मालिकेचे नाव ः वैभववाडी रेल्वेस्थानकाचा हुंदका-भाग दोन
swt289.jpg
87733
वैभववाडी रेल्वेस्थानकाचे संग्रहीत छायाचित्र
गाड्या थांबेनात; सुशोभिकरण होईना
ग्रहण लागलेलेचः आवाज उठविण्याच्या पातळीवरही उदासिनता
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २८ः वैभववाडी रेल्वे स्थानकात जलद गाड्यांना थांबा मिळेना आणि या रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण देखील होईना, अशी गत झाली आहे. तरीदेखील यासंदर्भात कुठल्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी उठाव करायला तयार नाहीत की, सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करायला पुढे येत नाहीत. त्यामुळे येथील रेल्वे स्थानकाला लागलेले समस्यांचे ग्रहण सुटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
वैभववाडी हे मुंबईकडून येताना सिंधुदुर्गातील पहिले स्थानक आहे. या स्थानकात पाच तालुक्यांतील प्रवाशी येतात; परंतु देवगड, विजयदुर्गातून थेट वैभववाडीत येता येते, तसेच गगनबावड्यातील प्रवाशांना देखील वैभववाडी स्थानकात येणे सोपे वाटते. कणकवली तालुक्यातील लोरे, फोंडा, वाघेरी, नांदगाव, तळेरे, खारेपाटण येथील प्रवाशांना हे स्थानक सोयीस्कर आहे, तरी देखील या स्थानकात किरकोळ गाड्यांना थांबा आहे. मांडवी, तुतारी, दिवा आणि शिवसेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख बंडू मुंडल्ये यांनी संघर्ष केला म्हणून ''कोकणकन्या एक्स्प्रेस''ला थांबा मिळाला; मात्र त्यानंतर कोणत्याही जलद गाडीला वैभववाडीत थांबा मिळालेला नाही आणि जलद गाडी थांबण्यासाठी कुणी संघर्ष, आंदोलनही केले नाही. राजकीय, सामाजिक इच्छाशक्तीच गोठून गेल्याचे चित्र तालुक्यात आहे. प्रवाशांबाबत सत्ताधारी, विरोधकांना कुणालाच काही पडलेले नाही. सुट्या, सण, उत्सवात दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते; परंतु गाड्यांअभावी त्यांची परवड होते. जलद गाड्यांसाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून ६० किलोमीटरचे कारण पुढे केले जाते. सावंतवाडी किंवा कुडाळमध्ये थांबणाऱ्या जलद गाडीला वैभववाडीत थांबा मिळणे शक्य आहे; मात्र रेल्वे प्रशासनाकडून वैभववाडीला दुर्लक्षित ठेवले जात आहे. वैभववाडी रेल्वे स्थानकाच्या उत्पन्नाचा कानोसा घेतला तर तो थक्क करणारा असून, जिल्ह्यातील सर्व स्थानकांच्या तुलनेत सरासरी अधिक आहे. त्यामुळे अजून किमान दोन ते तीन जलद गाड्यांना वैभववाडीत थांबा मिळणे अपेक्षित आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण करण्यात आले; परंतु तेथे देखील वैभववाडी हे नावडते ठरले. येथील स्थानकाचे सुशोभिकरण करण्यात आले नाही. प्रत्येक वेळी वैभववाडीच्या वाट्याला ''शून्य'' का येतो, असा प्रश्न वैभववाडीतील हजारो प्रवाशांना पडला आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत वैभववाडीत एकही आंदोलन, उपोषण झालेले नाही. त्यामुळेच रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते का, असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे. कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेने दोन ते तीन जलद गाड्यांना थांबा मिळण्याची मागणी केली आहे.
कोट
वैभववाडी स्थानकात पाच जलद गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी आम्ही कोकण रेल्वेकडे केली आहे. यामध्ये नेत्रावती, एर्नाकुलम, पुणे, जनशताब्दी, एलटीटी मडगाव या पाच गाड्यांचा समावेश आहे. यातील काही गाड्यांना थांबा न मिळाल्यास येत्या काळात स्पष्ट भूमिका घेणार आहोत.
- चंद्रकांत मुद्रस, अध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवाशी संघटना, मुंबई