क्रीडा

बालाचा पोकळ घिस्सावर सोनुला हिसका!

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - राजर्षी शाहू खासबागेत हजारो कुस्तीशौकिनांच्या साक्षीने प्रथम क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी बाला रफिकने हरियानाचा डबल हिंदकेसरी सोनुला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखविले. एक लाख रुपये व चांदीच्या गदेचा तो मानकरी ठरला.

महान भारतकेसरी माऊली जमदाडेने भारत केसरी पवन दलालवर द्वितीय, तर सचिन घोगरे याने संदीप दलालवर तृतीय क्रमांकाच्या लढतीत मात केली. कौतुक डाफळेविरुद्धच्या लढतीत विजयी झाल्याचा समज होऊन भारत मदनेने मैदान सोडल्याने कौतुकला विजयी घोषित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय मल्ल सोनबा गोंगाणेने राष्ट्रीय पदक विजेता रविकुमार याला पराभूत करीत शौकिनांची दाद मिळवली. पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य कुस्तीप्रेमी संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त राजर्षी शाहू खासबागेत मैदान झाले. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने मैदानाचे आयोजन केले होते.

बाला रफिक विरुद्ध सोनू यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू झाली. दोन्ही मल्लांत तीन मिनिटे खडाखडी झाली. आठ मिनिटांनंतर सोनूने एकेरी पटाचा प्रयत्न केला. त्यातून बचावत बालानेच सोनूवर ताबा घेतला. हाताचा घुटणा मानेवर ठेवत त्याने सोनूला जेरीस आणले. सोनू मात्र त्याला दाद देत नव्हता. एकोणिसाव्या मिनिटाला बालाने पोकळ घिस्सा डावावर सोनूला चितपट केले. 

माऊली जमदाडे विरुद्ध पवन दलाल यांच्यातील द्वितीय क्रमांकाची लढत साडेनऊला सुरू झाली. सुरवातीला दोघांनी एकमेकांचा अंदाज घेतला. माऊलीने हप्ते डावावर पवनचा कब्जा घेतला. त्यानंतर क्षणाची उसंत न दवडता त्याने बॅक थ्रोवर अस्मान दाखविले. दोन मिनिटांत कुस्तीचा निकाल लागला. संदीप दलालने सचिन घोगरेवर हाताची किल्ली केली. ती तोडून सचिन सहीसलामत सुटला. दोघांत पुन्हा खडाखडी सुरू झाली. सात मिनिटांच्या लढतीत हातावर एकलंगी डाव टाकून सचिनने संदीपला अस्मान दाखविले. 

कौतुक डाफळे विरुद्ध भारत मदने यांच्यातील लढतीत भारतने घुटना डाव टाकला. कौतुकने त्यातून यशस्वी सुटका केली. मात्र, डावात विजयी झाल्याचा समज भारतचा झाला त्याने लढत करण्यास नकार दिला. त्याने आखाडा सोडल्यानंतर त्याला संयोजकांनी पुन्हा आखाड्यात बोलावले. कुस्तीप्रेमींनी कुस्ती झाली नसल्याचे सांगूनही भारत लढत न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिला. त्याने मैदान सोडले. त्यामुळे कौतुकला विजयी घोषित करण्यात आले. सोनबा गोंगाणे विरुद्ध रविकुमार यांच्यातील लढत केवळ दोन मिनिटे झाली. विजेच्या चपळाईने लढत करणाऱ्या सोनबाने पहिल्याच मिनिटात रविकुमारवर ताबा मिळविला. त्यानंतर त्याने पाय घिस्सा लावून रविकुमारला चितपट केले. त्याच्या या डावाला शौकिनांनी टाळ्यांची दाद दिली. मुन्ना झुंझुरके विरुद्ध राजेंद्र सूळ यांच्यातील लढत बरोबरीत राहिली.

अन्य विजेते असे : सागर इळके (कळंबा), सनिकेत राऊत (कुडित्रे), अजित पाटील (सावे), हणमंत पुरी (पुणे), सरदार सावंत (आमशी), माऊली कोकाटे (कुर्डूवाडी), विकास पाटील (न्यू मोतीबाग), रोहित कारळे (पुणे), दत्ता नरळे (शाहू विजयी गंगावेस), सुनील शेवतकर (कुर्डूवाडी), संतोष सुतार (बेनापूर), नयन निकम (न्यू मोतीबाग), महेश वरुटे (मोतीबाग), हसन पटेल (शाहूपुरी), संग्राम जाधव (न्यू मोतीबाग), अक्षय माने (कळंबा), विशाल तिवले (कळंबा), श्रवणकुमार (कर्नाटक), माणिक कारंडे (सावर्डे), सागर सूर्यवंशी (न्यू मोतीबाग), कर्तार कांबळे (न्यू मोतीबाग). 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, पैलवान ग्रुपचे अध्यक्ष मारुती जाधव व हनुमान केसरी अनिल बोरकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण झाले. या वेळी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग, हिंदकेसरी दीनानाथसिंह, ऑलिंपिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील-आसगावकर, अस्लम काझी, उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी. आर. जाधव, हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई, ॲड. संपत पवार, गणेश घुले उपस्थित होते. 

नाथा पवार विजयी
नंदीवाल्याचा मुलगा नाथा पवार विरुद्ध आकाश कापडे यांच्यातील लढत अटीतटीची झाली. लढतीचा निकाल लागत नसल्याने ती गुणांवर घेण्यात आली. त्यात गुण मिळवून नाथा विजयी झाला. या वेळी ब्राझीलमध्ये नाथाने केलेल्या यशस्वी कामगिरीचा निवेदक शंकर पुजारी यांनी उल्लेख करताच शौकिनांनी त्याला टाळ्यांची दाद दिली.

तीन लढतींसाठी गदा 
मैदानात तीन प्रेक्षणीय लढतींसाठी गदा बक्षीस ठेवली होती. त्यात वैभव बारणे (न्यू मोतीबाग), राहुल गाजरे (न्यू मोतीबाग), अमर गाडवे (न्यू मोतीबाग) यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT