46337
विद्यार्थ्यांनी जाणले ‘रायगड’, ‘रत्नागिरी’
जिल्हा परिषदेची अभ्यास सहल; ऐतिहासिक स्थळांमुळे गुणवंत भारावले
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १९ ः राष्ट्रीय आविष्कारअंतर्गत समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषदेची राज्यांतर्गत अभ्यास सहल रत्नागिरी व रायगड येथे काढण्यात आली. तीन दिवस सहल होती. या अभ्यास सहलीतून तीनही दिवस मुलांचा उत्साह आणि कुतूहल द्विगुणित झाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची प्रेरणा व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षा अभियानाच्या कार्यक्रम प्रमुख स्मिता नलावडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील गुणवत्तापूर्ण शाळांतील ४५ मुलांना या अभ्यास सहलीचा लाभ घेता आला. तीन दिवसांच्या दौऱ्यात रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांतील महत्त्वपूर्ण स्थळे निवडली होती. गुणवंत मुलांसाठी बक्षीस देण्याचा हेतू ठेवत सिंधुदुर्गनगरी येथून या अभ्यास दौऱ्याला सुरुवात झाली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आडिवरे येथील महाकाली मंदिर, पावस येथील स्वामी स्वरुपानंद यांचे समाधी स्थळ, थिबा राजवाडा, बाळासाहेब ठाकरे प्लॅनेटोरियम अर्थात थ्रीडी चष्म्यातून अंतराळ दर्शन, मत्स्यालय व मत्स्य संग्रहालय, दुसऱ्या दिवशी गणपतीपुळे येथील गणेश दर्शन, आद्यकवी केशवसुत यांचे मालगुंड येथील जन्मस्थान, कोरीव मार्बलवरील कविता, ग्रंथालय तर दापोली तालुक्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अशा अभ्यासपूर्ण स्थळांना भेटी दिल्या. मुलांसमवेत वैभववाडी तालुक्यातून संदीप कोळेकर, देवगड तालुक्यातून सूर्यकांत साळुंके, वेंगुर्ले तालुक्यातून प्रज्ञा राऊळ व अर्चना बर्डे-कोरगावकर, तर समग्र अभियानाचे जिल्हा समन्वयक राजू पाटील होते.
सहलीत पाहिलेल्या स्थळांच्या वैशिष्ट्यपूर्ण नोंदी मुलांनी नोंदवहीत नोंद केल्या आहेत. या अभ्यास सहलीसाठी निवड झालेल्या सर्व मुलांसाठी व सोबत असलेल्या शिक्षकांसाठी जेवण, नाश्ता व राहण्याची व्यवस्था समग्र शिक्षा अभियानातून करण्यात आली. समग्र शिक्षा अभियान व जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या या अभ्यास सहलीच्या यशस्वीतेमुळे निवड झालेल्या शाळांतील मुले, शिक्षक, मुख्याध्यापक, पालकांनी आनंद व्यक्त केला.
..................
रायगड किल्ल्याचा रोमांचक अनुभव
तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याला भेट दिली. रायगड किल्ल्यावर प्रवेशासाठी रोपवेचा अवलंब करून संस्मरणीय रोमांचक सुखद अनुभव मुलांना घेता आला. तेथे मार्गदर्शकाद्वारे राजांचा दरबार, राज्याभिषेक सोहळा, मुख्य प्रवेशद्वार, खलबतखाना, गंगासागर तलाव, टकमक टोक, अलीकडील राजांचे पुतळे, शिवकालीन बाजारपेठ, जगदिश्वर मंदिर, समाधी स्थळ, तेथून दिसणारे दूरवरचे किल्ले अशी माहिती घेऊन परतीच्या प्रवासात डेरवण येथे भेट देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.