‘बेनीखुर्द-खरेवसे’चे दोन सदस्य अपात्र
ग्रामस्थांच्या तक्रारी ; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश पारीत
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २६ ः बनावट कागदपत्रे तयार करून पत्नी, मुले आणि नातेवाइकांच्या नावाने सरकारी योजनांच्या कामांची ठेकेदारी परस्पर घेऊन मनमानी पद्धतीने कारभार केल्याचा आरोप असलेल्या बेनीखुर्द-खेरवसे ग्रुपग्रामपंचायतीच्या दोन्ही सदस्यांना ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर अपात्र घोषित करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून एम. देवेंदर सिंह यांनी आदेश जारी केला आहे.
बेनीखुर्द-खेरवसेतील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांनी परस्पर ठेकेदारी घेऊन मनमानी कारभार केल्याने दोन्ही सदस्यांविरोधात ६ महिन्यांपूर्वी म्हणजेच ५ फेब्रुवारी रोजी आक्रमक पवित्रा घेत हल्लाबोल केला होता. न्याय मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीमधून हटणार नाही, असा पवित्रा घेतला होता तसेच मनमानी करणाऱ्या सदस्यांवर कठोर व दंडात्मक कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली होती. अखेर दोन्ही सदस्य अपात्र झाल्याने ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले. लांजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही सदस्यांना अपात्र केले. ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय बंडबे व सदस्य किरण गुरव हे चौकशीअंती अपात्र असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारीत केले आहेत.
---