कोकण

संगमेश्वर- तीन दुकाने कोसळली

CD

85242
85171

संगमेश्वरात तीन दुकाने नदीपात्रात कोसळली
पावसाचा तडाखा ; बावनदीला पूर, तीन लाखांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १८ः मुसळधार पावसाने तालुक्यातील बावनदीला पूर आला आहे. वांद्री-उक्षी परिसरात पूरजन्यस्थिती निर्माण झाली असून, काही रस्ते पाण्याखाली गेल्याने जनसंपर्क तुटला आहे. संगमेश्वर-देवरूख मार्गावरील संगमेश्वर बसस्थानकाजवळील दुकानांचा नदीकिनाऱ्याकडील भाग खचल्याने तेथील तीन दुकाने कोसळली. या दुर्घटनेत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, अनेक नद्यांनी पातळी ओलांडली आहे. बावनदीने पात्र ओलांडल्यामुळे वांद्री उक्षी परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे परिसरातील अनेकांचा संपर्क तुटला आहे. बावनदीचे पाणी शेतीमध्ये आणि सखल भागात शिरले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पूरजन्य स्थितीमुळे जनसंपर्क तुटला आहे. बावनदीच्या पुरामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे दैनंदिन कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मुसळधार पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही संगमेश्वर तालुक्याला झोडपून काढले आहे. पुराच्या शक्यतेने किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा फटका संगमेश्वर येथील दुकानदारांना बसला आहे. पावसामुळे माती ओली झाल्याने नदीकिनाऱ्याकडील भाग अचानक खचला आणि तेथील ३ दुकाने नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत बाबासाहेब प्रभावळे यांच्या ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट्स दुकानाचे सुमारे १ लाख १५ हजार रुपये, अजय निवळकर यांच्या टीव्ही दुरुस्तीच्या दुकानासह दिलीप हरी जोशी यांच्या फोटो स्टुडिओचेही नुकसान झाले आहे. या भागातील इतर दुकानांनाही धोका पोचण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची मागणी होत आहे.
प्रशासन सध्या पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही, नागरिकांनी सतर्क राहावे आणि पूरग्रस्त भागातून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या पूरस्थितीमुळे परिसरातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किनारीभागातील शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
--------

(बातमी क्र. २ )

संगमेश्वर तालुल्यात
२१ तास वीज खंडित
ग्राहकांमध्ये नाराजी ; दोन्ही मुख्य वाहिन्या नादुरुस्त
संगमेश्वर, ता. १८ ः संगमेश्वर तालुक्यात रविवारी (ता. १७) रात्री साडेसातच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा सलग २१ तास बंद होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि या कामाचे योग्य नियोजन करण्यासाठी महावितरणचे अभियंता संगमेश्वर येथे उपस्थित नसल्याने पूर्ण तालुक्याचा वीजपुरवठा खंडित होता.
रविवारी सकाळी ११ वाजता संगमेश्वर तालुक्याला वीजपुरवठा करणारी निवळी-संगमेश्वर ही ३३ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी नादुरुस्त झाली. यानंतर ही वीजवाहिनी तत्काळ दुरुस्त करण्यासाठी कोणतीही हालचाल केली गेली नाही. दिवसभरात या वीजवाहिनीकडे योग्य नियोजनाअभावी लक्ष दिले गेले नसल्याने निवळी-संगमेश्वर वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही. निवळी संगमेश्वर ३३ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी नादुरुस्त असतानाच रविवारी रात्री ७.३०वा. दरम्यान आरवली ते संगमेश्वर ही ३३ केव्ही क्षमतेची दुसरी वीजवाहिनी नादुरुस्त झाली. दोन्ही बाजूने संगमेश्वर तालुक्याला होणारा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी संगमेश्वर-आरवली या ३३ केव्ही वीजवाहिनीवर दुरुस्तीचे काम करण्यासाठी रवाना झाले होते; मात्र मुसळधार पाऊस, रात्रीची वेळ आणि जंगलभागातून गेलेली वीजवाहिनी यामुळे आरवली-संगमेश्वर ही ३३ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी दुरुस्त होऊ शकली नाही, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
गणेशोत्सवामुळे कारखान्यात मोठी लगबग सुरू आहे; मात्र सलग २१ तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने गणेशमूर्ती कारखानदारांनीदेखील महावितरणविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आरवली ते संगमेश्वर या ३३ केव्ही क्षमतेच्या वीजवाहिनीवर रविवारी रात्री थांबवलेले दुरुस्तीचे काम करण्यासाठी सोमवारी सकाळी महावितरणचे कर्मचारी रवाना झाले. रात्रभर खंडित असलेला संगमेश्वर तालुक्याचा वीजपुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्ष वीजपुरवठा सुरू होण्यास दुपारचे ४.३० वाजून गेले.
--------
कोट
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना महावितरणकडून सलग २१ तास वीजपुरवठा खंडित राहतो. मग ऐन गणेशोत्सवात चांगल्या सेवेची हमी कशी मिळेल? असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला असून, या घटनेकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणने संगमेश्वर तालुकावासियांच्या भावनांचा अंत पाहू नये.
- विनोद म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते, संगमेश्वर
--------------
कोट
गणेशोत्सवात महावितरणकडून असाच बेजबाबदार कारभार केला गेला तर ग्राहकांचा संताप उफाळून येईल. संगमेश्वर महावितरणच्या कारभाराला कोणीच वाली नाही, अशी स्थिती यातून पुढे आली. लोकप्रतिनिधींसह महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी संगमेश्वर येथील खंडित वीजपुरवठा प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी.
- राकेश जाधव, सामाजिक कार्यकर्ता, असुर्डे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT