कोकण

हत्तींचा बागायतीत रात्रभर तांडव

CD

swt117.jpg व swt118.jpg
69854, 69855
तळकट ः परिसरातील माड हत्तींनी मुळापासून उन्मळून टाकले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हत्तींचा बागायतीत रात्रभर तांडव
लाखोंची हानी ः वन विभागाचे पथक हतबल, स्थानिकांच्या सहनशीलतेचा अंत
सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. ११ ः सहा हत्तींच्या कळपाने येथे काल (ता. १०) रात्रभर अक्षरशः तांडव केला. पहाटे तीन वाजेपर्यंत बागायती पायदळी तुडवण्याचा हा प्रकार सुरूच होता. वनविभागाचे पथक त्यांच्यासमोर हतबल झाल्याचे चित्र होते. हा सगळ्या प्रकारामुळे येथे स्थिरावलेल्या हत्तींचा उपद्रव स्थानिकांच्या सहनशीलतेपलीकडे गेला आहे. रात्रभर त्यांनी लाखो रुपयांचे नुकसान केले.
दोन कळप एकत्र आल्याने येथे हत्तींची संख्या सहा वर गेली आहे. गेले चार दिवस या कळपाने उपद्रवाची परिसीमा गाठली आहे. या कळपात गणेश आणि ओंकार असे दोन टस्कर आणि चार माद्यांचा समावेश आहे. यातील गणेश हा नव्याने आलेला टस्कर प्रचंड आक्रमक आहे. त्याचा आकारही मोठा आणि भयावह आहे. थेट वस्तीत घुसून ते बागायती उद्‌ध्वस्त करत आहेत. गस्तीवर असलेले पथक फटाके टाकून त्यांना पळवण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.
हा कळप कोलझर बाद्याचे जंगल येथे दिवसभर मुक्काम करतो. मंगळवारी दिवसा ते याच भागात होते. सायंकाळी सातच्यादरम्यान खाली उतरत त्यांनी वस्तीकडे मोर्चा वळवला. रायचे वायंगण येथे असलेल्या रामचंद्र सावंत यांच्या बागेत घुसत तेथे धुडगूस घातला. त्याच्याच बाजूला असलेल्या महेश जानबा देसाई व दाजी ऊर्फ नारायण जानबा देसाई यांच्या बागायतीत प्रवेश केला. तेथे १५ ते २० वर्षे जुनी नारळाची झाडे अक्षरशः उन्मळून टाकली. या आधीही देसाई यांच्या बागेत नुकसान केले होते. आताच्या हल्ल्यात उरलीसुरली बागही उद्‌ध्वस्त केली. तेथून कोलझर धुपेवाडी येथे रुपेश वेटे यांच्या घराजवळ असलेल्या बागायतीत हा कळप घुसला. तेथे सुपारी आणि माडाचे मोठे नुकसान केले.
वन विभागाच्या पथकाने फटाके टाकून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते याला फारशी दाद देत नसल्याचे चित्र होते. यानंतर हा कळप राजेंद्र यशवंत देसाई यांच्या काजू बागेत शिरला. तेथे काजूची झाडे तुडवली. तसाच पुढे जात त्यांनी कोलझर मधलीवाडी येथील शिवप्रसाद देसाई यांच्या बागेत पुन्हा एकदा नुकसान सत्र केले. १५ दिवसांपूर्वी या बागेतील लागायला आलेले सुमारे १७ माड उखडून टाकले होते. रात्री पुन्हा येत त्यांनी सुमारे ९ माडांची झाडे उद्‌ध्वस्त करत या बागेत केलेली लागवड जवळपास संपवली. तेथून पुढे तारेचे कुंपण तोडत भूषण रेडकर यांच्या बागायतीतील नारळाची झाडे उखडून टाकली. ख्रिश्चनवाडीत पेद्रू फर्नांडिस, शरद देसाई यांच्या बागायतीतही नुकसान केले. गेले चार दिवस नुकसानीची ही तीव्रता वेगाने वाढत असल्याने स्थानिक भीतीच्या छायेखाली आहेत.
हत्तींचा हा तांडव पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता. त्यांना नुकसानीपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न वन विभागाच्या पथकाकडून केले जात होते; मात्र आक्रमक असलेला गणेश टस्कर त्याला कोणतीच दाद न देता आपल्याच धुंदीत बागायती तुडवत होता. यानंतर हा कळप पुन्हा बाद्याचे जंगल येथे मुक्कामाला गेला. आज दिवसभर त्याचे लोकेशन याच भागात दिसत होते. हत्ती आता या भागात स्थिरावल्याने येथील बागायती संकटात सापडली आहे. तळकट आणि कोलझर अशा दोनच गावांमध्ये त्यांच्याकडून नुकसान केले जाते. या हत्तींना हटविण्यासाठी कोणतेच ठोस प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे.

चौकट
वन विभाग हतबल
हत्ती या भागात स्थिरावण्याची भीती या आधीच व्यक्त केली जात होती. वन विभागाने मात्र त्यांना येथून मागे नेण्यासाठी पहिल्या टप्प्यात काहीच प्रयत्न केले नाहीत. ओंकार या टस्कराला पकडायचे असल्याने गुजरातमधील ‘वनतारा’ प्रकल्पाचे अधिकारी त्याच्या जीवनशैलीचा अभ्यास करायला आले असल्याने कळपाला त्रास न देता या भागात ठेवण्याचे नियोजन तेव्हा झाले होते. तोच प्रकार आता स्थानिकांच्या जिवावर बेतण्याची भिती निर्माण झाली आहे. त्या काळात येथेच हत्तीना ठेवण्याने ते येथे कायमचे स्थिरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आताही वन विभागाचे पथक हत्ती रात्री बागायतीत आल्यानंतर त्यांच्या मागून फटाके लावण्याच्या पलीकडे काहीच करत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हत्ती बागायती उद्‌ध्वस्त करत आहेत.

कोट
चार वर्षे हत्ती आमच्या बागेत येऊन दरवर्षी नुकसान करत आहेत. त्यामुळे आमची बाग पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे. बागायती हेच आमचे उपजीविकाची मुख्य साधन असल्याने खाण्यापिण्याची वांदे झाले आहेत. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा. मी वीस वर्षांपूर्वी वनरक्षक पदासाठी परीक्षा दिली होती. त्यात पासही झालो होतो; मात्र कामाची संधी मिळणार त्यावेळी कोकण निवड मंडळ रद्द झाले. मी अपंगही आहे. आता दुर्दैवाने उत्पन्नाचे असलेले साधनही उद्‌ध्वस्त होत आहे.
- महेश जानबा देसाई, शेतकरी, तळकट
----------------
कोट
माझ्या डोळ्यादेखत हत्ती माड उखडून टाकत होते. माझ्या वडिलांनी ही बागायती केली होती. हत्तीसमोर नुकसान करत होते. तेव्हा त्यांना हाकलण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे फटाकेही नव्हते. हा उपद्रव आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे.
- दाजी ऊर्फ नारायण देसाई, शेतकरी, तळकट
----------------
swt116.jpg
69853
एकनाथ नाडकर्णी


आमदार दीपक केसरकर आहेत कुठे ?
एकनाथ नाडकर्णी ः हत्ती प्रश्न सोडवायला काय केले ?
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ११ ः हत्तींच्या उपद्रवाने कोलझर पंचक्रोशीसह दोडामार्ग तालुक्यातील स्थानिकांना जगणे मुश्कील झाले आहे; मात्र चारवेळा आमदार म्हणून निवडून दिलेल्या दीपक केसरकर यांना याचे कसलेच सोयरसुतक नाही. ते यासाठी वनअधिकाऱ्यांच्या डोक्यावर खापर फोडत आहेत; मात्र हा प्रश्न इतका गंभीर होऊनही शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला ते या भागात गेले आहेत का? आमदारकीच्या त्यांच्या १६ वर्षांच्या काळात त्यांनी या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी आज पत्रकातून केला.
श्री. नाडकर्णी यांनी यात नमूद केले आहे की, दोडामार्ग तालुक्यात गेली २० हून अधिक वर्ष हत्तीचा उपक्रम चढत्या क्रमाने वाढत आहे. आता याची तीव्रता वाढून कोलझर पंचक्रोशी पर्यंत त्यांचा अधिवास वाढला आहे. तेथे शेकडो कुटुंब केवळ बागायतीवर अवलंबून आहेत. हत्तींचा कळप हीच बागायती मुळापासून उखडत आहेत. हत्ती या भागात स्थिरावल्याने बागायतीबरोबरच स्थानिकांच्या जिवातालाही धोका निर्माण झाला आहे. असे असताना स्थानिक आमदार केसरकर याचे खापर कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक यांच्या नाकर्तेपणावर फोडत आहेत; मात्र हत्तींचा हा प्रश्न इतका गंभीर होऊनही त्यांनी स्वतः काय केले? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. दोडामार्ग तालुक्यातील स्थानिकांनी मते देऊन त्यांना चारवेळा विधानसभेत पाठवले. दोनवेळा महत्त्वाची मंत्रिपदे, पालकमंत्री पद त्यांना मिळाले. हत्तींचा प्रश्न ते आमदार झाले त्याच्या आधीपासून आहे. याचा उपद्रव केवळ केसरकर यांच्याच मतदारसंघात आहे. हत्तींनी त्यांच्या १६ वर्षांच्या आमदारकीच्या काळात केलेले नुकसान सर्वश्रुत आहे. आधी तिलारी खोऱ्यात हत्तींनी उच्छाद मांडला होता तेव्हाही त्यांनी काहीच केले आताही ते अधिकाऱ्यांच्या डोक्यावर खापर पडत आहेत. आता अधिकाऱ्यांना दोष देण्यापेक्षा हत्तींना थोपवण्यासाठी त्यांनी याआधी काय केले? हे जाहीर करावे. केसरकर यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत हत्ती उपद्रवाचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली असती, तर आज ही स्थिती उद्‌भवलीच नसती. त्यामुळे हत्तींच्या या प्रश्नाला अधिकाऱ्यांपेक्षा स्वतः केसरकर जास्त जबाबदार आहेत.’
पत्रकात पुढे म्हटले आहे की, ‘कोलझर पंचक्रोशीसह पूर्ण तालुक्यात मते मागण्यासाठी होणाऱ्या सभांमध्ये केसरकर प्रत्येकवेळी येथील शेती, बागायतीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देतात. प्रत्येकवेळी स्थानिक या भूलथापांना बळी पडून त्यांना मतदान करतात. आता मात्र त्यांनी स्थानिक मतदारांच्या विश्वासघाताची परिसीमा गाठली आहे. कोलझर पंचक्रोशीत गेले दोन महिने हत्ती उपद्रवाने परिसीमा गाठूनही स्थानिकांचे अश्रू पुसायला ते तेथे पोहोचलेले नाहीत. या प्रश्नावर त्यांनी या काळात एक शब्दही उच्चारला नव्हता. तिलारी खोऱ्यातील स्थानिकांनीही त्यांच्या या असंवेदनशीलतेचा अनुभव याआधी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांवर खापर फोडल्याचे वक्तव्य याला अपवाद म्हणता येईल. याआधी खनिजाविषयी झालेल्या विविध शासकीय प्रक्रियांमध्ये, जनसुनावण्यांवेळी सक्रिय असणारे केसरकर आता स्थानिकांच्या गळ्यापर्यंत संकट आले असताना गप्प का?, त्यांचा प्रशासनावर वचक राहिला नाही का?, त्यांना स्थानिक बागायतदारांना वाऱ्यावरच सोडायचे आहे का? या प्रश्नाची उत्तरे द्यावीत, असे आवाहनही श्री. नाडकर्णी यांनी पत्रकातून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत मुसळधार, विक्रोळीत दरड कोसळून बापलेकीचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

Mumbai Local Train : मुंबईत मुसळधार! मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल रखडल्या; प्रवाशांची पायपीट, उशिराने धावताहेत गाड्या

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असते तर युक्रेन युद्ध झालंच नसतं, अलास्कात बोलले पुतीन; म्हणाले, शांततेचा तोडगा काढा पण...

Jasprit Bumrah ला टीम इंडियात घेण्यासाठी केलेली शिफारस? इशांत शर्माने सांगितली इनसाईड स्टोरी; म्हणाला,'दुखापत झाली अन्...'

SCROLL FOR NEXT