फोटो
P25O06027
व्यक्तीविशेष.......लोगो
मूल्याधिष्ठित वकिली व्यवसायाची पन्नाशी
रत्नागिरीतील प्रसिद्ध वकील मुकुंद भिडे यांच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी बारने त्यांचा नुकताच सन्मान केला. यासाठी पुढाकार घेणारे रत्नागिरी बारचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी सांगितल्यानुसार चारित्र्य, सचोटी, व्यावसायिक मूल्य जपून वकिली करणारी पिढी आजही समोर पाहायला मिळते आहे. त्यांच्याकडून काही शिकावे आणि मूल्यविवेक बाळगून काम करणाऱ्या वकिलांचे उदाहरण पुढील पिढीसमोर ठेवावे, या दृष्टिकोनातून हा सन्मान करण्यात आला. वकिलीपलीकडील त्यांचे इतर पैलू येथे टिपले आहेत.
- शिरीष दामले, रत्नागिरी
-----
सध्या सामाजिक जीवनात मूल्य, निष्ठा यांना फारसे महत्त्व नाही, असा एक विचार बळावतो आहे. तरुणांमध्ये तर तो अधिक, अशावेळी ॲड. मुकुंद भिडे यांच्यासारख्यांचे उदाहरण समोर ठेवण्यात बारने उत्तम कामगिरी केली आहे. याबाबत ॲड. पाटणे आणि त्यांचे सहकारी यांना धन्यवाद द्यायला हवेत.
ॲड. भिडे यांनी कोणती मूल्ये बाळगून आणि अभ्यास करत वकिली कशी केली, याची अनेक उदाहरणे पन्नास वर्षात सापडतील. त्यांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणारे एका डॉक्टरचे उदाहरण नमूद करण्यासारखे आहे. या डॉक्टरचे कुटुंब आणि भिडे वकिलांचे घराणे यांच्यामध्ये जमीनजुमला यावर कोर्टामध्ये केसेस झाल्या आहेत. स्वाभाविक ॲड. मुकुंद भिडे यांनी केस लढवली. विरुद्ध पक्षाचे डॉक्टर यांचे बँकेशी संबंधित काही काम होते. त्यासाठी वकिलांचे प्रमाणपत्र हवे होते. बँकेने त्यांना तुमचे काम कोणाकडे देऊ, असे विचारले. भिडे हे त्या बँकेच्या पॅनेलवर होते. त्या डॉक्टरांनी काम भिडेच करू देत, असे सांगितले. त्यावर बँक अधिकारी आश्चर्यचकित झाला. त्या डॉक्टरने सांगितले, आमचा भिडे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. भिडे यांनी ते काम अत्यंत व्यावसायिक पद्धतीने केलेच शिवाय त्यावर बँकेसाठी शेरा मारला फी आकारू नये.
भिडे अत्यंत संतापी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे मत अत्यंत कठोर शब्दात ते सांगतात. भोंगळपणा त्यांना अजिबात चालत नाही. जे कागद हवेत असे सांगितले ते द्यावेच लागतात. विनाकारण चर्चेचे गुऱ्हाळ आणि फापटपसारा नाही. आपल्या बोलघेवड्या आणि गोष्टीवेल्हाळ समाजात हे चालत नाही; मात्र भिडे यांच्या वकिलीत हे त्यांचे संतापीपण आड आले नाही. अशील दुखावले तरी आपले काम हाच वकील योग्य करेल, असा विश्वास अशिलाला वाटतो. भिडे यांच्या दिलदारपणाचा आणि खवय्येगिरीचा अनुभव त्यांच्या ज्युनिअर्सना कायम येत असतो. भिडे यांचा शेतीत जीव गुंतलेला असतो. शेतीसह गुरेढोरे याची त्यांना अत्यंत आवड आहे. त्याबाबतचे ज्ञान अतिशय उत्तम आहे. त्यांच्याकडे शेतकरी व बागायतदार अशील म्हणून आला असला तर कोर्टाच्या कामाच्या बाहेर शेती-बागायती, गुरे याची चर्चा होते. या प्रसंगी तो याबाबत सल्लाही घेऊन जातो किंवा भिडे त्याच्याकडून अधिक माहिती घेतात. कोर्टाच्या आवारात लावलेली अनेक झाडे त्यांच्या शेतीच्या व वृक्षलागवडीच्या आवडीची साक्ष आहे. एखाद्या ठिकाणचे उत्तम झाड दिसले तर त्याची चौकशी करून तो मातृवृक्ष म्हणून किती चांगला आहे, याची चर्चा करून त्यावर कलमे बांधण्याचा खटाटोप अगदी ते झाड दुसऱ्याचे असले तरीही ते पूर्ण करतात.
खैरतोडीवरील बंधने आता कमी झाली; मात्र भिडे यांनी ही कल्पना तीस वर्षांपूर्वी लिखित स्वरूपात मांडली होती. खैर वाढवा, तोडा त्यापासून पैसा मिळवा आणि शेतीबाह्य पडीक जागी खैर लावा, अशी ती कल्पना होती. सध्या सरकारने त्याबाबत अनुकूल धोरण सुरू केले आहे. शेतीतील त्यांच्या दूरदृष्टीची आणि मूलभूत विचारांची ही झलक आहे.
भिडे यांच्याकडे वकिलीतील उमेदवारी केलेल्या अॅडव्होकेट लोवलेकर यांच्यासोबत गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ बालकल्याण समितीत काम करत असताना कामातील काटेकोरपणा, शिस्त, कायद्याबाबत सजगता, भाषेतील स्पष्टता आणि कायद्यानुसारच काम करणे हे गुण आम्ही भिडेकाकांकडून घेतले आहेत, असे त्या वारंवार सांगतात. एका शिष्याने आपल्या गुरूप्रति अशी कृतज्ञता सतत व्यक्त करणे, यापेक्षा गुरूसाठी अधिक समाधानाची बाब ती कोणती!
वकिली व्यवसायाशी प्रामाणिक आणि स्वतःशीही प्रामाणिक राहणारी पिढी त्यांनी अनुभवली आणि त्याचे त्यांनी अनुकरणही केले. याबाबत उदाहरण सांगण्यासारखे आहे. ॲड. संदेश शहाणे यांना दिवाणी दाव्याबाबत काही मार्गदर्शन हवे होते. ते स्वर्गीय घागकाकांचे चेले. स्वाभाविक त्यांनी घागकाकांना शंका विचारली. घागकाकांनी त्यांना दिलेले उत्तर वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते म्हणाले, याबाबत माझ्यापेक्षा तू मुकुंद भिडेंना विचार. शहाणे त्यांना भेटायला भीतभीतच गेले कारण, संतापी अशी ओळख. भिडेंनी त्यांचे कागद बारकाईने वाचले. मार्गदर्शन केले आणि एक वेगळाच अनुभव मिळाला, असे शहाणे सांगतात. यामध्ये घागकाकांचाही मोठेपणा दिसून येतो.
ते अतिशय उत्तम बुद्धिबळ खेळत. त्यांनी आम्हाला पायलीचा कंदील करायला शिकवला आहे. भिडे यांनी त्यांच्या तरुणपणी हौशी नाटकात अभिनय केला आहे. करिअरच्या आरंभी मुंबईत उत्कर्ष मंदिर मालाड या संस्थेत शिक्षक होते. नोकरी करत असताना मुंबईतील क्लासेसमध्ये जाऊन त्यांनी एलएलबी पूर्ण केले. ते विद्यार्थिप्रिय होते. तत्कालीन अकरावीचे विद्यार्थी त्यांच्या शिकवण्यावर खूश असत. परीक्षा झाल्यावर काही विद्यार्थी अक्षरशः नाचत त्यांच्याकडे येत आणि त्यांच्या शिकवण्याची जणू पावती देत. त्यांचे गणितावर प्रभुत्व आहे. आकडेमोड ते झटपट करतात. त्यांचे आकलन अचूक झटपट असते आणि हिशोब तोंडी सांगतात. त्या वेळी बँक अधिकारी आणि त्यांचे ज्युनिअर्स गोंधळून गेले तर नवल नव्हे. भिडे यांचा यांचा विनोद मार्मिक असतो. त्यांचे बोलणेही मिश्किल, मार्मिक असते. ते रागावत नाहीत तोपर्यंत चेष्टा मस्करीही असते. ते सुरेख काव्य करत. माझ्या आईला त्यांनी लिहिलेले २५ वर्षांपूर्वीचे आंतर्देशीय पत्र काही दिवसांपूर्वी बाडामध्ये मिळाले. त्यामधील त्या दोघांतील संवाद जिव्हाळा आणि भिडे यांचे काव्यसामर्थ्यही अनुभवास आले होते. त्यांच्या स्वभावातील या अशा छटा लोकांना अल्पच जाणवतात. ते रत्नागिरीत आल्यापासून म्हणजे गेल्या पन्नास वर्षात त्या मी अनुभवल्या आहेत. गेल्या दहा वर्षात यात बराच खंड पडला. त्यामुळे अर्थात तोटा आम्हा पुढील पिढीचा झाला आहे.