धरण व्यवस्थापनातून पूरसमस्या निकाली
प्रांताधिकारी लिगाडेः संरक्षण भिंती, गाळउपसा, प्लास्टिकमुक्तीवर भर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः चिपळूण शहराला दरवर्षी भेडसावणारी पुराची समस्या कोळकेवाडी, कामथे, मोरवणे आणि अडरे या धरणांच्या पाणीपातळीवर नियंत्रण ठेवल्यास सुटू शकते, अशी माहिती प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली. याशिवाय, संरक्षण भिंतींचे बांधकाम, गाळ उपसण्याची प्रक्रिया, नालेसफाई आणि प्लास्टिकमुक्त चिपळूण ही पूरनियंत्रणासाठी अत्यावश्यक पावले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चिपळूणमध्ये १७ ते १९ या कालावधीत मुसळधार पाऊस झाला. कोळकेवाडी परिसरात ५ दिवसांत १ हजार मिमी तर चिपळूणमध्ये ३६ तासांत ३०० मिमी पावसाची नोंद झाली. मंगळवारी पुराचे पाणी शहरात शिरले असले तरी प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे मोठे नुकसान टळले. प्रांताधिकारी लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली महाजनको, कोळकेवाडी धरण प्रशासन, नगरपालिका, पोलिस यंत्रणा, तहसील कार्यालय आणि अन्य विभागांमध्ये उत्तम समन्वय साधण्यात आला.
कोळकेवाडी धरणातून दरवाजे उघडून पाणी न सोडता वीजनिर्मितीनंतरचे अवजलच वाशिष्ठी नदीत सोडले जाते. त्यामुळे धरणाची पातळी समतोल ठेवण्यासाठी किती टर्बाईन सुरू कराव्यात हे नियोजन महत्त्वाचे ठरते. भरती-ओहोटीची वेळ आणि शहरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन अवजल सोडण्याची वेळ समायोजित करण्यात आली. त्यामुळे पुराच्या परिणामावर नियंत्रण मिळवता आले. कोळकेवाडीप्रमाणेच कामथे, मोरवणे आणि अडरे ही लहान धरणेदेखील चिपळूण परिसरातील पूरस्थितीवर परिणाम करतात. त्यामुळे या धरणांच्या पातळीवरही नियंत्रण ठेवण्याचे नियोजन सुरू असल्याचे लिगाडे यांनी सांगितले.
चौकट
पूरनियंत्रणासाठी उपाययोजना
* नलावडे बंधाऱ्यामुळे यंदा फायदा झाला. शहरातील इतर संवेदनशील ठिकाणीही संरक्षण भिंती उभारणे आवश्यक आहे.
* शासन व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नदीतील गाळ उपसा सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत होत आहे.
* वाशिष्ठी नदीत गोवळकोट परिसरात काही बेटे हटवल्यास नदीप्रवाह मोकळा होऊन पुराचा धोका कमी होईल.
* एप्रिलपासूनच शहरातील नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले होते.
चौकट
प्लास्टिकमुक्तीसाठी हवे प्रयत्न
प्लास्टिक कचरा पूरस्थितीचे एक प्रमुख कारण ठरत आहे. प्लास्टिकमुक्त चिपळूण हे अभियान सतत व प्रभावीपणे राबवले पाहिजे, असे मत लिगाडे यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.