Shankar Pujari
Shankar Pujari 
क्रीडा

कुस्तीचे आखाडे बोलके करणारा कॉमेंटेटर 

प्राजक्ता ढेकळे

अहो, कोण इचारतं तुमचा बॅंक बॅलन्स? कोण इचारतं तुमची इस्टेट; पण... तालमीत जाणारं पोरगं गावातनं चालत निघालं, तरी माणसं इचारत्याती हा पोरगा कुणाचा? एवढं इचारलं तरी आपलं पैसं फिटलं. अहो, तुम्हाला नसंल पैलवान होता आलं; पण तुम्ही पैलवानाचं बाप व्हा...' असं कुस्तीप्रेमींच्या काळजाला हात घालणारं निवेदन थांबताच मैदानात टाळ्या, शिट्यांचा कडकडाट होतो. नंतर मैदानात शांतता पसरते... अन्‌ लोकांच्या नजरा त्या निवेदकाला शोधू लागतात. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रातील कुस्तीचे आखाडे आपल्या कॉमेंट्रीने बोलके करणारे हेच ते शंकर पुजारी! 

गावोगावच्या जत्रांमधील आखाड्यांमध्ये कुस्त्या सुरू होताच, आखाड्यात माइकवर आवाज घुमू लागतो... "मन, मनगट आणि मेंदू यांचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती होय.' "बलाशिवाय बुद्धी लुळी पांगळी आहे आणि बुद्धीशिवाय बल हे थिटे आहे; मात्र या दोन्हींचा संयोग म्हणजे कुस्ती होय.' "घरातलं दूध डेअरीला घालू नका. पोराला पाजा आणि घरात एक तरी पैलवान तयार करा. अहो, कोण इचारतं तुमचा बॅंक बॅलन्स? कोण इचारतं तुमची इस्टेट; पण... तालमीत जाणारं पोरगं गावातनं चालत निघालं, तरी माणसं इचारत्याती हा पोरगा कुणाचा? एवढं इचारलं तरी आपलं पैसं फिटलं. अहो, तुम्हाला नसंल पैलवान होता आलं; पण तुम्ही पैलवानाचं बाप व्हा...' असं कुस्तीप्रेमींच्या काळजाला हात घालणारं निवेदन थांबताच मैदानात टाळ्या, शिट्यांचा कडकडाट होतो. नंतर मैदानात शांतता पसरते... अन्‌ लोकांच्या नजरा त्या निवेदकाला शोधू लागतात. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रातील कुस्तीचे आखाडे आपल्या कॉमेंट्रीने बोलके करणारे हेच ते शंकर पुजारी! 

वाड्या-वस्त्या, गावोगावी, तालुका, जिल्हा आणि अगदी महाराष्ट्र केसरीचे आखाडेही पुजारी आण्णांच्या कुस्तीच्या कॉमेंट्रीने गाजू लागले. केवळ राज्याच्याच नव्हे, तर देशविदेशातील कुस्तीचा इतिहास मुखोद्‌गत असलेला आणि आवाजाची विशिष्ट प्रकारची धार असलेल्या आण्णांच्या निवेदनामुळं कुस्ती वाड्या-वस्त्यांवर पोचली. आण्णांच्या कुस्तीच्या कॅमेंट्रीनं अनेकांना पैलवान केलं. अनेक पैलवानांना प्रोत्साहन दिलं. "कुस्ती हेच जीवन' म्हणत आयुष्यभर कुस्ती जगलेल्या कुस्तीची कॉमेंट्री करणाऱ्या या अवलियाविषयी.. 

