शासकीय जमिनीवर २११ अतिक्रमणे
सेवा पंधरवडा सर्व्हे; सर्वांना घरे उपक्रमांतर्गत परवानग्या
राजेश शेळके ; सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : शासनाच्या सेवा पंधरवड्याच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे अभियानांतर्गत महसूल विभागाने जिल्ह्यात केलेल्या सर्व्हेक्षणात ९ तालुक्यात २११ ठिकाणी शासकीय जमिनीमध्ये अतिक्रमण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामध्ये गावठाण, गायरान, वनजमीन आणि शासकीय जमिनींचा समावेश आहे. जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणे, आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत नसल्यास अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहेत.
सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत वाटप केलेल्या शासकीय जमिनीतील अतिक्रमणं नियमानुकूल केलेल्या लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत. ही संमती वेगवेगळ्या अधिकाराखाली देण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. गायरान जमिनीतील अतिक्रमणाबाबत शासनाकडे गावठाण स्वामित्व धनांतर्गत तर शासकीय जमिनीवरील प्रकरणे प्रांताधिकाऱ्यांकडे चौकशी करून सोडवली जातील. विशेष म्हणजे गायरानमधील महसूल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अनेक जागांमध्ये जी घरे आहेत, त्यांना नियमामध्ये बसवून प्रशासनाने नाहरकत दाखले दिले आहेत. त्यामुळे अनेकांना हक्काची घरे मिळाली आहेत. टप्प्याटप्प्याने उर्वरित निर्णय प्रक्रियादेखील लवकरच होईल, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.
जिल्ह्यात झालेल्या सर्व्हेत शासकीय जमिनीवर सुमारे २११ ठिकाणी अतिक्रमणं आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात सर्वांत जास्त ७० अतिक्रमणे आहेत. त्या खालोखाल रत्नागिरीत ४६, राजापुरात ४४ आणि दापोलीत ३८ अतिक्रमणे आहेत. त्यात गावठाण ४, गायरान ४७, वनजमीन ३९, इतर विभागाच्या जमिनींमध्ये २ तर शासकीय जमिनीत २८ अतिक्रमणे आहेत. तसेच शहरी भागात गावठाण जागेत ५९, पुनर्वसनाखालील जमिनीत ३०, शासकीय जमिनीत २ अतिक्रमणे आहेत.
चौकट
शासकीय जमीन कब्जे हक्काने देणार
राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे व सुरक्षित घर मिळाले पाहिजे, यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्यशासनही प्रयत्नशील आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी कोणत्याही बंधनाशिवाय वाटपासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन लवकरच कब्जे हक्काने प्रदान करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी अस्तित्वातील रहिवासी प्रयोजनासाठी असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करण्यात येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.