२७१७७
रत्नागिरी जिल्हा वार्तापत्र
बालेकिल्ल्यातून ठाकरे सेनेचे उच्चाटन
शिवसैनिकांत शिंदे भारीः लाडक्या बहिणींसह भाजपची साथ
राजेश कळंबटे : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेने ठाकरे सेनेला शह देत जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निकालांचा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे तो जिल्ह्यातील निष्ठावान म्हणवून घेत असलेल्या शिवसेनेचे बालेकिल्ल्यातून उच्चाटन. भाजपला यात काहीही फायदा झाला नाही, हे निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य. महिला मतदारांचा वाढलेला टक्का सत्ताधारी शिवसेनेच्या विजयी उमेदवारांसाठी उपयुक्त ठरला आहे. महायुतीच्या विजयात ‘लाडकी बहीण’ योजना महत्त्वाची ठरली आहे.
नियोजनबद्ध राबवलेली प्रचार यंत्रणा, भाजपची मिळालेली साथ आणि अल्पसंख्याक मतांचे गुहागर वगळता टळलेले ध्रुवीकरण महायुतीच्या उमेदवारांना फायदेशीर ठरले. महाविकास आघाडीचा आयात उमेदवारांना संधी देण्याचा फंडा अयशस्वी झाला. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा ठाकरेंचा नव्हे, तर शिंदे शिवसेनेचा बालेकिल्ला ठरला आहे. पाचपैकी चार जागांवर महायुतीला यश मिळाल्याने महाविकास आघाडीला धक्का बसलेला आहे.
दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर या पाच मतदारसंघांतील निकाल जाहीर झाले असून, ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वी दोन जागा ठाकरे सेनेकडे, दोन शिंदे शिवसेनेकडे, तर एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असे चित्र होते; मात्र निवडणुकीनंतर महायुतीकडे चार आणि आघाडीकडे एक जागा राहिली आहे. अडीच वर्षांनंतर राज्यात निर्माण झालेल्या पक्षफुटीच्या वादळानंतर कोकणातील शिवसेना कुणाच्या बाजूने राहणार, याची उत्सुकता होती; मात्र जिल्हावासीयांचा कौल सत्ताधाऱ्यांच्या बाजूनेच राहिलेला आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेला पाचही मतदारसंघांत मताधिक्यही मिळाले. तेच चित्र विधानसभेलाही राहील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती; परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेचा फटका बसला. अगदी ठाकरे सेनेने राखलेल्या गुहागर मतदारसंघातही लाडक्या बहिणीचा चमत्कार दिसला. ठाकरे सेनेचे शिलेदार ठाम राहिल्यामुळेच आमदार भास्कर जाधव थोडक्या मतांनी विजयी झाले; मात्र तिथे महायुतीचा कुणबी फॅक्टरचा प्रयोग काहीअंशी उपयुक्त ठरल्याचे दिसते. त्याचबरोबर महायुतीमधील जिल्ह्यात एकमेव जागा असलेल्या चिपळुणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर मात केली. तिथे ठाकरे शिवसेनेच्या मतांचे विभाजन करण्यात महायुतीला यश मिळाल्याचे दिसते. संगमेश्वर तालुक्याने युतीचे आमदार शेखर निकम यांना तारले.
जिल्ह्यात भाजपला एकही जागा न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, अशी अटकळ बांधली जात होती; परंतु अखेरच्या टप्प्यात भाजपच्या नेत्यांमधील दुरावा अन् रुसवा कमी करण्यात वरिष्ठांना यश आले. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी योग्यवेळी शिष्टाईही केली. त्यामुळे पाचही ठिकाणी भाजपने शिंदे शिवसेनेला चांगली साथ दिली तसेच महाविकास आघाडीची धुरा असलेली अल्पसंख्याकासह संविधानाच्या बाजूने असलेली मते वळवण्यात काहीअंशी महायुतीच्या उमेदवारांना यश आले. त्यामुळेच विजयाची गणिते साधत महायुतीने जिल्ह्यात महाविकास आघाडीला धक्का दिला. या निवडणुकीने लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व हिरावून घेतले आहे.
चौकट
यामुळे महायुतीचे वर्चस्व...
लाकडी बहीण योजनेचा फायदा
योग्य उमेदवारांची निवड
अल्पसंख्याक मते फोडण्यात यश
कुणबी समाजाची मतेही वळवली
चौकट
यामुळे बसला मविआला धक्का...
फाजील आत्मविश्वास नडला
आयात उमेदवारांची खेळी फसली
प्रचार नियोजनात सुसूत्रतेचा अभाव
अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण यावेळी फसले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.