नांदगाव येथे आज
गुणवंतांचा सत्कार
नांदगाव ः श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था व सरस्वती हायस्कूल यांच्यावतीने गुणवंतांचा सत्कार सोहळा उद्या (ता. २७) सकाळी १०.३० वाजता येथील सरस्वती हायस्कूलमध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडीचे प्रा. संजीवनी पाटील, नाट्य-सिने कलाकार गणेश रेवडेकर यांची उपस्थिती आहे. याचबरोबर श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ अध्यक्ष नागेश मोरये, नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन रेवडेकर, नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील दहावी परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व सरस्वती हायस्कूलमधील प्रथम तीन क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ अध्यक्ष नागेश मोरये, मुख्याध्यापक सुधीर तांबे यांनी केले आहे.
----------------
विजयदुर्ग आगारात
पाच बसचे लोकार्पण
देवगड ः तालुक्यातील विजयदुर्ग आगाराला पाच नव्या एसटी बस प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आगारात नव्या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजप पडेल मंडल युवा मोर्चा अध्यक्ष उत्तम बिर्जे, विजयदुर्ग प्रभारी सरपंच रियाज काझी, माजी सरपंच प्रसाद देवधर, पडेल मंडल महिला मोर्चा अध्यक्षा संजना आळवे, महेश बिडये, ग्रेसिस फर्नांडिस, शुभा कदम, पडेल सरपंच भूषण पोकळे, प्रतीक्षा मिठबावकर, विजयदुर्ग आगार व्यवस्थापक विवेक जमाले, विजयदुर्ग स्थानकप्रमुख सचिन डोंगरे, ग्रामपंचायत अधिकारी ए. डी. वारे उपस्थित होते.
------------------
प्लास्टिकच्या विरोधात
दोडामार्गात मोहीम
दोडामार्ग ः प्लास्टिक पिशव्यांचा वापर तथा विक्री करणाऱ्या काही दुकान व्यावसायिकांवर दोडामार्ग नगरपंचायतीने बुधवारी (ता. २५) दंडात्मक कारवाई केली. यात १३ दुकानांवर कारवाई करत एकूण ३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. दोडामार्ग नगरपंचायतीच्या माध्यमातून शहर पूर्णपणे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये, प्लास्टिकमुळे होणारे त्रास, आजार हे जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळे प्लास्टिक पूर्णपणे बंद करा, असे वारंवार नगरपंचायतीच्या वतीने कचरा व्यवस्थापन घंटागाडीच्या माध्यमातून नागरिकांना सूचित करण्यात येत होते. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष चेतन चव्हाण व मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी मोहीम राबविण्यात आली. बाजारपेठेतील दुकानांत जात प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली. यावेळी एकूण १३ दुकानांवर कारवाई केली. नागरिक व दुकानदारांनी प्लास्टिकमुक्त शहर करण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले.
.......................
अखंड वीणा सप्ताहास
दाभोसवाडा येथे प्रारंभ
वेंगुर्ले ः सुमारे शंभरपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या दाभोसवाडा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात सोमवारपासून (ता. २३) अखंड वीणा सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. या सप्ताह कालावधीत रोज संगीत व वारकरी भजने, विठ्ठल-रखुमाईची आकर्षक पूजा होत आहे. तसेच २९ रोजी सायंकाळी ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात दाभोसवाडा व विठ्ठलवाडी येथील दिंड्या मंदिरात येणार आहेत. या दोन्ही दिंड्यांमध्ये वारकरी वेशभूषा केलेली भजनी मंडळी आणि पौराणिक कथांवर आधारित केलेल्या विविध वेशभूषा आदींचा समावेश असणार आहे.
......
अनोळखी व्यक्तीने केल्या
सातार्ड्यात दुचाकी पंक्चर
सातार्डा ः सातार्डा पालवनवाडी येथे रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या तीन दुचाकी अनोळखी व्यक्तीने खिळे ठोकून पंक्चर केल्या. त्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या दुचाकी मालकांची गैरसोय झाली. पालवनवाडी येथे रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे झिलू शिंदे, शेखर पेडणेकर यांनी दुचाकी व सुमती शळके यांनी स्कूटर रस्त्याच्या बाजूला लावून ठेवली होती. सकाळी कामाला जाताना या तिन्ही गाड्यांच्या चाकांना अज्ञात व्यक्तीने खिळे ठोकून पंक्चर केल्याचे लक्षात आले. त्यानंतर या तिन्ही वाहनांची चाके काढून मळेवाड येथे पंक्चर काढून आणण्यात आले. वाहन मालकांनी गाड्या दुरुस्त केल्या. या गैरकृत्यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.