मालवणात रविवारी विजयादशमी उत्सव
मालवण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मालवण तालुका शाखेने यावर्षीचा विजयादशमी उत्सव रविवारी (ता. ५) सायंकाळी ५ ते ६.१५ या वेळेत कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे आयोजित केला आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर १९२५ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला लवकरच शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक वाटचालीच्या निमित्ताने या विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात संघाने आजपर्यंत केलेली वाटचाल आणि भविष्यातील समाज परिवर्तन कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. बापूजी परब, विश्व हिंदू परिषद रत्नागिरी विभाग मंत्री विवेक वैद्य हे वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. निवेदक म्हणून मालवण तालुका कार्यवाह रत्नाकर कोळंबकर काम पाहणार आहेत.
..................
शिक्षकांचा रविवारी मूक मोर्चा
कणकवलीः शिक्षकांसाठी प्रस्तावित टीईटी परीक्षेसंदर्भात शासनाने तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने रविवारी (ता. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मागण्यांमध्ये टीईटी परीक्षेसंदर्भात शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करून राज्यातील शिक्षकांना दिलासा द्यावा. गरज भासल्यास आरटीई अॅक्ट, २००९ मध्ये आवश्यक ती सुधारणा व्हावी. १५ मार्च २०२४ संचमान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्द करावा. शिक्षण सेवक योजना कायमची रद्द करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. याबाबत शासन स्तरावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी केली आहे.
.......................
स्मशानभूमी रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वेंगुर्ले ः आडेली भंडारवाडी येथे सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी आडेलीतील ग्रामस्थ विठोबा टेमकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. आडेली भंडारवाडी येथील भूमापक क्रमांक २३ खाते क्रमांक २०७ गाव नमूना सात ही मिळकत महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत आडेली यांच्या मालकीची असून या जागेमध्ये भंडारवाडीकरिता स्मशानभूमीची नोंद आहे. स्मशानभूमीकडे जाण्याकरिता रस्ता नसल्याने तेथील ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सेवा पंधरवड्यात या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
.......................
रेडी सेंट्रल स्कूलमध्ये स्नेहमेळावा उत्साहात
सावंतवाडीः जिल्हा परिषदेच्या सेंट्रल प्रायमरी स्कूल रेडी शाळा क्र. १ या प्रशालेत श्री देव ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ दादा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी स्नेहमेळावा झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा कांबळी यांनी उपस्थितांचे स्वागत करून शाळेच्या गरजा मांडल्या. निवृत्त शिक्षक त्रिंबक आजगावकर यांनी या मेळाव्याचा उद्देश विशद करून शाळेच्या भौतिक गरजांविषयी माहिती दिली. माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सरपंच रामसिंग राणे, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, दादा नाईक, मुख्याध्यापिका कांबळी, त्रिंबक आजगावकर, पोलिसपाटील कृष्णा पांडजी, अमित मडये, ग्रामपंचायत सदस्या प्रज्ञा राऊळ, सुनील सातजी, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष गोपाळ राऊळ, शिक्षक-पालक अध्यक्ष प्रणिती रेडकर, रावजी राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
.....................
पंडित उपाध्याय यांना कणकवलीत अभिवादन
कणकवलीः तालुका भाजपतर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील बस स्थानकासमोरील खासदार नारायण राणे संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भारतीय जनसंघाचे प्रमुख नेते आणि आरएसएसचे विचारवंत, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनाबाबत यावेळी विचार मांडण्यात आले. यावेळी मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संयोजक संदीप सावंत शहर अध्यक्ष अण्णा कोदे, संदीप भोसले, शिशिर परुळेकर, भाई आंबेलकर, निसार शेख, रघुनाथ चव्हाण, अभय गावकर, सागर पवार, महेश गोसावी, बाळकृष्ण मेस्त्री आदी उपस्थित होते.
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.