कोकण

सावंतवाडीतील शिवउद्यानाची ब्रेकजर्नी 

रूपेश हिराप

भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ 
1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या उद्यानात निधी खर्चून हे उद्यान 1997 मध्ये पूर्ण करण्यात आले. शहराचे वैभव म्हणून येथील मोती तलाव ओळखला जातो. त्याचप्रमाणे अलीकडे जगन्नाथराव भोसले शिवउद्यानाची ओळख निर्माण झाली आहे. अलीकडच्या काळात खासगी व शासकीय उद्याने उदयाला आली; मात्र 1996-97 काळात विकसित झालेले उद्यान हे जिल्ह्यातील एकमेव असे पर्यटनस्थळ होते. त्यामुळे या ठिकाणी जिल्ह्याभरातून नागरिक विरंगुळ्यासाठी आपल्या मुलांसह भेट देत असत.

जनरल जगन्नाथराव भोसले नामकरण 
उद्यानाचे काम पूर्ण होताच याला आझाद हिंद सेनेचे सेनानी आणि सावंतवाडीचे थोर सुपुत्र देशभक्‍त जनरनल जगन्नाथराव भोसले स्मृती उद्यान, असे नामकरण करण्यात आले. राष्ट्रवादीचे शरद पवार व तत्कालीन केंद्रीय कायदा राज्यमंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्‌घाटन झाले. तरुण पिढीमध्ये देशप्रेम, देशभक्‍ती आणि शिस्त वाढावी, हा त्यांचा ध्यास आजही पूर्ण व्हावा यासाठी पालिकेने त्यांच्या नावाला प्राधान्य दिले होते. 

उद्यानाचा नामविस्तार 
शासकीय निधी व पालिकेच्या माध्यमातून हे उद्यान पूर्ण झाल्यानंतर त्याला जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान, असे नामकरण दिल्यानंतर या उद्यानाला शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, यासाठी शिवसैनिकांनी त्यावेळी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत या उद्यानाना जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, असे पुन्हा नाव देण्यात आले. 

एकमेव पर्यटनस्थळ 
सावंतवाडी येथील हे उद्यान त्याकाळात जिल्ह्यातील एकमेव असे शासकीय मोठे उद्यान म्हणून पाहिले जात होते. खेळण्या-बागडण्यासाठी लहान मुलांना उद्यान म्हणून सावंतवाडी हाच पर्याय होता. त्यामुळे जिल्ह्यातून लोक याठिकाणी येत असत त्यामुळे या उद्यानाचे नाव जिल्हाभरात झाले होते. आज अनेक ठिकाणी खासगी व शासकीय गार्डन झाली; मात्र त्याकाळी एकमेव असे सावंतवाडीचे उद्यान हे शासकीय मालकीचे उद्यान होते. 

विकासाकडे वाटचाल 
जिल्ह्यात एकमेव असलेल्या या उद्यानाचा शासनाच्या विविध योजनामधून हळूहळू विकास होत गेला. या काळात मनोरंजनाची खेळणी उद्यानात बसविण्यात आली. परिणामी लाहान मुलांचे आकर्षण या उद्यानाकडे वाढत गेले. आज अनेक खेळणी आहे; मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे निधीअभावी या खेळण्याची देखभाल दुरुस्ती म्हणावी तशी होत नाही. असे असले तरी पालिका आपल्यापरीने या उद्यानाची देखभाल करत आली आहे. सुरवातीच्या काळात या उद्यानाचा ज्याप्रमाणे विकास झाला त्याची तुलना करता हे स्थळ आता कुठेतरी मागे पडल्याचे चित्र आहे. याला प्रमुख कारण म्हणजे शासनाची उदासीनता म्हणावी लागेल. याचे उदाहरण म्हणजे उद्यानात सद्यस्थितीत असलेले बंद प्रकल्प होय. 

विकासाचा चढउतार 
सध्या या उद्यानाला वेगळेचे रूप मिळाले आहे. पूर्वी उद्यान आणि आत्ताचे उद्यान यात मोठा फरक आहे. उद्यानाचा भौगोलिक विकास करताना यामध्ये फ्लेवर बॉक्‍स बसविणे, विविध जातीचे व शोभेची फुलझाडे लावणे, आतमध्ये बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था, पर्यटकांसाठी रेस्टॉरंट, पार्किंग व्यवस्था, कृत्रिम धबधबा, तलाव, संगीत कारंजे, कार्यक्रमासाठी स्टेज आदी विकासावर भर देण्यात आला. यातील बऱ्याच सुविधा आज बंद आहेत. रोजगाराच्या माध्यमातून उद्यानात सुरू करण्यात आलेले रेस्टॉरंट आज बंद आहे. याशिवाय संगीत कारंजे, मोनोरेल, तलाव हे महत्त्वाचे प्रकल्प आज बंद असल्याने उद्यान असून सुविधा नसल्यासारखे आहे. त्यामुळे खेळण्या व्यतिरिक्‍त या उद्यानात विरंगुळ्याचे फारसे साधन नाही. 

