
भारतीयांसाठी क्रिकेट हा जिव्हाळ्याचा विषय. भारतात क्रिकेट माहित नसणारा व्यक्ती सापडणे तसे कठीणच. कोणत्या ना कोणत्या रुपात क्रिकेटची ओळख प्रत्येकालाच झालेली असते. अशीच क्रिकेटची ओळख एका मुलीला तिच्या वडिलांमुळे आणि आजोबांमुळे झाली आणि पुढे त्याच मुलीने क्रिकेटलाच आपलं करियर बनवलं. पण त्यासाठी तिला बऱ्याच अडथळ्यांनाही पार करावे लागले. ही खेळाडू म्हणजे २७ वर्षीय गौतमी नाईक.
सुरुवातीच्या अडथळ्यांवर मात करत तिने स्वत:ला क्रिकेटमध्ये झोकून दिलं. ती वेगवेगळ्या स्थरावर क्रिकेटमध्ये चमकू लागली. याचदरम्यान महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या एका प्रदर्शनीय सामन्यात तिला माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनी हेरलं. तिला मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कॅम्पसाठी आमंत्रण गेलं आणि तिची ओळख जगाला होण्यास सुरुवात झाली. तिने नंतर बडोदा संघात जागा मिळवली. ती त्या हंगामात सर्वाधिक धावा करणारी तिसऱ्या क्रमांकाची फलंदाज ठरली.
एका आमंत्रणीय स्पर्धेत तिने १० सामन्यांत ९०० हून अधिक धावा ठोकल्या, ज्यात तिने ३०० आणि २५० धावांची खेळीही केली. तिला नंतर रत्नागिरी जेट्सने महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ साठी ३.६ लाखाला खरेदी केलं, त्यावेळी तिला स्मृती मानधनासोबतही खेळण्याची संधी मिळाली. याच गौतमी नाईतसोबत तिच्या प्रवासाबद्दल ईसकाळ टीमने साधलेला हा खास संवाद...