सागरी सुरक्षारक्षक तीन महिने पगाराविना
जिल्ह्यातील ६८ जणांचा प्रश्न; मत्स्य विभागाकडून पाठपुरावा सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ः सागरी सुरक्षेच्यादृष्टीने जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर उद्यापासून ड्रोनने हवाई नजर ठेवली जाणार आहे; परंतु जमिनीवर राहून लॅंडिंग पॉइंटची सुरक्षा करणारे सुरक्षारक्षक सध्या आर्थिकदृष्ट्या असुरक्षित असल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यातील ६८ सागरी सुरक्षारक्षक गेले ३ महिने पगाराविना काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली असून, उपासमारीची वेळ आली आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाने त्यांची पगाराची बिले शासनाला पाठवली आहेत. शासनाकडून लवकरच पगार होईल, असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्याला सुमारे १६७ किमी इतका किनारपट्टीचा भाग लाभला आहे. यामध्ये काही संवेदनशील ठिकाणांचा देखील समावेश आहे तर ४३ मासळी उतरण्याची केंद्रे (लॅंडिंग पॉइंट) आहेत; मात्र या किनारपट्टीवरील सुरक्षेची जबाबदारी सुरक्षारक्षकांवर आहे. तीन पाळ्यांमध्ये हे सुरक्षारक्षक या केंद्राची सुरक्षा करतात; परंतु किनाऱ्याचे रक्षण करणारे सुरक्षारक्षकच गेली तीन महिने मानधनाविना काम करत आहेत. शासनस्तरावर अद्यापही यावर ठोस उपाययोजना होत नसल्याकारणाने सुरक्षारक्षकांचे मानधन नेहमीच उशिराने होत आहे. कधी चार तर कधी सहा महिने अशा कालावधीमध्ये सुरक्षारक्षकांचे मानधन जमा होत असल्याकारणाने सुरक्षारक्षक मेटाकुटीस आले आहेत. सुरक्षारक्षकांच्या कुटुंबाचीदेखील आर्थिक हेळसांड होत आहे.
जिल्ह्याच्या किनारी भागात अवैध मासेमारी, परराज्यातील नौकांचे अतिक्रमण, पर्ससीन मासेमारी यांसारख्या गोष्टीवर नियंत्रण राखण्याचे काम या सुरक्षारक्षकांवर आहे. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता तसेच कोणत्याही पायाभूत सुविधा शासनातर्फे उपलब्ध करून न देताही सुरक्षारक्षक आपले कर्तव्य चोख बजावत असतात. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्ष काम केलेले प्रदीप पी. यांची नुकतीच शासनाने मत्स्योद्योग आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्याकडूनही हा प्रश्न सुटेल, अशी सुरक्षारक्षकांची अपेक्षा आहे.
चौकट
मत्स्योद्योग मंत्र्यांकडून अपेक्षा
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळातील खातीवाटपामध्ये कोकणातील आमदार नितेश राणे यांच्याकडे मत्स्योद्योग व बंदरे ही महत्वाची स्थानिक प्रश्नांशी निगडित असलेले खाते मिळाले आहे. नवे मत्स्योद्योग मंत्री सुरक्षारक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहतील, असा विश्वास सुरक्षारक्षक व्यक्त करत आहेत.
चौकट
सुरक्षारक्षकांच्या दांड्या
तीन पाळ्यांमध्ये प्रत्येक लॅंडिंग पॉइंटवर तीन सुरक्षारक्षक नेमले आहेत; परंतु अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक जोडीदाराला हाताशी धरून दोघांनी ड्युटी करायची आणि एकाने आठ ते पंधरा दिवस दांड्या मारून शासनाचा फुकटचा पगार घ्यायचा, असा वगेळा फंडा काही सुरक्षारक्षकांनी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.
कोट
जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ६८ सुरक्षारक्षक काम करत आहेत. त्यांचा ३ महिन्याचा पगार झालेला नाही. याबाबत आम्ही शासनाला कळवले आहे. लवकरच यावर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
- आनंद पालव, सहाय्यक मत्स्य आयुक्त रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.