डोक्‍यावर गांधी टोपी, कपाळी अष्टगंध आणि बुक्का, अंगात नियमित नीळ दिलेला पांढरा नेहरू शर्ट, तसेच नीळ दिलेले धोतर, हातात घड्याळ, उंचीनं मध्यम, नाकाची दांडी, हसतमुख चेहरा, वयाची सत्तरी पार केलेली असली, तरी अजूनही शरीराची मजबूत ठेवण.. असे आहेत महाराष्ट्रातील कुस्तीचे कॉमेंट्रीकार शंकर पुजारी! 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातील कोथळी हे शंकर पुजारी यांचं गाव. न कळत्यापणातच कमरेला लंगोटी आली आणि वडिलांकडून आपसूकच कुस्तीचा वारसा आण्णांकडं आला. आपल्या पोरानं मोठा पैलवान व्हावं, ही बापू पुजारी यांची (आण्णांच्या वडिलांची) इच्छा होती. म्हणून वडिलांनी आण्णांना पैलवानकीसाठी सांगलीला तालमीत पाठवलं. तालमीत गेल्यानंतर आण्णांचं कुस्तीचं प्रशिक्षण सुरू झालं... कुस्तीतील डावपेच, कुस्तीसाठी प्रामाणिकपणं केला जाणारा दररोजचा सराव यामुळं दिवसेंदिवस आण्णांची खेळातील प्रगती होत होती. पुढं हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्याबरोबर त्यांची कुस्ती जोडली जाऊ लागली. चांगल्या, नव्या दमाचा पैलवान म्हणून त्यांची गणणा त्या वेळी व्हायला लागली होती; मात्र फार पूर्वीपासून चालत आलेल्या कुस्तीच्या परंपरेत 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळामुळं खंड पडला. कुस्ती म्हणजे श्‍वास, कुस्ती म्हणजे जगणं-मरणं, कुस्ती म्हणजे तहान-भूक, कुस्ती म्हणजे सर्वस्व असलेले कुस्तीप्रिय पैलवान दुष्काळामुळं कुस्तीपासून दुरावले गेले अन्‌ कुस्ती मुकी झाली... अनेकांची कुस्ती सुटली, ती कायमचीच! त्या कायममधील एक होते, शंकर पुजारी. कुस्ती सोडून आण्णांना घरी जावं लागलं. परिस्थितीनं शरीरानं कुस्ती सुटली असली, तरी मनानं आण्णा अजूनही कुस्तीतच जगत होते. गावाला आल्यानंतरही कुस्तीचं वेड आण्णांच्या मनातून जात नव्हतं. कुस्तीसाठी काय करावं, या विचारात ते सतत असत. नेमकं त्याच वेळी गावोगावी करमणुकीचं साधन म्हणून आलेल्या ट्रान्झिस्टरवर आण्णांनी किक्रेटची कॉमेंट्री ऐकली. "नो बॉल, वाईड बॉल....' अशी चालणारी किक्रेटची कॉमेंट्री आण्णांनी ऐकली आणि वीज चमकावी तशी त्यांच्या डोक्‍यात कल्पना चमकून गेली. आपण कुस्तीची अशी लाइव्ह कॉमेंट्री केली, तर?... पुढं हीच कल्पना आण्णांनी प्रत्यक्षात उतरवायची ठरवली. कुस्तीवर कॉमेंट्री करायचं निश्‍चित झाल्यावर आण्णांनी रामायण, महाभारतातील मल्लविद्या-कुस्तीचा इतिहास याची माहिती गोळा करायला सुरवात केली. गावात मनोरंजनाची साधनं म्हणून होणारे भारूडे, पोवाडे, कीर्तनं यासारखे कार्यक्रम आण्णा ऐकत आले होते. त्यामुळं ही माहिती कुस्तीची लाइव्ह कॉमेंट्री करताना त्यांना उपयोगी पडणार होती.

कुस्तीचा इतिहास मुखोद्‌गत करताना आण्णांनी मैदानात खेळणारा पैलवान, त्या पैलवानाचं गाव, शिक्षण, परिस्थिती, गावाची वैशिष्ट्यं, प्रसिद्ध तालमी, प्रसिद्ध आखाडे, तालीम चालवणारे वस्ताद, कुस्तीतील डाव या सगळ्यांची माहिती मिळवून आपल्या कॉमेंट्रीला सुरवात केली. आपल्या लाइव्ह कॉमेंट्रीची सुरवात आण्णांनी 1986 पासून सांगलीच्या मैदानातून केली. जुनी सातवी शिकलेल्या आण्णांचं भाषेवरील प्रभुत्व आणि बोलताना दिले जाणारे संदर्भ, यामुळं प्रत्येक आखाड्यात आण्णांची लाइव्ह कॉमेंट्री कुस्तीइतकीच आकर्षणाची ठरू लागली. आण्णांनी सुरू केलेल्या लाइव्ह कॉमेंट्रीमुळं 1972 च्या दुष्काळाच्या सावटाखाली मुकी झालेली कुस्ती पुन्हा एकदा बोलकी झाली. कुस्तीवरील प्रेमापोटी, जपलेल्या छंदापोटी आण्णा महाराष्ट्रातील आखाडे हिंडू लागले. कुस्तीच्या कॉमेंट्रीसाठी आलेल्या प्रत्येक निमंत्रणाच्या ठिकाणी जाऊ लागले. आजपर्यंत अडीच हजारांपेक्षा अधिक आखाड्यांवर आण्णांनी लाइव्ह कॉमेंट्री केली आहे. वयाची सत्तरी पार केलेले आण्णा फोन येताच कुस्तीच्या आखाड्यात कॉमेंट्रीसाठी आजही हजर होतात. 

