क्रीडा

‘ग्रीन टॉप विकेट’वर फलंदाजांची परीक्षा

नरेंद्र चोरे

नागपूर - ईडन गार्डन्सवर श्रीलंकेने अनपेक्षित धक्‍का दिल्यानंतर भारतीय संघाने कमबॅक करून सामन्याचे पारडे आपल्या दिशेने झुकविले. ती स्थिती लक्षात घेता उद्या, शुक्रवारपासून विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीतही यजमान भारताचेच पारडे जड राहण्याची शक्‍यता आहे. फलंदाजांची परीक्षा घेणाऱ्या येथील हिरव्यागार खेळपट्‌टीवर विजय मिळवून तीन  सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याचा भारताचा निश्‍चित प्रयत्न राहणार आहे. 

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धची मालिकाही सहज जिंकेल, अशी चर्चा होती. मात्र, श्रीलंकेने पहिल्या कसोटीत यजमानांना झुंजवून विजय मिळविणे सोपे नाही, हे दाखवून दिले. विशेषत: सुरंगा लकमलच्या रूपातील त्सुनामीची दहशत भारतीय फलंदाजांनी पहिल्या सामन्यात अनुभवली. श्रीलंकेविरुद्धची मालिका आटोपल्यानंतर भारतीय संघाला लगेचच दक्षिण आफ्रिकेचा महत्त्वपूर्ण दौरा करायचा आहे. त्यामुळे या मालिकेच्या निमित्ताने भारतीय संघ त्या दौऱ्याचीही पूर्वतयारी करीत आहे. त्यामुळे ‘टीम मॅनेजमेंट’च्या मागणीनुसार, या मालिकेत वेगवान व उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर विशेष भर दिला जात आहे. त्याचा प्रत्यय इडन गार्डन्सवर आला आहे. नागपुरातही वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्‌टी तयार करण्यात आली आहे. खेळपट्‌टीवर भरपूर गवत असल्यामुळे वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची पुरेपूर शक्‍यता आहे. 

कोलकाता येथे खेळलेल्या भारतीय संघात किमान दोन बदल होणे अपेक्षित आहे. वैयक्‍तिक कारणांमुळे सामन्यातून माघार घेणाऱ्या शिखर धवन व लग्नाच्या बेडीत अडकणारा भुवनेश्‍वर कुमारच्या जागेवर मुरली विजय आणि इशांत शर्मा यांना अकरामध्ये संधी मिळणे जवळजवळ निश्‍चित आहे. या सामन्याच्या निमित्ताने ‘विदर्भ एक्‍स्प्रेस’ उमेश यादव घरच्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. तसेच फिरकी विभागातही एक बदल होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. रवींद्र जडेजाच्या जागी चायनामॅन कुलदीप यादवला संधी मिळाल्यास नवल वाटू नये. भारताला या सामन्यात भुवनेश्‍वरची अनुपस्थिती जाणवणार आहे. कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत तसे बोलूनही दाखविले.

श्रीलंकेलाही कसोटीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. आम्ही पराभूत होण्यासाठी नव्हे, तर विजयाच्या इराद्यानेच भारतात आलो असल्याचे कर्णधार दिनेश चंडिमलने बोलून दाखविले. इडन गार्डन्सवर बलाढ्य भारताचा पहिला डाव अवघ्या १७२ धावांत गुंडाळून त्यांनी आपल्या क्षमतेचा परिचय दिलेला आहे. त्यामुळे टीम इंडिया या कसोटी लंकेला हलक्‍याने घेण्याची चूक कदापी करणार नाही. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या श्रीलंका संघाची गोलंदाजी मुख्य ताकद असून, त्या भरवशावरच हा संघ भारतावर चमत्कारी विजय मिळविण्याचे स्वप्न पाहात आहे. इडनवर भारताची दाणादाण उडविणाऱ्या सुरंगाला दसून शनका व लाहिरू गमगेची उत्तम साथ लाभली आणि अनुभवी फिरकीपटू रंगना हेराथ अस्सल फॉर्ममध्ये परतला, तर क्रिकेटप्रेमींना चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. कर्णधार चंडिमल, एंजेलो मॅथ्यूज, लाहिरू थिरीमन्ने व डिक्‍वेलालाही फलंदाजीत भरीव योगदान द्यावे लागेल. वेगवान खेळपट्‌टी बघता नाणेफेकीचा कौलही निर्णायक ठरणार आहे.

येथील खेळपट्टी टणक आहे. त्यावर गवतही आहे. त्यामुळे पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरेल. ही खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी ‘परफेक्‍ट’ दिसून येत आहे.
- विराट कोहली, भारतीय कर्णधार

कोलकात्याच्या तुलनेत खेळपट्टीवर गवत कमी आहे. पहिले तीन दिवस वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहील. त्यानंतर हळूहळू खेळपट्टी फिरकीला साथ देण्याची शक्‍यता आहे.
- दिनेश चंडीमल, श्रीलंकेचा कर्णधार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT