‘लाडकी बहीण’ ई-केवायसीचा अडथळा
हजारो भगिनी वंचित; चुका दुरुस्त करण्यास संधी द्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः राज्यशासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ राज्यभरातील कोट्यवधी महिलांना मिळत असला तरी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेतील तांत्रिक चुकांमुळे हजारो पात्र महिला गेल्या ३-४ महिन्यांपासून लाभापासून वंचित राहिल्या आहेत. फॉर्म भरताना झालेल्या ‘हो’ किंवा ‘नाही’ या शब्दांच्या निवडीतील गोंधळामुळे अनेक गरजू महिलांचे हप्ते थांबले असून, या तांत्रिक चुका दुरुस्त करण्यासाठी पोर्टलवर पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दीपक सुर्वे यांनी केली आहे.
विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्र्यांना दिले आहे. योजना सुरू झाली तेव्हा मोबाईल ॲप आणि संकेतस्थळाच्या संथ गतीमुळे अनेक महिलांना सायबर कॅफे किंवा ऑनलाइन केंद्रांवरून अर्ज करावे लागले. सुरुवातीला पात्र ठरलेल्या या महिलांच्या खात्यात पैसेही जमा झाले; मात्र, नोव्हेंबर २०२५ च्या दरम्यान अनिवार्य करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. घाईगडबडीत किंवा कमी शिक्षणामुळे अर्जातील माहिती भरताना ‘हो’ ऐवजी ‘नाही’ किंवा ‘नाही’ ऐवजी ‘हो’ अशा शब्दांची निवड झाली. या एका छोट्या चुकीमुळे पात्र असूनही हजारो महिलांना ‘अपात्र’ ठरवण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा आणि तालुकास्तरावरील महिला व बालविकास कार्यालयात चौकशी केली असता, ‘ही चूक तुमच्याकडून झाली आहे, यात आम्ही काहीही करू शकत नाही, मंत्रालयातूनच दुरुस्ती होईल,’ अशी उत्तरे लाभार्थ्यांना मिळत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये संभ्रमाचे आणि निराशेचे वातावरण आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही त्यांची संख्याही मोठी असून, त्यांनाही आता तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे सुर्वे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.