- rat१९p८.jpg-
OP२६O१८७९९
सावर्डे : सुप्रसिद्ध अभिनेत्री गार्गी निळू फुले-थत्ते यांची मुलाखत घेताना डॉ. लीना जावक.
----
तंत्रज्ञान चांगले, पण अतिरेक घातक
गार्गी निळू फुले ः गोविंदराव निकम जयंतीनिमित्त मुलाखत
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १९ ः आजच्या काळात सोशल मीडियाला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व दिले जात आहे. तंत्रज्ञान चांगले असले तरी त्याचे दुष्परिणाम आता ठळकपणे दिसू लागले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या वापरावर योग्य बंधने असणे काळाची गरज आहे, अशी परखड भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री गार्गी निळू फुले-थत्ते यांनी मांडली.
सावर्डे येथे स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. लीना जावकर यांनी त्यांची सखोल आणि विचारप्रवर्तक मुलाखत घेतली. मुलाखतीवेळी गार्गी थत्ते यांनी आपले अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे मांडले. महान कलावंत निळू फुले यांच्या कन्या म्हणून जन्माला आल्यावर समाजाकडून असणाऱ्या अपेक्षा, येणारे दडपण आणि त्याचा मनावर होणारा परिणाम त्यांनी उलगडून सांगितला. त्या म्हणाल्या, ‘घरातील सामाजिक आणि वैचारिक बैठकीचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. एक कलाकार म्हणून काम करताना जमिनीशी नाते जोडणे आणि माणूस म्हणून वागणे हेच सर्वात महत्त्वाचे संस्कार मला मिळाले.’
अभिनय क्षेत्रातील प्रवासावर भाष्य करताना त्यांनी नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही माध्यमांतील फरकावर प्रकाश टाकला. केवळ कुणाचे तरी अपत्य आहोत म्हणून या क्षेत्रात यश मिळत नाही, तर त्यासाठी कष्ट, शिक्षण आणि गुरूंना दिलेले महत्त्व महत्त्वाचे असते. ‘ज्यांच्याकडे सृजनशीलता आहे, त्या प्रत्येक तरुणासाठी हे क्षेत्र खुले आहे, मात्र तिथे पूर्ण झोकून देऊन काम करावे लागते,’ असा सल्ला त्यांनी दिला.
या कार्यक्रमावेळी आमदार शेखर निकम, प्रमुख वक्ते यजुर्वेंद्र महाजन, संजीव करपे, शांताराम खानविलकर, मारुतीराव घाग, चंद्रकांत सुर्वे, मानसिंग महाडिक, आकांक्षा पवार, महेश महाडिक, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, प्रकाश राजेशिर्के, प्रदीप निकम, प्रशांत निकम, अंजली चोरगे, युगंधरा राजेशिर्के, पूजा निकम, बंधू पाकळे, मनोहर महाडिक, रज्जाक शेख आदी उपस्थित होते.