आंजर्ले ग्रामस्थांच्या जागेत माती उत्खनन
महसूलकडून पंचनामा ; दंडात्मक कारवाई करणार
दाभोळ, ता. २१ : आंजर्ले येथील ताडाचाकोंड सावणेकरीण मंदिराजवळच असलेल्या समस्त आंजर्ले ग्रामस्थांच्या जागेतील अनाधिकृतरित्या केलेल्या माती उत्खननावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यानी ग्रामस्थांच्या उपस्थितीत कारवाई करत पंचनामा केला.
आंजर्ले सावणे येथे समस्त ग्रामस्थांच्या जागेतून मिलिंद निजसुरे यांनी ९८.९४ ब्रास माती व ग्रामपंचायतिच्या जागेतून मातीचे उत्खनन करून ती स्वतःच्या मालकीच्या जागेत टाकली. आंजर्ले येथील ग्रामस्थांनी निजसुरे यांना उत्खनन करू नका असे सांगूनही उत्खनन सुरूच असल्याचा आरोप करत ग्रामस्थानी दापोली येथील तहसील कार्यालयात तक्रार केली. नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांनी जागेवर जावून पंचनामा केला असून लवकरच निजसुरे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली. नायब तहसीलदार शिराळकर यांच्या भेटीवेळी आंजर्लेचे प्रभारी सरपंच व उपसरपंच मंगेश महाडीक, सदस्य प्रथमेश केळसकर, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश म्हादलेकर, माजी सरपंच संदेश देवकर, हेड कॉन्स्टेबल कमलाकर चौरे, कॉन्स्टेबल शिवहरी दळवी, पोलिसपाटील जगदीश कलमकर उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.