कोकण

प्रतिकुल परिस्थितीतही राजमाता धोरणांवर ठाम

CD

पाऊलखुणा ः भाग - १०६

प्रतिकुल परिस्थितीतही राजमाता धोरणांवर ठाम

लीड
राजमातांचा रिजंट पदाचा काळ खूप संघर्षाचा होता. या काळात अनेक घडामोडी झाल्या. अगदी दुसरे महायुद्ध, मंदी इथपासून ते संस्थान विलीनीकरणापर्यंतच्या गोष्टींचा यात समावेश होतो. असे असूनही शिक्षण, वाचन संस्कृती आदी लोकांमध्ये मूलभूत बदल घडवणाऱ्या, तरीही आणीबाणीच्या काळात बाजूला पडणाऱ्या गोष्टींना राजमातांनी दुय्यम मानले नाही. प्रतिकूल स्थितीतही या क्षेत्राला त्यांचे प्राधान्य होते.
---------------------------------
राजमाता पार्वतीदेवी यांचा रिजंट पदाचा कार्यकाळ आदर्श ठरविण्यासाठी अनेक गोष्टी लक्षवेधी आहेत. त्यांनी मुळातच संस्थानचा कारभार अतिशय प्रतिकुल परिस्थितीत हातात घेतला. बापूसाहेब महाराजांचे काम पुढे नेण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर होते. अर्थात त्या फक्त नामधारी कारभार करू शकल्या असत्या. तसे झाल्यास ब्रिटिश पुन्हा संस्थानच्या कामकाजात हस्तक्षेप करणार होते; मात्र राजमातांनी ‘मिशन’ हाती घेतल्याप्रमाणे झपाटून काम केले. प्रतिकूल परिस्थितीशी लढताना सर्रास शिक्षण, सांस्कृतिक प्रगती आदी क्षेत्रं बाजूला पडतात. एखादे कुशल आणि लोकांच्या प्रगतीविषयी मनस्वी इच्छाशक्ती असलेले नेतृत्वच या क्षेत्राला अशा संघर्षाच्या काळात महत्त्व देऊ शकते. राजमाता त्यातीलच एक होत्या.
त्यांचा रिजंट पदाचा कार्यकाळ १९३७ पासून संस्थान विलीनीकरणापर्यंत होता. या काळात अनेक घटना घडल्या. बापूसाहेब महाराजांच्या आकस्मिक निधनानंतर पोरक्या झालेल्या सावंतवाडी संस्थानाची जबाबदारी त्यांच्यावर आली; मात्र त्याचवेळी महाराजांच्या जाण्याने राजमातांचे सर्वस्व हिरावले गेले होते. त्या स्थितीतही खंबीरपणे कारभार हाती घेणे ही मोठी गोष्ट होती. सप्टेंबर १९३९ पासून दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. तब्बल पाच वर्षे चाललेल्या या युद्धाने अर्थकारण पूर्ण बिघडवून टाकले. जागतिक स्तरावर अन्नटंचाई, मंदी आदीची लाट आली. अशा घटनांचा सर्वाधिक परिणाम दुर्गम, आर्थिकदृष्ट्या मर्यादा असलेल्या आणि विकसनशील भागावर सगळ्यात आधी होतो. सावंतवाडी संस्थानला याचे थेट परिणाम महायुद्धानंतर काही काळातच जाणवू लागले. याच दरम्यान संस्थानात मलेरियाची साथ फैलावली. त्याचा मुकाबला करायला अनेक मर्यादा होत्या. ऑगस्ट १९४२ पासून देशात स्वातंत्र्याचा लढाही तीव्र होऊ लागला. लोकशाहीचे वारे वाहू लागले. यामुळे संस्थान म्हणून कारभार हाकताना एक प्रकारची अनिश्‍चितता निर्माण झाली. देश स्वतंत्र झाला. संस्थानचे विलीनीकरण झाले. या सगळ्या घटना राजमातांच्या कुशल प्रशासक म्हणून परीक्षा घेणाऱ्या होत्या. त्याचा त्यांनी संयम आणि धीराने मुकाबला केला. आपली वेगळी छाप निर्माण केली.
हे सगळे सुरू असताना त्यांचे प्रजेच्या हिताच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष होते. यात त्यांना आवश्यक अन्नधान्याबरोबरच शिक्षण, प्रौढ साक्षरता याशिवाय वाचन संस्कृती विस्ताराकडेही त्या पाहत होत्या. वास्तविक वाचन संस्कृती हा अनेकदा राज्य चालवताना काहीसा बाजूला पडणारा विषय असतो. अगदी आताच्या स्थितीतही त्याचा अनुभव येतो; मात्र पुरेशी साक्षरता नसलेल्या, मर्यादित शिक्षण सुविधा पोहोचलेल्या त्या काळातही राजमातांनी वाचनालय, वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केले. खरं तर हे धोरण बापूसाहेब महाराजांनी ठरवले होते. बडोदा संस्थानात वाचनालय वाढीसाठीचे प्रयोग यशस्वी झाले होते. गाव तेथे वाचनालय, पत्र्याच्या पेटीतून फिरते वाचनालय आदी उपक्रमांची त्या काळात चर्चा होती. राजमाता पार्वतीदेवींनी लहानपणापासून या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. त्या स्वतः उत्तम वाचक होत्या. अनेक दर्जेदार ग्रंथ त्यांच्या संग्रही होते. साहजिक त्यांनी संस्थानातही ग्रंथालय चळवळीला बळ देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बापूसाहेब महाराजांनी साक्षरतेसह ग्रामीण भागात फिरते ग्रंथालय सुरू केले होते. त्याचाच पुढचा टप्पा राजमातांनी राबविला. त्यांच्या प्रेरणेने काही ग्रंथालये सुरू झाली. तुळसमधील श्रीमंत राणी पार्वतीदेवी वाचनालय हे याचे उदाहरण म्हणता येईल. राजमातांच्या प्रेरणेने १६ मे १९३९ मध्ये याची सुरुवात झाली. त्या काळात संस्थानतर्फे वार्षिक २५ रुपये मदत या ग्रंथालयाला केली जायची. या स्थापनेआधी राजमातांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालय समिती स्थापन केली होती. यात स्थानिक सदस्य आणि पदाधिकारी होते. शिवाय १२ ग्रामस्थांची एक समितीही स्थापली होती. वाचनालयाशी संबंधित ग्रंथपाल, हिशोब तपासणी आदी कामे हे समिती सदस्य करायचे.
----
महिलांनाही वाचनालयाचा लाभ
राजमातांच्या काळात वाचनालयात २५०० पुस्तके होती. विविध मासिके, वर्तमानपत्रेही वाचनालयात यायची. याला वाचकांचाही चांगला प्रतिसाद मिळायचा. पुरुषच नाही तर महिलाही वाचनालयाचा लाभ घ्यायच्या. या प्रतिसादावरून राजमातांच्या वाचन संस्कृती रुजविण्याच्या प्रयत्नांना किती यश मिळाले होते, याची प्रचिती येते. संस्थानात त्यापूर्वीपासून वाचनालये होती, त्यांनाही राजमातांनी बळ दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT