गावडे यांना सोमवारी
‘ग्लोबल रेकॉर्ड’ पुरस्कार
सावंतवाडीः न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी येथील विद्यार्थी गोविंद गावडे याला त्याच्या ‘शिवतांडव’ स्तोत्रावर आधारित विश्वविक्रमी तबला वादनासाठी ‘ग्लोबल रेकॉर्ड आणि एशिया पॅसिफिक बुक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी (ता. ११) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे होणार आहे. गोविंद याने शिवतांडव स्तोत्रावर आधारित सलग तबला वादन करून एक मोठा विश्वविक्रम केला आहे. या खास कामगिरीबद्दल त्याला हा सन्मान दिला जात आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता दीपप्रज्वलनाने होईल, तर सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक आणि ग्लोबल व आशिया पॅसिफिक बुक निरीक्षक प्रा. डॉ. महेश कदम उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
..............
‘व्हॉलीबॉल’ चाचणीत
सहभागाचे आवाहन
सिंधुदुर्गनगरीः आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाव्दारे वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल (१५ वर्षांखालील मुले आणि मुली) चॅम्पियनशिप ४ ते १३ डिसेंबर कालावधीत चीनमधील शांग्लुओ येथे होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे खेळाडू सहभागी होण्यासाठी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात राज्य निवड चाचणी पुणे येथे आयोजित केली आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी व्हॉलीबॉल निवड चाचणीत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा या कार्यालयास या चाचण्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इच्छुकांनी सोमवार (ता. ११) सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित राहावे. मंगळवारी (ता. १२) सकाळी १० वाजता निवड चाचणी होणार आहे.
.................
‘सेवा सोसायट्यांनी
प्रस्ताव द्यावेत’
सिंधुदुर्गनगरी ः सेवा सोसायट्यांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाचे शिफारस पत्र घेऊन नाव नोंदणी झाल्या आहेत, अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव व दरपत्रक १४ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने १० लाख इतक्या रकमेची कामे विनानिविदा उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे शासन निर्णय अन्वये जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना केली आहे. त्या अनुषंगाने या समितीकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता पत्र प्राप्त झाली आहेत. आवश्यक अटी व शर्तीच पूर्तता करणे अनिवार्य आहे.
...................
सावंतवा़डीत २४ ला
काव्यवाचन स्पर्धा
सावंतवाडीः कोकणातील ज्येष्ठ साहित्यिक (कै.) विद्याधर भागवत यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘आरती’ मासिक व श्रीराम वाचन मंदिर यांच्यावतीने २४ ऑगस्टला स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सकाळी १०.३० वाजता येथील श्रीराम वाचन मंदिरात होणार आहे. स्पर्धेत १८ वर्षांवरील कोणीही भाग घेऊ शकतो. ही स्पर्धा सिंधुदुर्ग आणि गोव्यापुरती मर्यादित असून, कविता स्वतःच वाचायची आहे. सादरीकरणानंतर कवितेची एक प्रत आयोजकांकडे देणे बंधनकारक आहे. स्पर्धेत निवड झालेल्या कविता ‘आरती’ मासिकात प्रसिद्ध केल्या जातील. या स्पर्धेसाठी प्रथम ५००, द्वितीय ३०० आणि तृतीय २०० रुपये, तसेच दोघांना प्रत्येकी १०० रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाईल. विजेत्यांना सन्मानपत्र आणि ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात येईल. इच्छुक कवींनी २१ ऑगस्टपर्यंत नावे भरत गावडे किंवा प्रभाकर भागवत यांच्याकडे नोंदवावीत. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. जी. ए. बुबा, प्रभाकर भागवत, विठ्ठल कदम आणि उषा परब यांनी केले आहे.
....................