मनुष्यहानी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
आठ वर्षात नैसर्गिक आपत्तीत ४० नागरिकांनी गमावला जीव
विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ ः जिल्ह्यात २०१७ ते २०२४ या आठ वर्षात आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे जिल्ह्यातील ४० नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वात जास्त मनुष्यहानी २०२१ मध्ये १० एवढी झाली होती. त्यावर्षी आलेल्या तौक्ते वादळाने चार जणांचा जीव घेतला होता. या आठ वर्षात प्रत्येक वर्षी किमान एका नागरिकाचा जीव गेला आहे. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीचा उद्भवल्यास मनुष्यहानी होवू नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्याकरिता पूरग्रस्त गावे, दरडग्रस्त गावे घोषित करून त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा भौगोलिकदृष्ट्या राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच वेगळा आहे. या जिल्ह्याला एका बाजूने समुद्र लाभला आहे. जिल्ह्यातून अनेक नद्या भरून वाहतात. छोटे-मोठे असंख्य ओहोळ आहेत. या जिल्ह्यात सरासरी ३२०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. ही सरासरी राज्यात सर्वाधिक आहे. या शिवाय जिल्ह्यात जागोजागी मोठमोठे डोंगर आहेत. जंगल सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. अशा प्रकारे विविध भौगोलिक स्थिती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेकोर्डब्रेक पाऊस पडतो. तसेच उष्णतेची लाटही जिल्ह्यात येते. थंडी सुध्दा कडाक्याची पडते. यामुळे जिल्ह्याला पुर, अतिवृष्टी, दरड कोसळणे, वीज पडणे या नैसर्गिक आपत्तींना दरवर्षी सामना करावा लागतो. याशिवाय हवामान बदलामुळे येणारी वादळे सुध्दा या जिल्ह्यावर वक्रदृष्टी ठेवून घोंगावत असतात. तसेच झाडी मोठ्या प्रमाणात असल्याने त्यातील झाडे कोसळून वित्त मोठ्या प्रमाणात होत असते. याशिवाय मनुष्यहानी सुध्दा होत असते. विशेषतः या नैसर्गिक आपत्ती पावसाळा सुरू झाल्या की येत असतात. त्यामुळे पावसाळा हा ऋतू जिल्ह्यासाठी नैसर्गिक आपत्तींमुळे चिंताजनक ठरत आला आहे. एरवी मित्र वाटणारा निसर्ग जेव्हा कोपतो त्यावेळी हा मित्रच जणू दुश्मन झाल्यासारखा वाटत असतो.
जिल्ह्यात २०१७ ते २०२४ या आठ वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे ४० जणांचा जीव गेला आहे. यामध्ये पुर आणि अतिवृष्टी यामुळे तब्बल २९ नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. या पाठोपाठ वीज कोसळणे आणि चक्रीवादळ यामुळे प्रत्येकी चार अशा आठ जणांचा जीव गेला आहे. या आठ वर्षात सर्वाधिक मनुष्यहानी २०२१ एवढी झाली आहे. यावर्षी आलेल्या तौक्ते वादळाने चार जणांचा जीव घेतला आहे. पुर आणि अतिवृष्टी यामुळे तीन व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय याच वर्षी दरडी कोसळल्याने दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर वीज अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला आहे. यावर्षी नैसर्गिक आपत्तीचा उद्भवल्यास मनुष्यहानी होवू नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्याकरिता पूरग्रस्त गावे, दरडग्रस्त गावे घोषित करून त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आला आहे. त्यासाठी विविध साहित्यही जिल्हास्तरावर उपलब्ध आहे.
-------------
चौकट
बचावासाठी प्रशासनाकडे पुरेसे साहित्य
नैसर्गिक आपत्ती आल्यास शोध व बचाव करण्यासाठी लागणारे पुरेसे साहित्य जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहे. यात १११३ लाईफ जॅकेट, ७८३ लाईफ बोया, २९ बोट्स, ४२ इन्फ्लाटेबल लायटिंग टॉवर, १९ सॅटॅलाइट फोन, १७ टेंट, ४२ वूड कटर, १३६ स्ट्रेचर, १२ एमर्जन्सी टॉर्च, सेफ्टी ग्लोवज, नायलॉन दोरी, अग्निशामक, इमार्जन्सी स्पॉट लाईट, टूल किट अशा साहित्यांचा समावेश आहे.
-------------
चौकट
२०२१ मध्ये दरड कोसळण्याची घटना
कणकवली तालुक्यातील रांजणगाव येथे २३ जुलै २०२१ मध्ये दरड कोसळण्याची घटना घडली होती. त्यात ३९ वर्षीय महिला प्रमिला पांडुरंग जाधव यांचा मृत्यू झाला होता. तर याच वर्षी ३० जुलैला सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथे रस्त्यावर दरड कोसळली होती. यात वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील ३५ वर्षीय गितेश गोपाळ गावडे यांचा मृत्यू झाला होता. या व्यतिरिक्त जिल्ह्यात दरड कोसळून मृत्यू झाल्याच्या घटनेची नोंद नाही.
चौकट
२०१७ ते २०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीत झालेले मृत्यू
आपत्तीचा प्रकार*२०१७*२०१८*२०१९*२०२०*२०२१*२०२२*२०२३*२०२४*एकूण
पुर/अतिवृष्टी*३*१*४*८*३*३*२*५*२९
दरड कोसळणे*०*०*०*०*२*०*०*०*२
वीज पडणे*१*०*०*१*१*०*०*१*४
चक्रीवादळ*०*०*०*०*४*०*०*०*४
झाड पडून मृत्यु*०*०*०*०*०*०*०*१*१
----------------
कोट
जिल्ह्यात एकूण ४२ पुरबाधित गावे जाहीर केली आहेत. २० दरडग्रस्त गावे निश्चित केली आहेत. याशिवाय दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ४३ संभाव्य गावांचे सर्व्हेक्षण केले आहे. एकंदरीत यावर्षी दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज आहे.
- मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.