ब्रिजटाऊन : ऑस्ट्रेलियन संघाकडे यंदाच्या टी-२० विश्वकरंडकात इतिहास रचण्याची संधी असणार आहे. गेल्या वर्षी पॅट कमिन्सच्या नेतृत्वात कांगारूंनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा व एकदिवसीय विश्वकरंडक जेतेपदावर नाव कोरले. आता त्यांनी टी-२० विश्वकरंडक पटकावल्यास एकाच कालावधीत आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिलाच संघ ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया टी-२० विश्वकरंडकाच्या मोहिमेची सुरुवात उद्यापासून (ता. ६) ओमानविरुद्धच्या लढतीने करणार आहे.
टी-२० विश्वकरंडकाला २००७ पासून सुरुवात झाली, पण ऑस्ट्रेलियाने तब्बल १४ वर्षांनंतर अर्थातच २०२१ मध्ये पहिल्यांदा टी-२० विश्वकरंडक जिंकण्याची किमया करून दाखवली. त्यानंतर २०२२ मध्ये मायदेशात झालेल्या टी-२० विश्वकरंडकात त्यांच्याकडून निराशा झाली. हे अपयश मागे टाकून ऑस्ट्रेलियन संघ कसा उभा राहतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघाचे नेतृत्व मिचेल मार्शकडे सोपवण्यात आले आहे. ट्रॅव्हिस हेड याने जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, तसेच एकदिवसीय विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्यामुळे टी-२० विश्वकरंडकातही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमधूनही धावा निघत आहे. मार्शसह कॅमेरुन ग्रीन व मार्कस स्टॉयनिस यांची अष्टपैलू कामगिरी ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक ठरू शकते.
झॅम्पा, ॲगरच्या फिरकीवर मदार
ऑस्ट्रेलियन संघात ॲडम झॅम्पा व ॲश्टन ॲगर हे दोन फिरकी गोलंदाज आहेत. सुरुवातीच्या लढतींमध्ये अंतिम अकरा जणांच्या चमूत प्रयोग करण्यात येऊ शकतील, पण झॅम्पा हा ऑस्ट्रेलियासाठी तुरुपचा एक्का ठरू शकतो. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व जॉश हॅझलवूड हा वेगवान गोलंदाजीचा त्रिवेणी संगम ऑस्ट्रेलियाच्या दिमतीला असल्यामुळे ओमानचा मार्ग खडतर आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
चमत्काराची आशा
ओमान संघाने सलामीच्या लढतीत नामिबिया संघाला कडवी झुंज दिली. नामिबिया संघाने सुपर ओव्हरमध्ये विजय साकारला, पण आता ऑस्ट्रेलियन संघावर विजय मिळवण्यासाठी ओमान संघाला अभूतपूर्व खेळ करावा लागणार आहे. त्यांच्याकडून चमत्कारिक खेळ झाल्यानंतरच ऑस्ट्रेलियन संघ पराभूत होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.