no well in this village but even in summer there are flowing springs in kokan
no well in this village but even in summer there are flowing springs in kokan 
कोकण

या गावात एकही विहीर नाही पण उन्हाळ्यातही वाहतात खळखळणाऱ्या पाण्याचे झरे

नीलेश मोरजकर

सिंधुदुर्ग :  रणरणत्या उन्हातही गावात पाटांतून खळाळणारे पाणी, आल्हाददायक वाऱ्याने सळसळणारा उत्साह, नारळी-पोफळींचा उंचच उंच पडलेला वेढा याही पलीकडे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या असनिये गावची ओळख आहे. वर्षभर दारूबंदी पाळणाऱ्या आणि बिनविहिरींच्या या गावाने खऱ्या अर्थाने संस्कृती आणि निसर्गसंपन्नतेचा वारसा जपला आहे. 


असनिये सावंतवाडी तालुक्‍याच्या टोकाला वसलेले गाव. पश्‍चिम घाटातील सर्वोच्च जैवविविधतेचे म्युझियम भासावे, असे. या संपन्नतेचे रहस्य येथील लोकजीवनात लपलेले आहे. सुसंस्कृतपणा येथे पिढ्यान्‌पिढ्या जपलेला आहे. यावर बंधन ठेवण्याची किल्ली इथल्या धार्मिक रूढी-परंपरांमध्ये आहे. ग्रामदैवत श्री देवी माऊली आणि माहेरवाशिणींचा देव अशी ओळख असलेल्या श्री देव वाघदेवाला येथील प्रत्येक व्यक्‍ती आपले श्रद्धास्थान मानते. 


येथे एकही विहीर नाही. गावात विहीर खोदल्यास ती यशस्वी होत नाही, अशी श्रद्धा अनेक वर्षांपासून रूढ आहे. याचा परिणाम म्हणून येथे पाण्याचा अतिरिक्‍त उपसा होत नाही. साहजिकच येथील नैसर्गिक जलस्रोत मजबूत आहेत. गावात तब्बल 83 झरे बारमाही पाणी देतात. अगदी मेमध्येही खळाळणारे थंडगार पाणी नुसती तहान भागवत नाही, तर गावच्या आर्थिक उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या नारळ-सुपारीच्या बागांनाही संजीवनी देते. येथे समृद्ध अशी देवराई आहे. अनेक वनऔषधींचे आगर या गावात दिसते. दुर्मीळ होत चाललेल्या बऱ्याच पशुपक्ष्यांचे येथे सहज दर्शन होते. पट्‌टेरी वाघाच्या कॉरिडॉरमध्ये या गावाचा समावेश आहे. त्यामुळे बरेच पर्यावरण-अभ्यासक गावाला आवर्जून भेट देतात.

 
कधीकाळी सह्याद्रीच्या सान्निध्यातील जवळपास सर्वच गावांत अशी संपन्नता टिकून होती; मात्र मानवी हस्तक्षेपाने त्याचे प्रमाण घटले; मात्र असनियेचे लोकजीवन या संपन्नतेला टिकवण्याच्या दृष्टीने बनले आहे. यामुळे इथला माणूस खऱ्या अर्थाने निसर्गाचा भाग बनला आहे. पिढ्यान्‌ पिढ्या चालत आलेल्या काही चांगल्या प्रथांमुळे गावाची ही संपन्नता टिकली आहे. श्री देव वाघदेवाला मद्यपान केलेले चालत नसल्याची श्रद्धा येथे अनेक पिढ्यांपासून जपली जात आहे. शिमगोत्सवात होणाऱ्या रोंबाट कार्यक्रमात अवघ्या काही तासांसाठी दारूबंदीचे हे बंधन शिथिल होते. इतर दिवस मात्र ही प्रथा काटेकोरपणे पाळली जाते. यामुळे गावाचे सुसंस्कृतपण जपले आहे, शिवाय तरुण पिढी व्यवसनाधीन होण्याचा धोका गावच्या वेशीवरच थांबला आहे. 


असे आहे पाण्याचे व्यवस्थापन
असनियेची पाणीव्यवस्था पूर्णतः नैसर्गिक जलस्रोतांवर अवलंबून आहे. गावात नळयोजना कार्यरत असून, तीन वाड्यांसाठी तळी उभारून त्यांत पाणीसाठा केला जातो. उर्वरित वाड्यांसाठी थेट झऱ्याचे पाणी पाइपलाइनद्वारे घरापर्यंत पोहोचविले जाते. बहुसंख्य पाणीव्यवस्थापन गुरुत्वाकर्षणाचा वापर करून चालते. गावात बागायतीसाठीचे डोंगरातील झऱ्यांचे पाणी पाटांद्वारे आणून वापरले जाते. ही व्यवस्था अनेक पिढ्या कायम आहे.

खनिज प्रकल्प परतवून लावला
येथे पर्यावरणाविषयी पिढीजात जागृती आहे. काही वर्षांपूर्वी येथे खनिज प्रकल्प होऊ घातला होता. या विवादात अख्खा गाव एकवटला. त्यांनी शिस्तबद्ध विरोध करत खनिज प्रकल्पाला परतवून लावले. ही ताकद ग्रामस्थांना त्यांच्यात पिढीजात असलेल्या निसर्गप्रेमातून मिळाली. 


ईकाची वाटी ठरली श्रद्धास्थान
येथे काही पिढ्यांपूर्वी एक गोसावी बाबा वास्तव्याला होते. त्यांच्याकडे एक अद्‌भुत वाटी होती. तीतील तीर्थ घेतल्यास माणूस आजारमुक्‍त होतो, अशी श्रद्धा होती. या आख्यायिकेतील ती "ईकाची वाटी' आजही भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यातील तीर्थ घेण्यासाठी शिमगोत्सव काळात लाखो भाविक गावात येतात. 


""सह्याद्रीच्या पट्ट्यातील आमचे गाव पर्यटनासाठीही आकर्षण आहे. बारमाही समृद्ध असलेल्या या गावात पर्यटनविकासासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. येथे आताही निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संशोधक येतात.''
-गजानन सावंत, माजी सरपंच, असनिये

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT