Viswanathan Anand turns 50
Viswanathan Anand turns 50 
क्रीडा

Happy Birthday Viswanathan Anand : बुद्धिबळ शास्त्रज्ञ @ 50

रवींद्र मिराशी

आज ११ डिसेंबर..  माजी बुद्धिबळ विश्वविजेता आणि भारतीय बुद्धिबळपटूंचे प्रेरणास्थान ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याचा ५० वा वाढदिवस. आजही आनंद बुद्धिबळातील सर्व प्रकारांमध्ये (क्लासिकल, रॅपिड, ब्लिट्झ)  भारताचा एक क्रमांकाचा बुद्धिबळपटू आहे. आनंदला वाढदिवसाच्या निमित्ताने समस्त बुद्धिबळ परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

आनंदच्या संपूर्ण आणि भल्यामोठ्या दिमाखदार कारकिर्दीवर सर्वांगाने प्रकाशझोत टाकणे, एका छोट्या लेखात शक्यच होणार नाही. परंतु आनंदच्या पटाबाहेरील दृश्य, अदृश्य पैलूंवर प्रकाशझोत टाकणे देखील तितकेच महत्वाचे आहे. पाच वेळेस जगज्जेतेपद प्राप्त करणारा आनंद, आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात नॉर्वेचा तरुण प्रतिभासंपन्न जगज्जेता ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन याच्या कडून सलग दोनदा जगज्जेतेपदाच्या लढतीत पराभूत झाला. हाच कार्लसन नुकताच बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्ताने भारतात आला होता. या दरम्यान एक अगदी छोटेखानी जेमतेम पाच-सहा मिनिटांचा कार्यक्रम झाला. मात्र या आगळ्या-वेगळ्या  कार्यक्रमाने बुद्धिबळ विश्वाचे लक्ष वेधले गेले. आनंदने त्याच्या कारकिर्दीत अक्षरशः अगणित डाव खेळले. यापैकी १९९२ पासूनच्या  ९ डावांच्या पटस्थिती निवडण्यात आल्या.

त्यात आनंदने प्रत्येक डाव कोणाविरुद्ध आणि कधी खेळाला,  याचे उत्तर कार्लसन याने सांगायचे होते. त्याचबरोबर आनंदने अशा पटस्थितीत कोणती महत्वपूर्ण चाल केली, हे देखील सांगायचे होते. खरेतर ही परीक्षा खूप म्हणजे खूपच खडतर होती. ९ पैकी ८ पटस्थितींची अपेक्षित सर्व उत्तरे जगज्जेत्या कार्लसन याने काही क्षणात दिली. माझ्या सारखे जगभरातील असंख्य बुद्धिबळ चाहते, हा कार्यक्रम पाहून अवाक झाले. कारण बुद्धिबळ जगज्जेत्याकडे कोणती अलौकिक प्रतिभा आणि असामान्य क्षमता असावी लागते, याचेच ते खरेतर सादरीकरण होते. अर्थातच माजी जगज्जेत्या आनंद कडे हे सर्व गुण असल्यानेच त्याने पाचवेळेस जगज्जेतेपद प्राप्त केले, यात कोणालाच तिळमात्र शंका असण्याचे कारण नाही.  

आनंदच्या आजवरच्या प्रत्येक डावांचा विश्लेषणात्मक अभ्यास, त्यातील नाविन्यपूर्ण कल्पना याचा सर्वांगीण सखोल अभ्यास हीच जगज्जेतेपद प्राप्त करण्याची शिडी आहे, हे कार्लसन याने अचूक हेरले. (अर्थात यासाठी उच्च प्रतिभा असावीच लागेल.) हेच या कार्यक्रमाचे खरे मर्म आहे. ते मर्म नवोदित प्रतिभासंपन्न ग्रँडमास्टरनी जाणून घेणे, मला आजच्या दिनी फारच महत्वाचे वाटते. आज भारतात ६४ घरांच्या या खेळात आनंद नंतर ६४ ग्रँडमास्टर झाले. ही खूपच आनंददायी घटना आहे. मात्र हा कार्यक्रम पाहता कार्लसन एवढा आनंदचा अभ्यास कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने केला असेल ! याबाबत शंका वाटते. आनंदच्या दिमाखदार कारकिर्दीचा कोणत्यातरी भारतीय ग्रँडमास्टरने पुस्तकरूपी छान अभ्यासपूर्ण आढावा घ्यावा, अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली तर काय चूक आहे !

११ डिसेंबर १९६९ रोजी कृष्णमूर्ती विश्वनाथन यांचे कुटुंब पंचकोनी झाले. विश्वनाथन यांनी आपल्या तिसऱ्या अपत्याचे नाव ठेवले आनंद. शिवकुमार हा आनंदचा सर्वात मोठा भाऊ आणि अनुराधा ही बहीण. आई सुशीला यांनी आनंदला, रशियन वकिलाती मार्फत चालविल्या जाणाऱ्या चेन्नई मधील 'ताल चेस क्लब' चे प्रथम सभासद बनवले. आनंदचा बुद्धिबळाचा श्रीगणेशा येथे झाला. आनंद ९ वर्षाचा असताना विश्वनाथन यांची बदली फिलिपाइन्स- मनिला येथे झाली. येथील फक्त चार वर्षांच्या वास्तव्यात आनंद बुद्धिबळाच्या पूर्ण प्रेमात पडला, आणि त्याचे पुढे विश्वच बदलून गेले.

प्रारंभीचे २२८४ रेटिंग प्राप्त करून आनंदने फिडेच्या प्रगती पुस्तकात पहिली नोंद केली. जुलै १९८४ मध्ये २३०० चा टप्पा पार करण्यापूर्वी आनंदने १९८३ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी राष्ट्रीय सब- ज्युनियर स्पर्धा ९ पैकी ९ गुण मिळवून जिंकली. १९८५ मध्ये एशियन ज्युनिअर स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करून, आनंद इंटरनॅशनल मास्टर बनला. भारतात १९६० मध्ये मॅन्युअल एरन यांनी सर्वात प्रथम हा किताब प्राप्त केला. १९८७ मध्ये आनंदने २५०० चा फिडे रेटिंग टप्पा ओलांडला. याच दरम्यान फिलिपाइन्स- बागिऊ येथे झालेली वर्ल्ड ज्युनियर स्पर्धा आनंदने दिमाखदार कामगिरीने जिंकली. पुढे अल्पावधीतच आनंद ग्रँडमास्टर झाल्याची अधिकृत घोषणा फिडेने एप्रिल १९८८ मध्ये केली. आनंद भारताचा पहिला ग्रँडमास्टर ठरला. या क्षणाला भारतात १० इंटरनॅशनल मास्टर्स होते. आनंदने ग्रँडमास्टर ही आपल्या कारकिर्दीची पहिली पायरी मानली. आनंदच्या या विचारातच त्याच्या देदीप्यमान यशाचे रहस्य दडले आहे. ज्यांना ते समजून घ्यायचे आहे, त्यांना त्याचा जरूर शोध घ्यावा लागेल.   

जागतिक पातळीवर १९७१ पासून चालू झालेल्या 'नाविन्यपूर्ण चालींचे' सर्वाधिक पुरस्कार आनंदला मिळाले आहेत. आनंदच्या असंख्य नाविन्यपूर्ण चालींना पुरस्कार कदाचित मिळाले नसले तरी, बुद्धिबळ सशक्त होण्याच्या दृष्टीने आनंदचे योगदान खूप मोठे आहे. याकरिता मी सन २०१३ मधील माझ्या दैनिक सकाळ मधील एका लेखाच्या मथळ्यात आनंदला प्रथमच  'बुद्धिबळातील शास्त्रज्ञ' असे म्हटले होते.

जगज्जेता बॉबी फिशर यांच्या नंतर गॅरी कास्पारोव आणि मॅग्नस कार्लसन या दोघांना फिशर एवढे फार मोठे वलय लाभले. असे असले तरी माझ्यामते फिशर यांच्या कारकिर्दीनंतर अनातोली कार्पोव, गॅरी कास्पारोव, व्लादिमिर क्रामनिक, विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन हे पाचही बुद्धिबळपटू तेवढ्याच तोलामोलाचे आणि जगातील सर्वश्रेष्ठ  बुद्धिबळपटू  आहेत. श्रेष्ठत्वाची उंची मोजण्याची प्रत्येकाची परिमाणे कदाचित भिन्न असू शकतात. जसे सर्वात मोठे धरण ठरविण्याचे परिमाण उंची, रुंदी, एकूण पाणीसाठा क्षमता, एकूण वीज निर्मिती क्षमता, दरवाज्यांची संख्या यातील काहीही असू शकते.

( लेखक बुद्धिबळ अभ्यासक आहेत )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT