-rat१२p६.jpg-
२६O३०४४५
दापोली ः बुरोंडी नाक्यातील अतिक्रमण जेसीबीच्या मदतीने पाडण्यात आले.
----
दापोलीतील अतिक्रमणांवर नगरपंचायतीचा हातोडा
टपऱ्या, शेड, फलक पाडले; पादचाऱ्यांना दिलासा, मोठ्या व्यावसायिकांना अभय दिल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १२: शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी दापोली नगरपंचायतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. बसस्थानक ते बुरोंडीनाका, दाभोळ रोड आणि मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांलगत असलेल्या टपऱ्या, शेड, फलक आणि पदपथावरील अतिक्रमणे हटवण्यात आली. या कारवाईमुळे रस्ते मोकळे झाले असले तरी नगरपंचायत लहान व्यावसायिकांवरच कारवाई करते; मात्र मोठ्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न कारवाई झालेल्या छोट्या व्यावसायिकांकडून केला जात आहे.
दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग, नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी, कामगारवर्ग तसेच पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. बसस्थानकापासून मोहिमेला सुरुवात करून बुरोंडी नाका, दाभोळ रोड आणि मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांलगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या, शेड तसेच रस्त्यावर आलेले दुकानांचे फलक हटवण्यात आले. पदपाथ आणि त्यासमोरील भाग व्यापणारी अतिक्रमणे काढून टाकल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळीक मिळाली असून, रस्तेही प्रशस्त झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न काढणाऱ्या काही व्यावसायिकांचे साहित्य प्रशासनाकडून जप्त करण्यात आले.
केळसकर नाका परिसरातील नगरपंचायतीच्या इमारतीत गाळा घेतलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाने गाळ्याबाहेर अतिक्रमण केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच समोरील दुसऱ्या हॉटेल व्यावसायिकानेही आपल्या गाळ्याबाहेर हॉटेलचा विस्तार केल्याची चर्चा आहे. या व्यावसायिकाने नगरपंचायतीकडे सुमारे २२ लाख रुपये भरल्याचे सांगितले जात असले तरी ते केवळ गाळ्याचे भाडे असून, उर्वरित जागेचा वापर नियमबाह्य असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाहनाद्वारे खाद्यपदार्थ विक्री करून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याबाबतही नियमानुसार लवकरच कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी महादेवी रोडगे स्पष्ट केले.
---
कोट
दापोली हे पर्यटनस्थळ असल्यामुळे शहरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच न्यायालयाच्या सूचनेनुसार, ही कारवाई करण्यात आली असून पुढील काळात सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभागाच्या जागांवरील अतिक्रमणांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे.
--महादेव रोडगे, मुख्याधिकारी, दापोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.