काही सुखद

आई-बहिणीच्या कष्टाने सोमनाथला ‘टू-स्टार’

कुणाल संत

नाशिक - दुसऱ्याच्या शेतात आई अन्‌ बहिणीने राबून सोमनाथ कोहरेला पोलिस दलातील उपनिरीक्षक पदापर्यंत पोचवले. सध्या तो भांडूप येथे कार्यरत आहे. विशेष म्हणजे, शालेय जीवनातील मित्र आणि महाविद्यालयातील गुरुजनांनी या आदिवासी तरुणामध्ये आत्मविश्‍वास जागवला.

जिल्ह्यातील कोहर (ता. पेठ) या आदिवासी-दुर्गम भागात जन्मलेला सोमनाथ कुटुंबातील सर्वांत लहान. घरची परिस्थिती हालाखीची. कुटुंबाला दोन वेळच्या भाकरीची भ्रांत. बहीण अन्‌ भावाचे शिक्षण सुटलेले. पण सोमनाथने उच्च शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावा, अशी आई-बहिणीची इच्छा. त्यासाठी दोघीही दुसऱ्याच्या शेतात राबू लागल्या. सोमनाथने पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण सरकारी आदिवासी आश्रमशाळेतून केले. शैक्षणिक खर्चासाठी तेराव्या वर्षापासून तो उन्हाळ्याच्या सुटीत नाशिकला बहिणीसमवेत दुसऱ्यांच्या शेतात राबायचा. बारावी झाल्यावर आईने पेठ अथवा हरसूलमध्ये पुढील शिक्षण घेण्यास सांगितले. मित्रांनी मात्र नाशिकमधील महाविद्यालयात शिक्षण घेतल्याने करिअरच्या कक्षा रुंदावतील, असा सल्ला दिला. मग आईने शेळी विकून आणि उसने पैसे घेऊन सोमनाथला नाशिकमध्ये पाठविले. शहरी वातावरणात सोमनाथ रमला नाही. नाशिकमध्ये शिक्षण घ्यायचे नाही, असे ठरवत त्याने घर गाठले. गावातील मित्रांनी समजूत काढून त्याला नाशिकला पाठविले.

झोपडीत राहून घेतले शिक्षण 
नाशिकला आल्यावर राहायचं कुठं? हा गंभीर प्रश्‍न होता. त्या वेळी बहिणीकडे राहायचा निर्णय घेतला. पंचवटीमधील तपोवनातील गोदावरी नदीकाठी बहिणीच्या झोपडीत तो राहिला. खर्चाचे काय? दुसरा प्रश्‍न. सकाळी सात ते अकरापर्यंत महाविद्यालयात शिक्षण घेत त्याने बांधकामावर आणि हॉटेलमध्ये मजुरी केली. मजुरीतून त्याने आईने घेतलेले कर्ज फेडले. पोलिस दलात अधिकारी झाल्यावर आई-वडिलांना घर बांधून दिले. बहिणीचीदेखील आर्थिक परिस्थिती चांगली झाली. त्यांनी गावात दारूबंदी केली. गावातील मुलांना मार्गदर्शन सुरू केले. वेळप्रसंगी ते आर्थिक मदतही करतात. 

उपनिरीक्षक झाल्यावर भेटला गुरूंना
महाविद्यालयात शिकताना सोमनाथला केटीएचएम महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय सावळे हे गुरू भेटले. त्यांनी त्याच्यातील गुण हेरून वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्याचवेळी सोमनाथने उपप्राचार्य पी. व्ही. कोटमे, उमा जाधव यांचादेखील विश्‍वास संपादला. जाधव यांनी त्याला मुलासारखे प्रेम दिले. नाशिक शहर पोलिस भरतीत २००९ मध्ये अनुसूचित जमाती राखीव जागांमध्ये सोमनाथने प्रथम क्रमांक मिळविला. शिपाई म्हणून पोलिस दलात दाखल झाला. मात्र सावळे यांची सोमनाथने अधिकारी होण्याची इच्छा अपूर्ण राहिली. अधिकारी झाल्याशिवाय सरांच्या घरी जाणार नाही, असा संकल्प सोमनाथने केला. चार वर्षे त्याला पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत अपयश यायचे. अपयशाने खचून न जाता सोमनाथने २०१४ च्या स्पर्धा परीक्षेत राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकाविला. हे यश त्यांनी सावळे सरांना सांगितले. सरांची नाराजी दूर झाली, अशी आठवण सोमनाथने सांगितली.

माझ्या आयुष्याच्या जडण-घडणीमध्ये आई-वडील-बहिणीप्रमाणे उपप्राचार्य संजय सावळे, उपप्राचार्य उमा जाधव, पी. व्ही. कोटमे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर जिवलग मित्र श्‍याम वाघारे तसेच कृष्णा महाले, अशोक गांगुर्डे, दीपक बर्वे यांच्या मदतीमुळे यश मिळविता आले. 
- सोमनाथ कोहरे, पोलिस उपनिरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHT 2025-26: काव्या मारनची परफेक्ट चॉईस! 30 लाखाच्या गोलंदाजाने भल्याभल्यांना नाचवले; IPL 2026 नक्कीच गाजवणार

फॉरेनर बायकोचा हट्ट पडलेला बॉलिवूड अभिनेत्याला महागात; परदेशी स्त्रीसोबतच्या लिव्ह इनने झाला पश्चाताप

Latest Maharashtra News Updates Live: राज ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, शिवसेनेच्या प्रकाश महाजन यांची टीका

Dharashiv News : इमारत तयार, पण सुविधा अद्याप बंद; येरमाळ्यात शासकीय विश्रामगृह ३ वर्षांपासून लोकार्पणाविना!

Jalgaon Municipal Election : जळगावचा 'पहिला नागरिक' कोण? महापौर आरक्षणाची टांगती तलवार, उमेदवारांच्या काळजाची धडधड वाढली

SCROLL FOR NEXT