल्या १४ वर्षांवरील कोणत्याही रुग्णामध्ये शक्य आहे. त्यामुळे १४ वर्षांवरील वयोगटात कोणालाही या प्रक्रियेमार्फत नवीन दात बसवून घेता येतात.
दंत-प्रत्यारोपणसाठी तोंडात आवश्यक तेवढे हाड उपलब्ध आहे की नाही हे तपासावे लागते. सीबीसीटी सारख्या एक्स रे मार्फत याची माहिती डॉक्टरांना कळते. आवश्यक तेवढे हाड उपलब्ध असल्यास रुग्णास रोज चालू असलेल्या गोळ्या-औषधांची माहिती घेऊन, रुग्णास मधुमेह (डायबेटिस), उच्च रक्तदाब (BP) यांसारखे आजार आहेत की नाही हे तपासून अशा प्रकारचे आजार असल्यास त्यासंदर्भात विशेष काळजी घेऊन शस्त्रक्रियेमार्फत दंत-प्रत्यारोपण (डेंटल इम्प्लांट सर्जरी) केले जाते. या शास्त्रक्रियेनंतर साधारणतः ३-४ महिन्यानंतर कधीही न काढाव्या लागणाऱ्या कवळ्या / दात बसवले जातात. दातांची काळजी सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असून आपण सर्वांनी त्याकडे लक्ष दिलेच पाहिजे.
- डॉ. महेश मधुकर कुलकर्णी, (ठाणे) B.D.S, M.D.S -(Orthodontics)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.