मागासवर्गीय अनुदानापासून
ग्रामपंचायतीने वंचित ठेवले
आंबोलीतील चव्हाण बंधूंचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः आंबोली ग्रामपंचायतीकडून मागासवर्गीयांना दिल्या जाणाऱ्या १५ टक्के अनुदानाचा लाभ धनदांडग्या नागरिकांना दिला जात आहे. मात्र, पात्र असूनही आम्हाला या अनुदानापासून अनेक वर्षांपासून वंचित ठेवले, असा आरोप आंबोली ग्रामस्थ सुनील चव्हाण आणि अरुण चव्हाण यांनी केला. याकडे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे लक्ष वेधूनही ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आपल्या न्याय हक्कापासून वंचित ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, या मागणीसाठी १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा चव्हाण बंधूंनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही अनुसूचित जातीतील असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. तरी देखील, ग्रामपंचायतीने आम्हाला हक्काचे अनुदान वारंवार नाकारले. याउलट माजी सैनिक, नोकरी करणारे, व्यावसायिक तसेच मृत लाभार्थी यांसारख्या अपात्र व्यक्तींनाही १५ टक्के अनुदानाचा लाभ दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबतचे पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. याबाबत अनेक वेळा अर्ज दिले, उपोषण केली, तरीदेखील ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी कोणतीही दखल घेतली नाही. बोगस लाभार्थ्यांवर कारवाई न करता आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आपल्या हक्काचा १५ टक्के अनुदानाचा लाभ मिळावा आणि गेली कित्येक वर्षे आम्हाला या लाभापासून वंचित ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा चव्हाण बंधूंनी दिला आहे.