सावंतवाडी कारागृहात
बंदींना योग प्रात्यक्षिके
ओटवणे ः ‘‘कारागृहाच्या आत चार भिंतींतील बंदिवानांना स्वस्थ, निरोगी व शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग,’’ असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनच्या सावंतवाडी उपकेंद्राचे योगशिक्षक डॉ. नीलेश अटक यांनी केले. नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ओरोस जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सावंतवाडी तालुका विधी सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे आयोजित योग शिबिरात ते बोलत होते. डॉ. अटक यांनी कारागृहातील बंदिवानांना सर्वसंधी संचालन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, भूजंगासन, पवनमुक्तासन, अनुलोम-विलोम, प्राणायाम, ओंकार या योगप्रकारांच्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मानसिक आणि शारीरिक संतुलन कसे राखले जाते, याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरात सावंतवाडी कारागृहातील ३८ बंदिवानांनी सहभाग घेतला. कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी आभार मानले.
...................
कर्मचारी पतपेढीची
ऑगस्टमध्ये सभा
कुडाळ ः सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय-निमशासकीय सहकारी बॅंक कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या., सिंधुदुर्ग कुडाळची २०२४-२५ बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा १० ऑगस्टला दुपारी २.३० वाजता मराठा समाज एसी हॉल, कुडाळ येथे अध्यक्ष प्रसाद कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संस्थेतर्फे सभासद पाल्यांचा गुणगौरव व निवृत्त सभासदांचा सन्मान सोहळा होणार आहे. संस्था सभासद पाल्य २०२४-२५ वर्षात दहावी परीक्षेमध्ये ८० टक्के व त्याहून अधिक गुण, बारावी परीक्षेमध्ये ७० टक्के व त्याहून अधिक गुण, पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, तसेच पदवीधर, उच्च पदवीधर, यूपीएससी, एमसीएससी, राज्य व राष्ट्रस्तरीय स्पर्धेत यश मिळविलेल्या विविध स्पर्धा परीक्षांतील पाल्यांचा, तसेच शासकीय जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले सभासदांचा गुणगौरव होणार आहे. पाल्यांची नावे, एक छायाचित्र व गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत, तसेच शासकीय पुरस्कार प्राप्त सभासदांनी सर्टिफिकेट प्रत २५ जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत संस्था कार्यालय, कुडाळ अगर शाखा कार्यालय कासार्डे येथे आणून देण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष कुंटे यांनी केले आहे.
....................
दहावीच्या पुरवणी
परीक्षेस सुरुवात
सावंतवाडी ः कोकण विभागीय मंडळांतर्गत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेची (दहावी) लेखी परीक्षा २२ जून ते ७ जुलै या कालावधीत आयोजित केली आहे. सावंतवाडी केंद्र क्रमांक ८४०५, कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथे ही परीक्षा होणार आहे. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले व कुडाळ या चार तालुक्यांतील, तसेच विलंब शुल्क भरून येणाऱ्या पुनर्परीक्षार्थींची सर्व विषयांची लेखी परीक्षा येथेच घेण्यात येणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा ३ जुलैला याच केंद्रावर होणार आहे. सकाळच्या सत्रातील लेखी परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० वाजता परीक्षा दालनात प्रवेश करणे आवश्यक आहे. वेळेपूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्र संचालक, कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी केंद्र क्रमांक ८४०५ यांनी केले आहे.
.......................
‘एचएसआरपी’साठी
वाहनधारकांची धांदल
सिंधुदुर्गनगरी ः २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक केले आहे. यासाठी राज्यातील वाहनधारकांची धावपळ सुरू आहे. मात्र, पाट्यांचा पुरवठा कमी असल्यामुळे नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत. वाहनधारकांना तिसऱ्यांदा १५ ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. वाहनधारक वाहनांना उच्च सुरक्षा नंबरप्लेट १५ ऑगस्टपर्यंत लावू शकतात. राज्यात आतापर्यंत ३० टक्के वाहनधारकांनीच नंबरप्लेट बसवून घेतली आहे. ही मुदतवाढ शेवटची असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. या मुदतीमध्ये नंबरप्लेट न केल्यास वाहनधारकांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मुदतवाढीची मागणी केली होती.
--
खोक्रल येथे रविवारी
भजनी कार्यशाळा
दोडामार्ग ः खोक्रल ग्रामस्थ व शिष्य परिवार आयोजित भजनी कार्यशाळा रविवारी (ता. २९) सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत खोक्रल येथे आयोजित केली आहे. यात गोवा येथील ख्यातनाम भजनी बुवा विठ्ठल शिरोडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील भजनी कलाकारांना गायन, भजन यातील बारकावे, शिवाय प्रात्यक्षिक स्वरुपात श्री. शिरोडकर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. कार्यशाळेत तालुक्यातील भजनी कलाकारांनी सहभाग नोंदविण्यासाठी पांडुरंग गवस आणि संतोष गवस यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.