69412
डॉ. आंबेरकरांच्या कवितेचा भविष्यकाळ उज्वल
ॲड. परुळेकर ः कसाल येथे ‘सूर्यभान’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.९ ः ‘येथील कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या ‘सूर्यभान’ काव्यसंग्रहात समाजाला भान देणारे कविता लेखन आहे. सदर कविता एका बाजूला समाजाच्या दुःखाची मांडणी करते, तर दुसऱ्या बाजूला भवताली सुखसमृद्धी नांदो, अशी ज्ञानेश्वरांच्या विश्व प्रार्थनेची आठवण करून देते. त्यामुळे कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या कवितेचा भविष्यकाळ उज्वल आहे’, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर यांनी केले.
शहरातील डॉक्टर आणि कवी प्रफुल्ल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सूर्यभान’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कसाल येथील कोलते हॉस्पिटलच्या सभागृहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. देवदत्त परुळेकर होते. कवी व लेखक ॲड. भालचंद्र सुपेकर, प्रा. संजीवनी पाटील, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य मिलिंद कुलकर्णी, प्रसाद घाणेकर, कवी अजय कांडर, वर्षा आंबेरकर, कवयित्री डॉ. दर्शना कोलते, डॉ. प्रशांत कोलते आदी उपस्थित होते.
प्रा. संजीवनी पाटील म्हणाल्या, ‘‘सूर्यभान’ हा डॉ. आंबेरकरांचा काव्यसंग्रह शीर्षकाने, तर लक्षवेधी ठरतोच, मात्र सोबतच आतील आशयाच्या अनुषंगाने वर्तमानातील परिघाला अनेक अर्थाने स्पर्श करतो.’’ डॉ. मिलिंद कुलकर्णी म्हणाले, ‘‘कवी आंबेरकर यांची कविता एका विशिष्ट विचारात अडकत नाही. त्यामुळे ती स्वतंत्रपणे विचार मांडते. उजवे-डावे असा विचार न करता मध्यम मार्ग शोधणे ही आताच्या काळाची खरी गरज आहे.’’ प्रसाद घाणेकर म्हणाले, ‘‘चांगल्या कवितेपर्यंत पोहोचणे ही कष्टप्रत गोष्ट असते. त्या वाटेवरून नव्या कवींनी चालायला हवे.’’ ॲड. भालचंद्र सुपेकर म्हणाले, ‘‘सूर्यभान’मधली कविता सामाजिक आशय मांडते. तिला कुठलाच विषय वर्ज्य नाही.’’ डॉ. आंबेरकर म्हणाले, ‘‘आजवरच्या कवितेच्या वाटचालीत जे कवितेचे चिंतन झाले आणि अनेक लोकांबरोबर झालेल्या चर्चेतून एक नवे भान आले त्यातून पुढचं कविता लेखन माझं होत राहील.’’ यावेळी डॉ. संजय सावंत, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. गौरी गणपते, संतोष कदम आदींनी विचार मांडले. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा आंबेरकर यांनी स्वागत केले. कवी अजय कांडर यांनी प्रास्ताविक, तर डॉ. दर्शना कोलते यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.