85258
शब्दांच्या सामर्थ्यावर दळवींचे साहित्य टिकून
विश्वास पाटील ः मालवण येथे चर्चासत्राचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ ः जयवंत दळवी यांचे साहित्य हे वास्तववादी जसे होते तसे त्यांच्या साहित्यात आशय आणि विषय हा ठासून भरलेला आहे. चक्र आणि अंधारातल्या पारंब्या या दोन कादंबऱ्या तर नवलेखकांसाठी वस्तूपाठ आहेत, असे असले तरी मराठीतील प्राध्यापिकी समीक्षकांनी त्यांच्या साहित्याच्या कुवतीला जोखणारी फारशी पारितोषिके मिळू दिली नाहीत. मात्र, दळवी हे आपल्या शब्दांच्या सामर्थ्यावर साहित्याच्या दालनात आजही टिकून आहेत, असे गौरवोद्गार साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी येथे काढले.
साहित्य अकादमी आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या संयुक्त विद्यमाने जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित ‘जयवंत दळवी व्यक्ती आणि साहित्य’ या चर्चासत्राचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जयवंत दळवी यांचे सुपुत्र गिरीश दळवी, प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बांदेकर, साहित्य अकादमी मुंबई विभागीय कार्यालय प्रभारी अधिकारी ओमप्रकाश नागर, बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कवी महेश केळूसकर, प्रेमानंद गजवी, वामन पंडित, शरयू आसोलकर, संजय कळमकर, गोविंद काजरेकर, श्रीकांत बोजेवार, लक्ष्मीकांत खोबरेकर ज्योती तोरसकर आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘चक्र ही कादंबरी मराठी साहित्यातील लखलखीत नाणे आहे. काहीजण कादंबरी न वाचताच स्मिता पाटील यांचे पोस्टर असलेला ‘चक्र’ चित्रपट पाहतात आणि त्या चित्रपटावरून ‘चक्र’ कादंबरी वाचल्याचे समाधान मानतात. मात्र, ‘चक्र’ हा चित्रपट दिग्दर्शकाने उत्तम केला असेलही. मात्र, दळवी यांनी ‘चक्र’ या कादंबरीत जो आशय आणि विषय मांडला आहे तो १५ टक्केही चित्रपटात नाही. ‘चक्र’ कादंबरीत संपादित झालेली शब्द संपदा ही कमावलेली, ऐकलेली आणि अभ्यासलेली आहे की त्याची एक चांगली डिक्शनरी होईल. ‘चक्र’ कादंबरीत झोपडपट्टीतील भगभगीत, ठसठशीत आणि हृदयद्रावक असे चित्रण उमटले आहे. भाऊ पाध्ये यांचे अख्खे साहित्य घातले आणि दुसऱ्या पारड्यात जयवंत दळवी यांचे साहित्य घातले तर निश्चितच दळवी यांचे पारडे जड असेल.’ यावेळी साहित्यिक प्रवीण बांदेकर यांचे जयवंत दळवी यांच्या साहित्यावर समीक्षा करणारे व्याख्यान झाले. सूत्रसंचालन ज्योती तोरस्कर यांनी केले. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी आभार मानले.
----
दळवींच्या सर्वच कादंबऱ्या आशयघन
श्री. पाटील म्हणाले, कादंबरी म्हटली की पाचशे पानांची ते आठशे पानांची असायला हवी असा समज आहे. मात्र, अल्प शब्दात भव्य दिव्य किंवा अवाढव्य अर्थ कमी पानाच्या कादंबरीतही कादंबरीकार देऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे ‘अंधारातल्या पारंब्या’ ही कादंबरी होय. जयवंत दळवी यांच्या सर्वच कादंबऱ्या आणि साहित्य हे आशयघन असल्याने मराठी साहित्यात दळवी यांचे साहित्य अनमोल आहे. विसाव्या शतकातील लेखक श्रेष्ठ की एकविसाव्या शतकातील लेखक श्रेष्ठ हे मराठी लेखकांनी न ठरवता ते ठरविण्याची जबाबदारी पुढच्या पिढीच्या हाती द्यावी.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.