लोटे-परशुराम एमआयडीसीने ग्रामीण अर्थकारणाला ''बुस्टर''
३५ हजार हातांना काम ; अडीच हजार एकरवर पहिली औद्योगिक वसाहत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ः लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीच्या निर्मीतीनंतर गेल्या काही वर्षात आजुबाजूच्या गावातील लोकांना जोड व्यावसायामुळे उत्पन्नाचे साधन निर्माण झालेले आहे. परजिल्ह्यातून किंवा अन्य तालुक्यातून कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आलेल्या लोकांच्या निवास व्यवस्थेतूनही आर्थिक स्रोत निर्माण झालेले आहेत. येथील कंपन्यांमधून ३५ हजार लोकांना रोजगार निर्माण झालेला आहे.
लोटे-परशुराम परिसरात १९८३ मध्ये अडीच हजार एकर क्षेत्रावर पहिली औद्योगिक वसाहत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उभी राहिली. त्यानंतर अतिरिक्त लोटे एमआयडीसीसाठी सुमारे सहाशे एकर जमीन एमआयडीसीने संपादित केली. दोन्ही औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून विविध कंपन्या आहेत. त्यामुळे लोटे परिसरामध्ये मोठे स्थित्यंतर झाले. त्यामुळे आजुबाजुच्या गावातील परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली. औद्योगिक वसाहतीत बहुराष्ट्रीय तसेच स्थानिक राज्यातील, विविध कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला. परजिल्ह्यातील लोकं येथे आल्यामुळे गृह प्रकल्पांची संख्या वेगाने वाढली. ती अजूनही वाढतच आहे. येथील शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सधन बनला आहे.
लोटे व परिसरातील गावात सुमारे ५०० हून अधिक भाड्याच्या खोल्यांची संख्या आहे. भाड्याच्या खोल्या कामगार वर्गासाठी बांधायच्या आणि त्यातून उत्पन्न मिळवायचे हा फंडा अनेकांनी अवलंबला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात भाड्याच्या खोल्या, भाड्याच्या चाळी, काही भाड्याच्या खोल्यांचे अद्ययावत प्रकल्प येथे पहावयास मिळतात. एका खोलीला एक हजार, दोन हजार रुपयांपासून पाच हजार रुपये भाडे काहीजण आकारतात. एका लोटे गावात खोल्यांची संख्या २५० पेक्षा जास्त आहे. त्यातून मालकांना चांगले उत्पन्न मिळत आहे. लोटे परिसरात कारखाने उभे राहिल्यानंतर अनेक जोडधंदे सुरू झाले. उपहारगृह, हॉटेल, किराणा शॉपी, सुपर मार्केट व इतर व्यवसाय सुरू केले. वाळू, डबर (दगड) विटा, मुरूम, माती, पाणी कंपन्या विकत घेऊ लागल्या. जोडधंद्यातून येथील ग्रामस्थांना मदत मिळत आहे. लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधील मोठ्या कारखानदारांनी अनेक गावांना दत्त घेतले आहेत. या गावांमध्ये सीएसआरच्या माध्यमातून रस्ते, पाणीटंचाई, दिवाबत्ती शाळांची दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.
-----------
चौकट १
ग्रामपंचायतीला मिळतेय उत्पन्न
लोटे व परिसरातील गावे बदलली आहेत. या गावातील ग्रामपंचायती ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. ग्रामपंचायतीचे उत्पन्नही कोट्यवधी रुपयांचे झाले आहे. लोटे ग्रामपंचायतीला १३५ कंपन्या वर्षाला १ कोटी ७ लाखाचा कर भरतात. इतर गावच्या ग्रामपंचायतीची उलाढाल ही कोटीत आहे.
--------
चौकट २
गावांमध्ये उभी राहिली एमआयडीसी
* धमाणदेवी, घणेखुंट,आवाशी,परशुराम, पटवर्धन लोटे, पिरलोटे
* एमआयडीसीचे क्षेत्र : सुमारे अडीच हजार एकर
* भूखंड : ६५०
* चालू कारखाने : २९०
* एमआयडीसीची वार्षिक उलाढाल : सुमारे १५००० कोटी
* कामगारांची संख्या : सुमारे ३५०००
--------
कोट १
घाणेखुंट गावात नवीन घरांची संख्या वाढली आहे. गावात चारशे घर आहेत. यातील ५० टक्के घरे स्थानिकांनी भाड्याने देण्यासाठी बांधल्या आहेत. त्यामुळे घरपट्टीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
- हेमंत सोनकुसरे, ग्रामसेवक घाणेखुंट
---------
कोट २
अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये प्रदूषण विरहित कारखाने आले तर त्यांचे स्वागत केले जाईल. चांगले कारखाने आले तर आमच्या भागाचा विकास होईल. त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत.
- हुसेन ठाकूर, माजी सरपंच, असगिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.