आखाड्यातील एखाद्या पैलवानानं कुस्ती मारताच मैदानात आवाज येतो, "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आंब्याच्या झाडाला आंबेच येतात, लिंबोळ्या नाहीत. घरचा संस्कार चांगला पाहिजे, मुलं आकाशातून पडलेली नाहीत, आपले संस्कार कुठं कमी पडतात ते बघा...' अशी कोटी होताच, मैदानातून टाळ्यांचा कडकडाट होतो, "मुलं आपलीच असतात, संस्कार महत्त्वाचे आहेत' अशा खड्या आवाजात ते बोलतात. एखाद्या रंगानं सावळ्या असलेल्या पैलवानाची आखाड्यात एंट्री होताच, आण्णा बोलू लागतात, "ब्लॅक टायगर मैदान पे आ गया।' त्याला काही जण हसतात. त्यांना ते सांगतात, "हसू नका, अहो प्रभू रामचंद्रही काळेच होते. काले कमलियावाला वो कृष्ण कालाही था, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी किंवा सावळे ते सुंदर रूप मनोहर जगाला वेड लावणारे ते परब्रह्म अनादी अनंत ते जन्म-मृत्युरहित तेही काळचे होते. आषाढी कार्तिकीला जाता का नाही? लाखोंच्या मिठ्या पडतात काळ्याला! त्यामुळं काळ्याला फार महत्त्व आहे. आकाशातील काळ्या ढगानं तोंड काळं केलं, तर आपली तोंडं बघण्यासारखी होतात. एखाद्या सुवासिनीच्या अंगावर किलोभर सोनं आहे; पण काळा पोतच नाही; काय करायचं त्या सोन्याला? म्हणून काळ्या रंगाला फार महत्त्व आहे. त्याला कमी लेखू नका...' यासारख्या विविध गोष्टींचे संदर्भ आण्णा आपल्या बोलण्यातून देत असतात. 

कॉमेंट्री करताना शंकर पुजारी कुस्तीच्या इतिहासाचा समर्थपणे आढावा घेतात. हरिश्‍चंद्र बिराजदारविरुद्ध सतपालच्या ऐतिहासिक कुस्तीची आठवण कधी ते सांगतात, तर कधी हिंद केसरी मारुती मानेचं शेलक्‍या शैलीत वर्णन करतात. तो जागतिक कीर्तीचा कसा पैलवान झाला, याचं वर्णन करताना ते म्हणतात, पायाच्या नखापासून डोक्‍याच्या केसापर्यंत कुणाला बघावं तर मारुती मानेला! मारुती माने हा फुरसतीच्या वेळात परमेश्‍वरानं घडवलेला पैलवान होता. जसा देहाचा तसा दिलाचा! 144 किलो वजनाचा, सव्वासहा फूट उंचीचा तो फुटबॉल होता. कपाळातून निघालेलं नाक, कानाबरोबर मिशा, भरदार छाती, उरुरबंद शरीरयष्टी, छातीचे तवे, पैलवानी पेहराव, भेदक डोळे... असा पैलवान परत होणं नाही. असं वर्णन मैदानात जोश निर्माण केल्याशिवाय राहत नाही. याप्रकारे ऐतिहासिक कुस्तीची माहिती वर्णनात्मक शैलीत दिल्यामुळं मैदानातील वातावरण अगदी रंगतदार होतं. कुस्तीच्या आखाड्यात एकदा माइक आण्णांकडं आला, की नुसत्या पैलवानावरच नव्हे, तर या मैदानात येणाऱ्या प्रत्येक आजी, माजी, नव्या, जुन्या पैलवानांचं स्वागत ते करत असतात.. "महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे मैदानात आले आहेत', "महाराष्ट्र केसरी आप्पा कदम मैदानात येत आहेत' अशी माहिती ते निवेदनातून पुरवत असतात. 

कुस्तीचं मैदान जसं रंगात येतं, तशी पुजारी आण्णांच्या आवाजाची धार वाढत जाते. "नुस्तं कुस्ती बघायला येऊ नका, घरात एक तरी पैलवान तयार करा. गल्लीगलीत रावण वाढलेत, घराघरात राम तयार करा' असं आवाहनही ते करत राहतात. खेळातील चुणूक दिसणाऱ्या; मात्र पररिस्थितीपुढं हतबल असलेल्या पैलवानांसाठी सढळ हातानं मदत करण्याचं आवाहनही ते कुस्ती शौकिनांना करत असतात. 

गावोगावच्या जत्रेतील कुस्तीचं मैदान म्हटलं, की कॉमेंट्रीला पुजारी आण्णा येणार आहेत का? याची विचारणा अनेकांकडून केली जाते. वयाची सत्तरी पार केलेल्या आण्णांची तेरा वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झाली आहे; मात्र तरी शांत न बसता आण्णा ज्या आखाड्यातून कॉमेंट्रीसाठी बोलावणं येतं, तिकडं जात असतात. कन्नड भाषेवरही आण्णांचं बरंचसं प्रभुत्व असल्यानं आण्णा कर्नाटकमधील काही गावांत कॉमेंट्री करण्यासाठी जातात. कॉमेंट्रीसाठी आण्णा पहाटे घराबाहेर पडतात व रात्री उशिरा परतात. कुस्तीतील कॉमेंट्रीच्या वेडापायी हा कुस्तीतील मराठी कॉमेंटेटर अवलिया राज्यभर फिरत राहतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: डेव्हिडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

SCROLL FOR NEXT