काही सुखद---लोगो
15294
---------
सप्रेवाडी शाळेचे विद्यार्थी शिकताहेत जर्मन भाषा
लोकल टू ग्लोबल उपक्रम; परदेशी भाषांतून रोजगाराची संधी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १ः राज्यातील मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर, अशा मथळ्याची बातमी जवळपास नेहमीच वाचत असतो. भरमसाठ शुल्क आकारून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून आपला पाल्य प्रगती करतो, असा एक गोड गैरसमज सध्या प्रत्येक पालकांचा झालेला दिसतो; परंतु दर्जेदार शिक्षण हे पैशाने नाही तर उत्तम शिक्षकच देऊ शकतात. असेच एक उदाहरण देवधामापूर सप्रेवाडीतील शाळेत पाहायला मिळते आहे. येथील विद्यार्थी मराठी, इंग्रजी भाषेबरोबरच जर्मन भाषेचे धडे घेत आहेत.
विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास घेत असताना त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या शाळेत विविध उपक्रम राबवले जात आहेत. शाळेचे मुख्याध्यापक अरूण जाधव आणि सहाय्यक शिक्षक सतीश वाकसे यांची या शाळेत नेमणूक झाल्यानंतर येथील वातावरणच बदलून गेले आहे. विद्यार्थ्यांचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. देवधामापूर सप्रेवाडी शाळेत पहिली ते चौथीच्या मराठी शाळेत लोकल टू ग्लोबलचा अभिनव प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर साकारला जात आहे.
महाराष्ट्र राज्याने जर्मनीतील बाडेन वूटनबर्ग राज्याशी कौशल्य विकास रोजगारासाठी एक करार केला आहे. या अंतर्गत येणाऱ्या काळात जर्मनी देशात अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जर्मनीत रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांना किमान जर्मन भाषेचे ज्ञान व्हावे यासाठी शिक्षण विभागाच्या अधिनस्त एससीआरटी या संस्थेमार्फत राज्यातील २५०० प्राथमिक शिक्षकांना जर्मन शिकण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत जर्मनीत जाणाऱ्या युवकांना हे जर्मन भाषा प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या अंतर्गत देवधामापूर सप्रेवाडी शाळेचे साहाय्यक शिक्षक सतीश वाकसे हे प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांत उतरण्याच्या ध्येयाने त्यांनी आपल्या शाळेतील मुलांना हे जर्मन भाषा ज्ञान दिले आहे. विशेष म्हणजे या शाळेतील मुले लाखापर्यंतच्या संख्यांचे जर्मन भाषेत वाचन करतात. याच शाळेतील विद्यार्थिनी स्वरा पाष्टे व मनस्वी पाल्ये या चौथीच्या विद्यार्थिनी अस्खलित जर्मन संख्या तर वाचतातच; पण जर्मन भाषेत आपला परिचय देऊन स्तिमित करतात. याबद्दल वाकसे यांनी मुख्याध्यापक अरूण जाधव, शिक्षण समिती अध्यक्ष सतीश सप्रे, उपाध्यक्षा सुहासिनी भाताडे यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
चौकट
शिक्षकांना विनामूल्य प्रशिक्षण
कोल्हापूरचे केदार जाधव हे जर्मनीतील म्युनिक शहरात मुख्य अभियंता म्हणून नोकरी करत आहेत. ते जर्मन भाषेत सध्या ऑनलाईन प्रशिक्षण देतात. सर्वसामान्यांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी शाळेतील प्राथमिक शिक्षकांसाठी जाधव हे विनामूल्य प्रशिक्षण देतात. जाधव यांना मराठी शाळांबद्दल आत्मियता आहे. आज त्यांच्यामुळेच देवधामापूर शाळेतील मुलांना जर्मन शिकण्याची संधी मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.