संग्रहित छायाचित्र टाकणे
आंबा घाटात साडेतीन किमीचा बोगदा
सर्वेक्षण सुरू ः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटातील धोकादायक वळणे काढण्यासाठी साडेतीन किलोमीटरचा बोगदा खोदण्यात येणार आहे. या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. खासगी ठेकेदारामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
महामार्गावर आंबा घाटातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंबा घाट-बोथटवाडा पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवी मुंबई येथील खासगी सल्लागार संस्थेला सर्वेक्षणाचे काम दिले. सर्वेक्षणानंतर बोगद्याचा लांबी, रुंदी आणि तांत्रिकदृष्ट्या आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यानंतर अंदाजपत्रक तयार करून मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने बोगद्याचे काम सुरू होणार आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. आंबा घाट सुमारे सात किलोमीटर लांबीचा आहे. या घाटात अनेक ठिकाणी अतिशय धोकादायक आणि तीव्र वळणे आहेत. यामुळे घाटात अनेकदा अपघात आणि वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात तर या घाटातून प्रवास करणे मोठे जिकिरीचे ठरते. वारंवार दरडी कोसळण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर, घाटाची सुधारणा आणि रुंदीकरण करताना, ही धोकादायक वळणे कायमस्वरूपी वगळण्यासाठी बोगद्याचा पर्याय निवडला आहे. साडेतीन किलोमीटरचा बोगदा तयार झाल्यास, घाटातील धोकादायक भाग पूर्णपणे टाळता येणार आहे आणि प्रवास अत्यंत सुरक्षित व जलद होणार आहे.
पर्यायी सर्वेक्षण करून रस्त्याचे डिझाइन
आंबा घाटाचा उतार, पश्चिम घाटातील कठीण डोंगररांगा, तसेच रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील भौगोलिक रचना लक्षात घेऊन हा रस्ता सुरक्षित व चारपदरी करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या घाटात ५०० मीटरपेक्षा अधिक खोल दऱ्या असून, अनेक ठिकाणी घसरणीचा धोका आहे. पर्यायी सर्वेक्षण करून रस्त्याचे डिझाइन अंतिम करण्याचे आदेश दिले आहेत.
सुरक्षा व पर्यावरणाचा विचार
या प्रकल्पासाठी डिझाइन स्पीड प्रतितास ४० किमी ठेवण्यात आला आहे. तसेच ३०० मीटर, २०० मीटर आणि १०० मीटर लांबीचे आणखी बोगदे तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय घाटातील वन्य प्राणी, राष्ट्रीय उद्यान व जंगल परिसराचा पर्यावरणीय समतोल राखत रस्ता सुधारणा करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.