83106
मोती तलावात मानाचे श्रीफळ अर्पण
सावंतवाडीत नारळी पौर्णिमाः संस्थानकालीन सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ः नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे येथील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून भक्तिभावाने श्रीफळ अर्पण करण्यात आले. शेकडोंच्या उपस्थितीत नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचे पूजन करण्यात आले.
पूजनानंतर मोती तलावात मानाचा नारळ अर्पण करण्यात आला. सावंतवाडी पोलिसांकडून मानाच्या श्रीफळाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक वाजतगाजत मोती तलाव काठावर आल्यानंतर सावंतवाडी संस्थानच्या व मानाच्या नारळाची पूजा करण्यात आली. राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या हस्ते पूजा, आरती करण्यात आली. त्यानंतर सोन्याचा नारद मोती तलावात अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित सावंतवाडीकरांनी तलावात नारळ अर्पण केले. यावेळी मोती तलावाभोवती मोठी गर्दी पाहायला मिळाली.
यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दिलीप भालेकर, परीक्षित मांजरेकर, मोरेश्वर पोतनीस, सुंदर गावडे, शैलेश मेस्त्री, काका मांजरेकर, कृष्णा राऊळ, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस, सहायक पोलिस निरीक्षक श्री. खंदरकर, पोलिस हवालदार महेश जाधव, अमित राऊळ, पुंडलिक सावंत, पोलिस कॉन्स्टेबल श्री. कोरगावकर, महिला पोलिस हवालदार श्रीमती पवार, पोलिस हवालदार राऊत, राजा राणे, सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते.