serial actress
serial actress sakal
लाइफस्टाइल

‘छोटी-सी बात’

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. समिरा गुजर-जोशी

परवाचीच गोष्ट. मी शूटिंग करत होते. माझ्या दैनंदिन मालिकेत मी करारी आईची भूमिका करते आहे. ते शूटिंग माझ्या रोजच्या गेटअपमध्ये होतं; पण तो दिवस खूप धावपळीचा होता. संध्याकाळी माझे व्याख्यान होते आणि परत येऊन आम्ही काही रात्रीची दृश्येसुद्धा चित्रीत करणार होतो. मग विचार केला बाकी गेटअप तोच ठेवावा.

फक्त साडी बदलून व्याख्यानाला जाऊन यावं म्हणजे आल्यानंतर भूमिकेसाठी तयार होणं सोपं जाईल. मात्र, नुसती साडी बदलली, तरी मी अचानक सगळ्यांच्या नजरा वेधून घेतल्या. त्यांना मला रोज जसं बघण्याची सवय झाली आहे त्यापेक्षा मी वेगळी दिसत होते. अगदी छोटे बदल होते खरंतर. माझी साडी थोडी मॉडर्न प्रिंटची होती. मी टिकली बदलली होती. मालिकेतल्या दागिन्यांच्या जागी स्वतःचे दागिने घातले होते.

भूमिकेसाठी मी पदर हातावर सोडते, त्याऐवजी तो खांद्यावर लावला. बास. एवढंच घडलं होतं; पण परिणाम असा झाला, की मी घाईत बाहेर पडत असताना सहकलाकारांपासून ते तंत्रज्ञांपर्यंत प्रत्येकजण थांबून दखल घेत होता. आमचे वॉचमनकाकासुद्धा म्हणाले, ‘ताई, छान दिसताय.’

मैत्रिणी, खरच सांगते, मला इतकं मस्त वाटलं! आणि एक गोष्ट पुन्हा नव्यानं लक्षात आली, की छोटे बदल किती मोठा परिणाम घडवत असतात. माझी एवढी धावपळ होती; पण त्या compliments नी माझा मूड अधिकच छान झाला. माझा आत्मविश्वास वाढला. या छोट्याशा प्रसंगानं खूप गोष्टी मला नव्यानं जाणवल्या.

मी जिथं काम करते, त्या क्षेत्रात दिसण्याला महत्त्व आहे; पण आपल्या रोजच्या जगण्यातही लूक खूप महत्त्वाचा असतो. आम्ही कलाकार भूमिकेनुसार दिसण्याचा प्रयत्न करत असतो; पण खऱ्या जगण्यात मात्र आपण जसे आहोत त्यात अधूनमधून छोटे बदल प्रयत्नपूर्वक करावेत. त्याचे खूप फायदे आहेत. सगळ्यांत मोठा फायदा म्हणजे आपल्याला स्वतःलाच छान वाटतं.

अगदी नेहमीपेक्षा वेगळी लिपस्टिकची शेड लावून बघ. (किंवा लिपस्टिक लावत नसशील तर लावून बघ.) आपलाच चेहरा आपल्याला किती वेगळा वाटतो. आयलायनर लावण्यानंही खूप फरक पडतो. जे रंग तू सहसा निवडत नसशील, ते निवडून बघ. मला ठाऊक आहे, तू म्हणशील, की ‘अगं, सगळ्यांना सगळं सूट होत नाही. आपल्याला जे चांगलं दिसतं असं वाटतं, तेच आपल्या सवयीचे होऊन जातं. मी कसे भलतेच रंग घालू?’ तर तुझं म्हणणं मला मान्य आहे.

अगदी मोठे, धाडसी प्रयोग नको करूया; पण केस बांधत असशील तर सोडून बघूया, किंवा मधला भांग पाडत असशील, तर साइड पार्ट करून बघूया. नेलपॉलिश लाव. साडीऐवजी पंजाबी किंवा उलट, जे सवयीचं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी! बरं, रोज असे बदल कर असं कुठे म्हणते आहे? तुला वाटेल तेव्हा कर.

त्यासाठी निमित्ताचीही वाट बघू नकोस. आपला आपल्यालाच कंटाळा आलेला असतो बघ, अशा दिवशी सहज कर एखादाच छोटासा बदल. मग बघूया, घरातल्या कुणाचं तुझ्याकडे किती लक्ष आहे! आणि त्यांचं लक्ष नाही गेलं तरी नाराज होऊ नकोस. कारण मी तुला खात्री देते, तुझं तुलाच फार छान वाटेल बघ. आरशात जरा जास्त रेंगाळशील. स्वतःची छबी तुलाच नवी वाटेल.

स्वतःला आपण नवं वाटणं ही खूप छान भावना आहे आणि हे प्रयोग आपल्या पेहरावामध्येच करायला हवेत असंही नाही. आपल्या घरातही करता येतील. खोलीच्या एखाद्या कोपऱ्यात हिरवं झाड आलं, तर तीही नवी वाटते. नेहमीचं फर्निचर; पण त्यांची जागा जरा बदलली, की खोलीचं रूपडं पालटतं. इतकंच कशाला, रोजच्या भाजीला फोडणी देताना एखादा जिन्नस नवा असला तर चव बदलते.

थोडक्यात, सेट रूटिनला किंचित ब्रेक केलं, की छान वाटतं. काहीतरी धाडस केल्यासारखं भारी वाटतं. आपला लूक खूप बदलतो असं नाही; पण जगण्याकडे बघण्याचा ‘आउटलूक’ मात्र नक्की बदलतो. तुला काय वाटतं? तुला कुठले बदल करून बघायला आवडतील मला नक्की कळव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT