विनायक राऊत
आज चिपळुणात
चिपळूण ः माजी खासदार विनायक राऊत बुधवारी (ता. १३) चिपळूण दौऱ्यावर येणार आहेत. ते सकाळी १०.३० वाजता चिपळूण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन संपर्क कार्यालयाला भेट देतील. दुपारी १२ वाजता दहिवली बुदुक येथील खरवते शाखा आयोजित जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धेला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता ते मुंबईला जाणार आहेत.
नाणीज महाविद्यालयात
नवागतांचे स्वागत
साखरपा ः रत्नागिरी तालुक्यातील नाणीज माध्यमिक विद्यामंदिर येथे अकरावीला प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्राचार्या रूपाली सावंतदेसाई यांनी महाविद्यालयाच्या आजवरच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. महाविद्यालयात आयोजित सीईटी, जेईई, एनईईटी या कोर्सची माहिती दिली. तसेच क्रीडा अकादमी, शिवण निकेतन, इस्रो नोडल सेंटर, एमएच-सीआयटी आदी कोर्सची माहिती दिली. सचिव सुधीर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या उज्ज्वल निकालाची परंपरा जपण्याची जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.
शाळा, महाविद्यालयात
संगमेश्वरमध्ये जागृती
संगमेश्वर ः हर घर तिरंगा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पोलिस ठाण्याच्यावतीने तालुक्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी माहितीपर आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना पोलिस प्रशासन, पोलिस ठाण्याचे कार्य तसेच पोलिस वापरत असलेल्या विविध शस्त्रास्त्रांविषयी माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सासवे, मनवल, गावित तसेच पोलिस कॉन्स्टेबल म्हसकर आणि खडपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रिगल कॉलेजमध्ये
क्रीडा महोत्सव
चिपळूण ः येथील रिगल कॉलेज येथे पावसाळी क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. माधव शिर्के, क्रीडाशिक्षक मुकुंद पोटभरे, संचालिका डॉ. सुमिता शिर्के उपस्थित होते. या सांघिक क्रीडास्पर्धेमध्ये खो-खो मुलांच्या संघातून बीकॉम या विभागाने विजेतेपद आणि आयटीआय विभागाने उपविजेतेपद पटकावले. खो-खो मुलींच्या विभागात बीसीए या विभागाने विजेतेपद, बीएससी विभागाने उपविजेतेपद पटकावले. व्हॉलिबॉलमध्ये बीएससी विभागाने विजेतेपद, आयटीआय या संघ उपविजेता, क्रिकेटमध्ये बीएससी विजयी, आयटीआय उपविजयी, क्रिकेट मुलींमध्ये बीएससी संघ विजयी, फॅशन डिजायनिंग उपविजयी, कबड्डीत मुलांमध्ये आयटीआय संघ विजेता, बीकॉम संघ उपविजेता ठरला. कॅरममध्ये मुलींमध्ये बीएससी संघ विजयी ठरला.
दापोलीत १७ ला
जेसीआय मॅरेथॉन
चिपळूण ः दापोली येथे रविवारी (ता. १७) जेसीआय मॅरेथॉन २०२५ सीझन-२ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता आझाद मैदान येथे ही स्पर्धा होणार आहे. जेसीआय मॅरेथॉन २०२५ सीझन-२ च्या माध्यमातून स्वच्छ आणि हिरव्या दापोलीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही केवळ एक धावण्याची शर्यत नसून, आपल्या आरोग्याची, शहराची आणि पर्यावरणाची काळजी घेण्याचा एक संदेश देण्यात येणार आहे. या मॅरेथॉनमध्ये दोन शर्यतींचा समावेश आहे. पाच किमी धाव शर्यतीत सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल तसेच पुरुष आणि महिला गटांसाठी स्वतंत्र बक्षिसे आणि पदके दिली जातील. दुसरी शर्यत २ किमीसाठी फन रन आहे ज्यामध्ये विजेत्यांना आकर्षक व्हाउचर आणि पदके प्रदान केली जातील. या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क किंवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही आणि ती सर्व वयोगटांसाठी खुली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.