95921
मोकाट गुरांनी अडवला रस्ता
पोफळी मार्गावर उपद्रव; कोंडवाड्यात टाकण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ : सती-चिंचघरी येथील रस्त्यावर अनेक मोकाट गुरे एकत्रितपणे वावरत आहेत. या गुरांमुळे पूर्ण रस्ता अडवला जात आहे. पोफळी मार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकून संबंधित मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.
चिपळूण-पोफळी मार्ग खड्ड्यांनी भरलेला आहे. आता वाहने चालवताना मोकाट गुरांचाही रस्त्यावर वावर असल्याने अनेक अडचणी येत आहेत. खेर्डी, सती चिंचघरी, पेढांबे, कान्हे, शिरगावदरम्यान मोकाट गुरांना वाली नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. मार्गावरच ठिय्या देणारी मोकाट गुरे अपघाताला कारणीभूत ठरत असून या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पेढांबे येथे महामार्गालगत एका खासगी कंपनीचे सिमेंटचे गोडाऊन आहे. त्याठिकाणी सिमेंट वाहतूक करणारे ट्रक येतात. या ट्रकांना गुरे धडकल्याने अपघात होत आहे. रात्री येथे विजेची सोय नाही. त्यामुळे गुरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्याने रात्री अपरात्री अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. पेढांबे कालव्यालगतच्या परिसरामधील शेतकरी, आपल्या जनावरांना डोंगरावर चरण्यासाठी सोडून जातात. दिवसभर ती चाऱ्याच्या शोधात भटकत असतात. सायंकाळच्या वेळी मालक नेण्यासाठी येतील या आशेने ही सर्व जनावरे रस्त्यावर ठिय्या देऊन बसतात. पश्चिम महाराष्ट्रातून भाजी विक्रीसाठी येणारे व्यापारी जाताना उरलेली भाजी रस्त्याच्याकडेला फेकून देतात. ही गुरे रस्त्याच्याकडेला उगवलेले गवत आणि व्यापाऱ्यांनी फेकलेली भाजी खाण्यासाठी जमतात.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका अनोळखी वाहनाच्या धडकेत एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली. गेल्या महिनाभरात अनेक छोटे-मोठे अपघात या मोकाट जनावरांमुळे घडले आहेत. या अपघातात दुचाकीवर प्रवास करणारे प्रवासी जखमी झाले आहेत.
सती चिंचघरी मार्गावर मोकाट गुरांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पावसात ही गुरे रस्त्यावर उभी राहिल्याने अपघात होतात. सती चिंचघरी येथे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात. शाळा सुटल्यानंतर ते बस स्थानकावर उभे असतात. मात्र त्याठिकाणी गुरे उभी राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
कोट
गो माताचे रक्षण व्हायला हवे. मोकाट गुरे सोडणे हा गंभीर गुन्हा आहे. गुरांमुळे अपघात होतात. त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांचे जीव धोक्यात आले आहेत. पोलिस आणि संबंधित ग्रामपंचायतीने गुरांच्या मालकांना प्रथम समज द्यावी, तरीही ते एकत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.
- किशोर चाळके, सती चिंचघरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.