देखभालीवर साडेतीन लाख खर्च 
पालिकेच्या या उद्यानातील अर्धे प्रकल्प बंद असताना पालिका प्रशासन पालिकेच्या फंडातून वर्षाला साडेतील लाख रुपये खर्च करत आहे. यामध्ये कर्मचारी पगार आदींचा खर्च आहे; मात्र बंद प्रकल्प सुरू असते तर या खर्चाला महत्त्व आले असते. 

नवीन खेळणी बसविण्याची तरतूद 
उद्यानातील मोडकळीस आलेली खेळणी बदलून त्या ठिकाणी नवीन खेळणी बसविण्याची तरतूद पालिकेने केली असून लवकरच याची पूर्तता करण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण उद्यानाच्या सभोवती पंधरा लाख रुपये खर्च करून कंपाऊड वॉल बांधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याशिवाय बंद पडलेल्या संगीत कारंजेच्या जागेत कमळाची लागवड करण्याची तरतूद पालिकेने केली आहे. 

ऍम्युझमेंट पार्क सत्यात उतरणार का? 
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ऍमेझमेंट पार्कची केलेली घोषणा येणाऱ्या काळात सत्यात उतरणार का अशा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ऍम्युझमेट पार्क होण्यसाठी इनडोअर गेम, इलेक्‍ट्रीक खेळणी, कॉईन ऑपरेट गेम याठिकाणी उनलब्ध करून द्यायला हवेत. 

उद्यानाचा इतिहास 
सावंतवाडी उद्यानाची जागा बागकर शेती म्हणून ओळखली जायची. या ठिकाणी पूर्वी मुले क्रिकेट खेळायची. शिवाय राजकीय सभा या ठिकाणी व्हायच्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सभा याठिकाणी झाल्या. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषणाही याच ठिकाणच्या सभेच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली होती. 

घोषणा झाली पण... 
या उद्यानाला बदलत्या स्थितीनुसार नवे रूप देणे आवश्‍यक होते. हा खर्च पालिकेला स्वनिधीतून करणे कठीण होते. या पार्श्‍वभूमीवर चांदा ते बांदा योजने अंतर्गत या उद्यानाचा विकास साधताना मोनो रेल, शिवाय ऍम्युझमेंट पार्कच्या धर्तीवर उद्यानात खेळणी उपलब्ध करून देणार, अशी घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोन वर्षांपूर्वी येथील सावंतवाडी पर्यटन महोत्सवात केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पर्यटन विकास महामंडळाच्या जिल्ह्याच्या कार्यालयाकडे निधी उपलब्ध करून देणार, असे आश्‍वासन दिले होते; मात्र ऍम्युझमेंट पार्कचे सोडा; पण मोनोरेलचे आश्‍वासनही अद्याप पूर्ण झालेले नाही. 

कासवचाल संपणार कधी? 
हे उद्यान पालिकेच्या ताब्यात आहे. याच्यात सुधारणा करण्याची जबाबदारी पालिकेकडे द्यायला हवी; पण चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शहरातील उद्यानासह चार पर्यटनस्थळांसाठी 2 कोटी 80 लाखांचा निधी राज्य पर्यटन विकास महामंडळच्या जिल्हा कार्यालयाकडे वर्ग केला. यातील उद्यानाच्या वाट्याला येणाऱ्या निधीतून काही कामे सुरू झाली; पण त्याला गती नसल्याचे दिसून येत आहे. मुळात पालिकेकडे हा निधी न देता तो पर्यटन महामंडळाडे का वर्ग केला? हा संशोधनाचा भाग आहे; पण एमटीडीसीच्या जिल्ह्यातील इतर कामांचा आढावा घेतला तर ही यंत्रणा किती सक्षम आहे याची प्रचिती येते. त्यामुळे उद्यान विकासाची कासवचाल कधी संपणार? असा प्रश्‍न आहे. 

शिवउद्यनातील मोनो रेल ही सध्या गार्डनमध्ये असल्याने बंद ठेवली आहे. इतर बंद प्रकल्प काही किरकोळ कारणामुळे बंद आहेत. ते सुरू करण्याचा पालिकेचा व नगराध्यक्ष म्हणून प्रयत्न राहील. यासाठी निधीची तरतूद केली जाईल. शिवाय उद्यानात लहान मुलांसाठी नव्याने खेळणी उपलब्ध करून देण्यात येतील. 
- बबन साळगावकर,
नगराध्यक्ष सावंतवाडी पालिका 

चांदा ते बांदा योजनेच्या समितीकडून सावंतवाडी येथे ऍम्युझमेंट पार्कसाठी तयार केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे; मात्र याची निविदा निघआली नसल्याने हे काम रखडले आहे. या प्रकल्पासाठी जवळपास एक कोटीचा खर्च अपेक्षित असुन मोनो रेलसाठी 70 लाखांची तरतूद आहे. 
- संजय कलपे,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, ओरोस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT