Health
Health 
फॅमिली डॉक्टर

उन्हाळ्याच्या झळा

डॉ. श्री बालाजी तांबे

उन्हाळा तीव्र व्हायला लागला की त्याच्या झळा व ज्वाळा बंद घरातही येऊ लागतात. कारण दक्षिणायनात सूर्य थंडावा व पाणी म्हणजे जीवन देण्यास सुरवात करतो व उत्तरायणात उष्णता वाढून तीच जलशक्‍ती परत घेण्यास सुरवात करतो. उन्हाळ्यात जलशक्‍ती परत ओढून घेण्याचे काम सुरू झालेले असते. अशा वेळी उन्हाळ्याची तक्रार न करता उन्हाळा कसा सुसह्य होईल हे पाहणे इष्ट ठरेल.

पृथ्वीच्या स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्याने सूर्याचे जाणे सहा महिने उत्तरेकडे व सहा महिने दक्षिणेकडे असते. मकरसंक्रांतीच्या आरंभापासून ते कर्कसंक्रांतीच्या आरंभापर्यंत सूर्याची गती उत्तरेकडे असते म्हणून त्यास उत्तरायण म्हणतात. साधारण मार्गशीर्ष महिन्यात (२१ डिसेंबर) उत्तरायणास सुरवात होते व त्यात शिशिर, वसंत व ग्रीष्म ऋतूंचा समावेश होतो. आषाढ महिन्यापासून (२१ जून) दक्षिणायनास प्रारंभ होतो व त्यात वर्षा, शरद व हेमंत ऋतूंचा समावेश होतो. दक्षिणायनात सूर्य थंडावा व पाणी म्हणजे जीवन देण्यास सुरवात करतो व उत्तरायणात उष्णता वाढून तीच जलशक्‍ती परत घेण्यास सुरवात करतो. हे सर्व निसर्गतः चक्राकार गतीने सुरू असते. एकूण उन्हाळ्यात जलशक्‍ती परत ओढून घेण्याचे काम सुरू झाले की उन्हाळ्याची तक्रार न करता आपल्या वागण्याने उन्हाळा कसा सुसह्य होईल हे पाहणे इष्ट ठरेल. सूर्याच्या उष्णतेपासून तात्पुरत्या संरक्षणासाठी छत्रीचा वापर करता येतो. 

पाऊस पडत असताना सुटलेल्या गार वाऱ्यामुळे जर काही इच्छा उत्पन्न होत असेल तर ती असते ऊबदार पांघरूण घेऊन घरात बसण्याची. पावसाळा संपताना तो पुढच्या उन्हाळ्याची तयारी करायला साधारणतः सुचवतो.

पावसाळ्यानंतर जरी शरद ऋतू येणार असला व शरदाचे चांदणे पित्त शांत करणारे असले तरी शरदातही सूर्य आपला प्रभाव दाखवायला सुरवात करतोच. शरदानंतर सुरू होते थंडी. थंडी सुरू झाल्यावर मात्र शेकोटी, हिटर यांची नुसती आठवण काढून भागत नाही, तर या गोष्टी प्रत्यक्षात सुरू कराव्या लागतात. सूर्य हा सर्व वस्तुजाताचा जगत्पिता तेव्हा त्याला हे सर्व सहन न झाले तरच नवल. ‘‘मीच देतो नं उष्णता, बंद करा ते हिटर, पुरे झाली होळी’’ असे म्हणून तो मनुष्यमात्राला आधार देतो. अर्थात, एकदम घाबरून जाऊ नये म्हणून आधीच्या वसंत ऋतूत सावकाश सावकाश स्वतःच्या किरणांची उष्णता वाढवत नेऊन नंतर ग्रीष्म ऋतूची सुरवात होते. 

उन्हाळा तीव्र व्हायला लागला की त्याच्या झळा व ज्वाळा बंद घरातही येऊ लागतात, दुपारच्या वेळी नळ सोडला तर त्यातून उकळते पाणी येऊ लागते. या त्रासांबद्दल फारशी तक्रार करण्याचे काही कारण नाही. पण कितीही पाणी प्यायले तरी मूत्रविसर्जन होत नाही, मूत्रविसर्जन झालेच तर जळजळ जाणवते, शरीरावर घामाचा चिकचिकाट होतो अशा वेळी फळांचे रस घ्यावे म्हटले, तर बाजारातून मोसंबी अदृश्‍य झालेली असतात. राहता राहते रस देणारे फळ कलिंगड व उसाचा रस. अशा वेळी लिंबाचे सरबत, कोकमचे सरबत घ्यावे, कोकम चघळून त्यावर पाणी प्यावे, कैरीचे पन्हे प्यावे. किंवा नेहमीचा चहा न पिता जो चहा थंड पिता येतो असा चहा प्यावा. खूप सारे रससेवन केले तर त्यातल्या त्यात उन्हाळ्यातील उष्णतेपासून मनुष्य स्वतःला वाचवू शकतो. उन्हाळ्यात समुद्रकाठी फिरायला गेले तरी तिथली खारी हवा गरमच असते. अशा वेळी अंगकांती काळवंडली नाही तरच नवल. उन्हाळ्यात नेमकी लिंबे महाग होतात. पण असा विचार करून लिंबे स्वस्त असताना लिंबाचा रस साखरेच्या पाकात टाकून लिंबाचे सिरप का करून ठेवले जात नाही, याचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही. उन्हाळ्यात नेमके आंबे येतात, त्यांच्यावर ताव मारल्यास गळवे शरीरावर होत राहतात. ही गळवे चोळली वा फोडली तर अधिकच चिडचिड होते. 

लहान मुले शाळेत भरपूर पाणीही पिऊ शकत नाहीत व शाळेत तशी खात्रीशीर चांगली व्यवस्थाही नसते. रस वगैरे पिणे तर दूरच. अशा वेळी नाकाचा घोळणा फुटला नाही तरच नवल. उकाड्यामुळे डोक्‍यावर पाणी टाकावे म्हटले तर गणवेश ओला होतो. वास देण्यासाठी कांदा ठेवावा म्हटला तर बहुतेक सगळे कांदे काही अकलेच्या कांद्यांनी डोक्‍यात भरून घेतल्यामुळे शाळेत सुटा कांदा मिळणे अवघड असते.

अशा वेळी उन्हाळ्याचा त्रास अनेक प्रकारे होऊ लागतो. सुटी असल्याने वेळ भरपूर असतो, पण दुपारच्या वेळी बाहेर जाता येत नाही. दुपारच्या उन्हाची तिरीप अंगावरून गेल्यास उलट्या, जुलाब यांना सामोरे जावे लागते. पूर्वीच्या काळी एरंडीच्या किंवा नागवेलीच्या पानाला एरंडीचे तेल लावून अशी पाने डोक्‍यावर ठेवून त्यावर टोपी घालण्याची पद्धत होती. 

यात सगळ्यांत समाधानाची गोष्ट एकच असते की सुट्या सुरू होणार असतात. वेळेवर ठरविले असले, वेळेवर रिझर्व्हेशन्स केली असली तर कमी पैशात थंड हवेच्या ठिकाणी जाता येते. रेल्वेची हॉटेलची वेळेवर रिझर्व्हेशन्स केली नसली तर मात्र भरपूर अडचणी सोसून, भरपूर पैसे देऊन जवळच्या डोंगरावर जाण्याची वेळ येते. उन्हाळ्याच्या सुटीत थंड हवेच्या ठिकाणी परदेशी जाणारे भाग्यवानही सध्या वाढलेले दिसतात ही गोष्ट वेगळी.

परीक्षेच्या ताणाची उष्णता व बाहेरचा उन्हाळा यांनी स्वतःचा प्रभाव दाखविल्यानंतर मगच सुटीचा आनंद मिळू शकतो. हे सर्व पाहिले की सूर्याला एक नमस्कार घालून पुरत नाही, त्याला बारा नमस्कार का घालावे लागतात हे लक्षात येते. ‘तुझे नि माझे जमेना, परि तुझ्यावाचुनि करमेना’ असा हा आदित्यनारायण नसला तर सर्व विश्‍वच संपेल व तो असतो म्हणून आपले अस्तित्वच असते म्हणून त्याची कृपा मिळवावीच लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT