workers entry issue konkan sindhudurg
workers entry issue konkan sindhudurg 
कोकण

चाकरमान्यांबाबत खल, काय आहे संभ्रम? वाचा...

शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात चाकरमान्यांना कसा प्रवेश द्यायचा यावरून खल सुरू आहे. प्रशासन आणि सत्ताधारी निर्णय घेण्यात चालढकल तर करत नाहीत ना? अशी शंका घ्यायला वाव निर्माण झाला आहे. विरोधकही मागे नाहीत. तेही आरोप-प्रत्यारोपात गुंतले आहेत; पण या प्रश्‍नावर लवकर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. याबाबत निर्माण झालेल्या दोन्ही प्रकारच्या मत प्रवाहांबाबत सुवर्णमध्य साधला गेला पाहिजे. 

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना सिंधुदुर्गात प्रवेश कसा दिला जाणार याची चर्चा पंधरावडाभर सुरू आहे. याचे नियोजन करण्याचे आदेशही निघाले. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सभासुद्धा झाली; पण त्याचे इतिवृत्त व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा प्रश्‍न संदिग्धतेच्या गर्तेत आणखी खोल रुतला आहे. 

या इतिवृत्तात चाकरमान्यांना प्रवेशासाठी 7 ऑगस्टची डेडलाईन दिली होती. शिवाय क्‍वारंटाईनबाबत विविध निकष चर्चेला आणले होते. गणेशोत्सव 22 ऑगस्टला आहे. इतके दिवस आधी चाकरमानी येऊ शकतील का? या प्रश्‍नावर इतिवृत्तामुळे तोंड फुटले. सोशल मीडियावर हा विषय ट्रोल झाला. यानंतर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी हे इतिवृत्त रद्दबातल ठरवण्याची सूचना केली. त्यांनी 7 दिवसांचे क्‍वारंटाईन करता येईल का, याची चाचपणी होत असल्याचे संकेत दिले. यामुळे गणेशोत्सवाचे नियोजन पुन्हा आहे त्या संभ्रमाच्या अवस्थेत पोहोचले. 

या प्रश्‍नाला दोन बाजू आहेत. चाकरमान्यांच्या बाजूने विचार करता अनेकांची घरे कायम बंद असतात. मुंबई-पुणेकर चाकरमानी गणेशोत्सवाला येऊन हा सण साजरा करतात. या सणाशी त्यांचे कित्येक पिढ्यांचे धार्मिक आणि भावनिक नाते आहे. या उत्सवात खंड पाडणे म्हणजे या धार्मिक भावनेला ठेच पोहोचवण्यासारखे आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना काहीही करून उत्सवासाठी गावी यावेच लागणार.

त्यांना 7 ऑगस्टपर्यंतची सिंधुदुर्ग प्रवेशाला डेडलाईन दिल्यास क्‍वारंनटाईनचे 14 आणि उत्सवाचे जवळपास तितके मिळून महिनाभर जिल्ह्यात राहावे लागणार आहे. त्यांच्या नोकऱ्या, रोजगार आणि महत्त्वाचे म्हणजे इतक्‍या कालावधीसाठी बंद घरात राहायच्या दृष्टीने असणाऱ्या अपुऱ्या सुविधा याचा विचार करता त्यांना हे फार कठीण आहे. शिवाय उत्सवाला यायचे झाल्यास पूर्ण कुटुंब सोबत आणावे लागणार. त्यांची व्यवस्था करणेही आव्हान आहे. प्रवेशाबाबत निकष लवकर न ठरल्यास त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढणार आहेत.

स्थानिक पातळवीर विचार करता येथे क्‍वारंनटाईनच्या अपुऱ्या सुविधा आहेत. अनेक शाळांनी आता क्‍वारंटाईनसाठी इमारत उपलब्ध न करण्याबाबत ठराव दिले आहेत. प्रशासन क्‍वारंटाईनची जबाबदारी स्थानिक ग्रामकमिटीवर सोपवत आहे; मात्र त्यांना दोन्ही बाजूंनी रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या प्रश्‍नांबाबत प्रशासकीय स्तरावरून फारशी दखल घेतली जात नसल्याचे त्यांचे दुःख आहे. एकाचवेळी हजारोंच्या संख्येने चाकरमानी आल्यास त्यांची व्यवस्था करणे फार कठीण होणार आहे. 

याआधी साधारण लाखभर चाकरमानी जिल्ह्यात आले. त्या काळात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढले. आताही कमी कालावधीत जास्त लोक आल्यास अशी स्थिती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. चतुर्थीच्या काळात आणीबाणीची स्थिती हाताळण्याची क्षमता जिल्ह्याच्या आरोग्ययंत्रणेत आहे का? याचाही विचार करावा लागणार आहे. 

गोव्यानेही पर्याय योजला, पण... 
पालकमंत्री सामंत यांनी 7 दिवसांचा क्‍वारंटाईन कालावधी करता येईल का? याचा विचार करण्याची सूतोवाच केले आहेत. प्रत्यक्षात हा निर्णय घेणे फार कठीण आहे. कारण क्‍वारंटाईन ही सरकारी फॉर्म्यालीटी नसून कोरोना रुग्ण वाढू नये यासाठीचा उपाय आहे. 14 दिवसांपर्यंत लक्षणे दिसू शकत असल्याने आतापर्यंत हा कालावधी ठरला होता. अचानक हा कालावधी कमी करायचा झाल्यास त्याला वरिष्ठ स्तरावरून तसेच आरोग्य यंत्रणेकडून हिरवा कंदील आवश्‍यक आहे. तसे झाल्यास गावोगाव कोरोना पसरण्याची भीतीही आहे. 48 तासांत कोरोना चाचणी करणाऱ्यांना प्रवेशाचा पर्याय विचाराधीन आहे; पण इतक्‍या मोठ्या प्रमाणात चाचणीची व्यवस्था आहे का? हा प्रश्‍न आहे. हाच पर्याय गोव्यानेही योजला होता; पण त्यांना याचा अंमल करणे फारसे जमले नाही. 

ठोस निकष गरजेचे 
एकूणच ही स्थिती अस्वस्थता निर्माण करणारी आहे. गणेशोत्सवाची तारीख जवळ येत आहे. अशावेळी दोन्ही बाजूंचा विचार करून तातडीने सुवर्णमध्य असलेले ठोस निकष जारी करणे आवश्‍यक आहे. अन्यथा गणेशमूर्तीच्या उंचीबाबत घेतलेल्या उशिराच्या निर्णयासारखी स्थिती होऊ शकेल. दोनच दिवसांपूर्वी घरगुती आणि सार्वजनिक उत्सवातील मूर्तीच्या उंचीबाबत निकष जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे हा निर्णय जसा "वरातीमागून घोडे' ठरला तसा चाकरमान्यांबाबतचा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. 

चाकरमान्यांसमोरचे प्रश्‍न 
* कित्येक बंद घरांमध्ये उत्सव काळात येऊन गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसमोर अधिक गंभीर प्रश्‍न 
* दीर्घकाळ क्‍वारंटाईन राहण्यात गैरसोयीची शक्‍यता 
* आधिच लाखभर चाकरमानी आल्याने क्‍वारंटाईनसाठी बंद घरे मिळणे कठीण 
* उत्सवासाठी महिनाभर वेळ खर्च करावा लागण्याची शक्‍यता 
* प्रवासासाठीचे पास, प्रवास व्यवस्था खर्चिक आणि किचकट 

स्थानिक स्तरावरचे प्रश्‍न 
* क्‍वारंटाईन कालावधी घटवल्यास प्रादुर्भावाची भीती 
* जबाबदारी असलेल्या ग्रामकमिट्यांना अधिकाराच्या मर्यादा 
* गावस्तरावर अपुऱ्या सुविधा 
* स्थिती गंभीर बनल्यास आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा 

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT