Shriram Sawant
Shriram Sawant  sakal
कोकण

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; श्रीराम सावंतांच्या कारकीर्दीचा प्रारंभ

शिवप्रसाद देसाई

रघुनाथ महाराज (Raghunath Maharaj) उर्फ बाबासाहेब यांच्या पश्‍चात त्यांचे चुलतबंधू श्रीराम सावंत (Shriram Sawant) उर्फ रावसाहेब हे गादीवर बसले; मात्र ब्रिटिशांनी त्यांच्याकडे कारभार न देता नवा पोलिटिकल एजंट असा हुद्दा निर्माण करून कारभार आपल्याकडेच ठेवला. याकाळात मुलभूत सुविधा निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. श्रीराम सावंत यांच्या कारकीर्दीत राजकीयदृष्ट्या फारसे बदल झाले नाहीत. सगळा कारभारच ब्रिटिशांच्या पूर्ण अमलात आला.

रघुनाथ महाराज (Raghunath Maharaj)उर्फ बाबासाहेब यांना मुलबाळ नव्हते. त्यांच्या द्वितीय पत्नी लक्ष्मीबाई यांनी दत्तक पर्यायाचा स्विकार केला नाही. यामुळे रघुनाथ महाराजांच्या पश्‍चात त्यांचे चुलत बंधू श्रीराम सावंत उर्फ रावसाहेब यांचा गादीवर हक्क आला. २२ जुलै १९००ला त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. याचदिवशी संस्थानतर्फे सर्व राज्यकारभार राजेबहाद्दर यांच्या नावाने व शिक्क्याखाली पोलिटिकल सुप्रिटेडंन्ट यांनी चालवावा, असा ठराव करण्यात आला. पुढे पोलिटिकल सुप्रिटेडंन्ट ऐवजी पोलिटिकल एजंट असा हुद्दा निर्माण करण्यात आला. या ठरावाला राजेसाहेबांनी हरकत घेतल्याचेही कुठे आढळत नाही.

त्यांच्याकडे संस्थानची पागा, दरबार व देवस्थान या खात्यांसंबंधी कामांची पूर्ण जबाबदारी देण्यात आली. ते शांत प्रवृत्तीचे, सत्वशिल, चारित्र्यावान म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या शांत स्वभावाचे एक उदाहरण दिले जाते. एकदा ते डुकराच्या शिकारीसाठी गेले होते. हाकारे जंगलात ओरडून शिकार उठवत होते. स्वतः राजेसाहेब शिकारीच्या मार्गावर दबा धरून बसले होते. शिकार समोर दिसताच त्यांनी बंदूक चालवली; मात्र नेम चुकला; मात्र या मार्गावर आणखीही काही जण बंदूक रोखून होते. त्यामुळे हाळीवाल्यांना नेमका नेम कोणाचा चुकला हे समजले नाही. त्यांच्यापैकी एकाने शिवी हासडून ‘दुपारपासून रान उठवून आमच्या पोटात रक्त पडले आणि कोणी शिकार कोणी घालवली’ असे बडबडायला सुरूवात केली.

हे शब्द राजेसाहेबांच्या कानावर आले. त्यांनी कोण शिव्या घालतोय त्याला बोलवा, असा आदेश दिला. हे ऐकून तो हाळीवाला घाबरला; मात्र त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहून राजेसाहेबांना त्याने किती प्रामाणीकपणे काम केले हे लक्षात आले. त्यांनी त्याला ‘जा’ इतके सांगून विषय संपवला. राजगादीवर बसण्याआधी म्हणजे २८ फेब्रुवारी १८८८ ला रावसाहेबांचा विवाह इंगळीकर जहागिरदार यांच्या कन्या ताराबाई यांच्याशी झाला होता. त्यांचे नाव जानकीबाई असे ठेवले होते; मात्र जानकीबाईंचे ७ फेब्रुवारी १९०२ ला निधन झाले. राजपत्नीला योग्य असे सर्व गुण त्यांच्या अंगी होते. त्यांना चार मुली आणि एक मुलगा होता. संस्थानचे युवराज पंचमखेमराज उर्फ बापूसाहेब हे त्यांचे अपत्य. रावसाहेबांचे दुसरे लग्न १८ मे १९०३ ला अक्कलकोट संस्थानच्या राजकन्येशी झाला. त्यांचे नाव यमुनाबाई असे ठेवण्यात आले.

इकडे इंग्रजांनी संस्थानमध्ये मुलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. रघुनाथ महाराजांच्या काळातच याची सुरूवात झाली होती. १८८८च्या डिसेंबरमध्ये कर्नल वेस्ट्रॉप निवृत्त होवून मायदेशी परतले. त्यांच्या जागी कर्नल ए. एम. फिलीप्स हे आले. तेही दोन वर्षाने निवृत्त होवून कर्नल एच. एल. नट यांची पोलिटिकल सुप्रिटेडंन्ट म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या काळात १८९१ ला भाजीपाल्याचा व्यापार करणार्‍यांसाठी रघुनाथ मार्केट उभारण्यात आले. नट यांनी साक्षरता अभियान राबवले. यासाठी नाईट क्लास, डे क्लास सुरू केले. १८९६ ला ते निवृत्त झाले. त्यांच्या जागी एल. पी. वॉल्श यांची नेमणूक झाली. याच दरम्यान संस्थानात महागाई वाढायला सुरूवात झाली. १८९९ मध्ये खूपच कमी पाऊस पडला. याचे प्रमाण जवळपास ८८ इंच होते. पूर्ण कृषी क्षेत्र यामुळे अडचणीत आले. धान्य व इतर अन्न पदार्थांचे दर एकदम वाढले. यामुळे ब्रिटीशांनी विविध उपाय योजून यातून मार्ग काढले. १८९८ ला संस्थानचे कारभारी रावबहाद्दूर सखाराम बाजी बावडेकर यांनी निवृत्ती घेतली. त्यांच्या जागी विनायकराव पांडुरंग गुप्ते यांची नेमणूक झाली.

रावसाहेब गादीवर असतानाही ब्रिटिशांनी विविध सुधारणांचा धडाका सुरूच ठेवला. १९०४ मध्ये सावंतवाडी शहरातील नगरपालीकेची व्यवस्था मोडीत काढत सीटी वहीवाट खाते स्थापन करण्यात आले. त्याकाळातील पोलिटिकल एजंट कर्नल ओडोनेल हे दिर्घ रजेवर गेले. यामुळे प्रभारी कारभार कॅप्टन बर्थन यांच्याकडे आला. नंतर जुलै १९०५ मध्ये कर्नल हाईडकेट्स् यांची नेमणूक झाली. ऑक्टोबर १९०६ला त्यांचीही बदली होवून कर्नल डेव्हिस नियुक्त झाले. ते जून १९०८ मध्ये रजेवर गेले. त्यांच्या जागी मेजर जेकब यांना नियुक्त करण्यात आले. या काळात हत्यारबंद पोलिस यंत्रणेची व्यवस्था निर्माण करण्यात आली. चीफ पोलिस ऑफिसर नावाने मुख्य अंमलदार नेमण्यात आला. चोरी, मारामारी, खून, दरोडे आदी फौजदारी गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना अधिकार दिला गेला. एप्रिल १९०९ ला जेकब हेही बदलून गेले. यानंतर मेजर बर्थन, लेप्टनंट बॅरेट, मेजर पॉटिंजर यांनी काम पाहिले.

या काळात सावंतवाडीत मोठा दवाखाना आणि कुडाळ, बांदा, माणगाव छोटे दवाखाणे उघडण्यात आले. सावंतवाडीत सीटी वहिवाट खाते, कुडाळ, बांदा येथे सॅनिटेशन बोर्ड, देवीवर नियंत्रणासाठी देवी डॉक्टर आदी व्यवस्था निर्माण करण्यात आल्या. न्याय व्यवस्थेत प्रभावी बदल केले गेले. रस्त्यांच्या सुविधा विस्तारण्यात आल्या. रस्त्यालगत धर्मशाळा बांधल्या गेल्या. पोस्ट व्यवस्था अधिक प्रभावी केली गेली. सावंतवाडीत तार ऑफिस सुरू करण्यात आले. मुलांना आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी इंग्रजी, मराठी व हिंदूस्थानी शाळा उघडण्यात आल्या. शाळांची संख्या १४५ इतकी झाली. त्या काळात ६३०० विद्यार्थी आणि ६०० विद्यार्थिनी यात शिकायच्या. मागासवर्गीय मुलांसाठी स्वतंत्र शाळा उघडण्यात आल्या.

अशी दाखवली राजनिष्ठा

पाचवे जॉर्ज हे १२ डिसेंबर १९११ला दिल्लीच्या तक्तावर बसले. त्यांच्या सन्मानार्थ सावंतवाडीत मोठा दरबार भरवण्यात आला. त्या दिवशी दीपोत्सव साजरा केला गेला. ब्रिटिशांप्रती राजनिष्ठा दाखवण्यासाठी हा सोहळा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT