Mahavir Jayanti 2024
Mahavir Jayanti 2024 esakal
लाइफस्टाइल

Mahavir Jayanti 2024 : आधुनिकतेतही भगवान महावीरांच्या शिकवणीची उपयुक्तता

सकाळ डिजिटल टीम

डॉ. रिता मदनलाल शेटिया

Mahavir Jayanti 2024 : ज्यांच्या सिद्धांतांची, विचारांची आणि शिकवणुकीची उपयुक्तता आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आणि कोरोना काळातही आपल्याला अनुभवता आली आणि येत आहे असे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा आज (ता. २१) २६२३ वा जन्म कल्याणक महोत्सव. त्यानिमित्त भगवान महावीरांच्या शिकवणींचा घेतलेला मागोवा.

‘श स्त्राच्या आधारे दुसऱ्यावर विजय मिळवणाऱ्याला वीर म्हणतात तर संयमाने स्वतःवर आणि जगावर विजय मिळवणाऱ्याला ‘महावीर’ म्हणतात. ‘साऱ्या विश्वाला अहिंसेचा, ‘जिओ और जिने दो’ चा संदेश देणारे आणि सत्य, अनेकांतवाद, अपरिग्रह, अचौर्य, आणि ब्रह्मचर्य हे पाच महत्त्वपूर्ण मार्ग सांगणारे आणि सम्यकज्ञान, दर्शन, चरित्राच्या माध्यमातूनच मोक्ष मार्ग प्राप्त करता येऊ शकतो, याची शिकवण देणाऱ्या महावीरांच्या सिद्धांताविषयी जाणून घेऊ.

अहिंसा

‘सव्वे पाणा, सव्वे भूता , जीवा सव्वे सत्ता ण हन्तव्वा ण अज्झावेय्व्वा, ण परीघेत्व्वा,ण परीतावेय्व्वा !’ अहिंसेची परिभाषा या सूत्रांमध्ये उत्तमरित्या सांगितली आहे. अहिंसक तो आहे जो कोणत्याही जिवाला इजा पोचवत नाही , कुणावर ही जोरजबरदस्ती करत नाही, कुणालाही आपला गुलाम बनवत नाही, कुणालाही मानसिक संताप देत नाही , प्राणीमात्रांचे हनन करत नाही.

‘अहिंसा परमो धर्म: ’ अहिंसा म्हणजे केवळ दुसऱ्याची हिंसा करणे नव्हे, तर माझ्या बोलण्यातून किंवा कृतीतून इतरांना काही त्रास होत असेल तर त्याची जाणीव होणे व मनाला वेदनाही होणे हे योग्य मार्गावर असल्याचे लक्षण आहे. वाणीतील हिंसेमुळे होणारे नुकसान शारीरिक हिंसेपेक्षाही मोठे आहे. युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये कित्येक कुटुंब विखुरले गेले आणि जात आहेत. लहान मुले अनाथ झाली, नागरिकांना आपला देश सोडून जावे लागले. येथे जर अहिंसा सिद्धांताचे पालन झाले असते, तर मग हा वाद संवादाने मिटला असता.

सत्य

जो बुद्धिमान व्यक्ती सत्याच्या मार्गदर्शनाखाली राहतो तो मृत्यूच्या जगात सहज पोहून जातो. कोणतीही परिस्थिती असो सत्याचा मार्ग सोडू नका. असत्य बोलण्याने कमी पण प्राप्त होतो आणि शेवटी अधोगती प्राप्त होते. सत्य बोलणाऱ्याला त्रास होऊ शकतो, पण त्याचा पराभव कधीही होत नाही. एक असत्य बोलले तर ते लपविण्यासाठी अनेकदा असत्य बोलावे लागते. त्यामुळे सत्य बोलण्याकडे अधिक लक्ष द्यायला लागते.

भारतासारख्या सर्वात जास्त लोकसंख्या असूनही विविधतेत एकता असलेल्या देशाला भ्रष्टाचारासारख्या वाळवीने पुरते पोखरून टाकले आहे. हा भ्रष्टाचार मुळापासून काढायचा असेल तर प्रत्येकाने राजा हरिश्‍चंद्र आणि श्रीराम यांच्यासारखे सत्यवचनी गुण अंगिकारले पाहिजे. एकमेकांना न फसवता, विश्वासपूर्वकपने निस्वार्थ काम करायला हवे. तरच प्रत्येक जण सुखी आणि समाधानी आयुष्य जगू शकेल.

अनेकांतवाद

जेव्हा एखादी वस्तू तिचे संपूर्ण स्वरूप समजून घेण्यासाठी अनेक दृष्टिकोन वापरून स्वीकारली जाते, त्या शैलीला ‘अनेकांतवाद’ म्हणतात. जसे दोन डोळ्यांमध्ये अंतर आहे तसेच दृष्टी आणि दृष्टिकोन, समज आणि सामंजस्य यामध्ये आहे. आपली भावना जशी असेल तसा त्याचा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळेल. कुणासाठी जी वस्तू आनंद देणारी असते, तीच दुसऱ्यासाठी कष्ट देणारी असते. जसे तूप कुणासाठी अमृत तर कुणासाठी विष असते, सावली कुणासाठी चांगली तर कुणासाठी कष्ट देणारी असते. कुणाला राग रंग मैफिल आवडते तर कुणाला पर्वतावर जाणे पसंत असते.

एकच स्थान पण प्रत्येकाचा दृष्टिकोन आणि दृष्टी वेगवेगळी असते. कुणी रावणाचे दहन करतात तर, कुणी पूजा करतात. म्हणजेच वस्तू ही वस्तू आहे, व्यक्ती ही व्यक्ती आहे, फक्त त्याकडे पाहणाऱ्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. अनेक व्यक्तीबद्दल आपण असे पूर्वग्रहदूषित मत बनवून चालतो त्यांच्याशी कधी प्रत्यक्ष संवाद साधत नाही आणि गैरसमज वाढत जातात. या अनेकांतवादाच्या मार्गाने नातेसंबंध, समाज , देश व जग अधिक जवळ आणून ते अधिक समृद्ध करू शकतो. सोशल मीडियाचा वापर करतानाही हे तत्त्व अमलात आणले तर अनेक धोके टळू शकतात.

अपरिग्रह

याचा अर्थ जास्त संग्रहाची वृत्ती ठेवू नये. जेवढी गरज आहे, तेवढाच संचय करायला हवा. आपण अनेकवेळा गरजेपेक्षा अधिक संचय करतो. कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ त्या गोष्टीतील आनंदच हरवून टाकतो. जग पैशाच्या मागे पळते ते फक्त मौजमजा करता यावी म्हणून! सध्या आपल्याकडे एवढ्या फालतू गोष्टींचा कचरा जमलाय की त्या ओझ्यानेच आपण लटपटत आहोत. अपरिग्रहाच्या भावनेचा आपल्यात जन्म झाला तर आपण स्वत:कडे एक विश्वस्त म्हणून पाहू. अपरिग्रहाची भावना मजबूत करण्यासाठी सत्संग करावा.

अचौर्य

कुठलीही वस्तू, सजीव वा निजीर्व किंचित वा अधिक आपल्या मालकीची नाही. ती मिळवणे म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या वस्तूस अनिष्ट भावनेने स्पर्श करणे, परस्पर घेणे किंवा रस्त्यात पडलेली वस्तू आपलीशी करणे हे चौर्य आहे.

चोरीचे चार भाग पडतात.

द्रव्य- सजीव व निजीर्व वस्तूंची चोरी.

क्षेत्र- दुसऱ्याच्या जमिनीवर अयोग्यरित्या ताबा करणे.

काळ - वेतन, भाडे, व्याज देण्या-घेण्याच्या ठरलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत पैसे घेणे.

भाव- भावचोरीचे क्षेत्र व्यापक आहे. एखाद्या लेखकाचे, कवीचे वाङ्मय आपल्या नावावर खपविणे, प्रकाशित करणे.

चोरीचा विचार हेदेखील भावचौर्य आहे. कुठलेही चौर्य हे क्षणिक लाभासाठी शाश्वत श्रेय घालवून बसते.

ब्रह्मचर्य

महावीरांनी ब्रह्मचर्य हे सर्वोत्तम तपश्चर्या, नियम, ज्ञान, तत्वज्ञान, चारित्र्य, संयम आणि विनय यांचे मूळ म्हटले आहे. मनुष्य जन्माने नव्हे तर कृतीने महान (ब्रह्मचर्य) बनतो हे त्यांच्या तत्त्वांचे सार आहे. खरे तर ब्रह्मचर्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाला बळी न पडता वासना आणि वासनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेली तपश्चर्या होय. महावीरांनी सांगितलेले सिद्धांत किंवा तत्त्वे आजही प्रत्येक ठिकाणी लागू पडतात आणि ही तत्त्वे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वपूर्णही आहेत. गरज आहे ती प्रत्यक्षात जीवनात उतरवण्याची.

(लेखिका रिता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापक आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT