७३२६८
सरस्वती विद्यालयात वह्या वाटप
गोगटे गुरुजी प्रतिष्ठानचा उपक्रम ः स्वयं-अध्ययन तंत्रावर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः आजगाव येथील पूज्य गोगटे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आरवली-टाक येथील गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान संचलित श्री सरस्वती विद्यालयात नुकत्याच सर्व विद्यार्थ्यांना २०० वह्या भेट देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी गोव्यातील शिक्षणतज्ज्ञ तथा साहित्यिक निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर यांचे ‘स्वयं-अध्ययन तंत्र’ या विषयावर मार्गदर्शन सत्रही घेण्यात आले.
पूज्य गोगटे गुरुजी प्रतिष्ठानचे प्रमुख सुप्रसिद्ध साहित्यिक विनय सौदागर, आजगाव येथील ज्येष्ठ साहित्यप्रेमी नागरिक एकनाथ शेटकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पांढरे व मुख्याध्यापक मोहन जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.
प्राचार्य गजानन मांद्रेकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास कसा करावा, या संदर्भात मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले. आपण जेव्हा स्वतः अध्ययन करतो, तेव्हा आपल्या दीर्घकाळ लक्षात राहाते. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अभ्यासाची सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक विषयात किती पाठ किंवा घटक आहेत, गुण विभागणी कशी आहे, याचे सर्वेक्षण केल्याने अभ्यास नेमका किती आहे, हे लक्षात आल्यामुळे अभ्यासाचा ताण कमी होतो, असे त्यांनी सांगितले. अभ्यासाच्या मजकुराचे स्वतः अधोरेखन करून टिपणं कशी काढायची, आणि त्यावरून प्रश्न कसे काढायचे, याचं सोदाहरण विवेचन त्यांनी केले. अभ्यास कौशल्यपूर्ण आणि आनंददायी होण्यासाठी वापरावयाच्या विविध स्मरणतंत्रांची माहितीही त्यांनी दिली. अभ्यासात यशस्वी होण्यासाठी गुरूबद्दलचा आदर, शाळेविषयीचा अभिमान आणि देवावरील श्रद्धा या गोष्टींचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षिका श्रद्धा नाईक यांनी मान्यवरांचा परिचय केला, तर मुख्याध्यापक मोहन जाधव यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकपर भाषणात विनय सौदागर यांनी पूज्य गोगटे गुरुजी प्रतिष्ठान राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात निवडक विद्यार्थ्यांना वह्या भेट देण्यात आल्या. शिक्षिका श्रद्धा नाईक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षिका देवयानी झोरे यांनी ऋणनिर्देश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.